स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या मुद्यावरून पवार कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अत्यंत गुळमुळीत आणि थातुरमातूर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान उपटण्याची हिंमत नसल्याने स्वा.सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणे योग्य नाही, महापुरुषांचा अपमान करणे योग्य नाही, असे बाळबोध सल्ले पवार कुटुंबिय राहुल गांधींना देतायत.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार तर फक्त राहुल गांधींची चूक नाही, माजी राज्यपाल भगतसिंह कोशियारी सुद्धा बेताल वक्तव्य करीत होते, असे सांगून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकरांच्या अपमानाच्या मुदद्यावरून भाजपाने जेव्हा विधिमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते, तेव्हा अजित पवार संतापले होते. ‘तुम्हाला तुमच्या नेत्यांचा अभिमान असेल तर आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे’, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली होती.
राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करत असताना अजित पवार यांना त्यांचा अभिमान कसा काय वाटू शकतो? हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतोच. आणि राहुल गांधी त्यांचे नेते कधी पासून झाले? हा दुसरा प्रश्न. सिन्नरमधील सभेत बोलताना अजित पवारांनी ‘महापुरुषाबद्दल अशाप्रकारे मत व्यक्त करू नयेत’, असा सल्ला राहुल गांधींना दिला. तोही राहुल गांधी याचा उल्लेख न करता.
राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ जातीय राजकारणातून राम गणेश गडकरी, बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास या महापुरुषांचा वारंवार अपमान केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून कुणाला सल्ले देण्याचा काय, तोंड उघडण्याचाही अधिकार नाही. तरीही अजित पवार हा दांभिकपणा करतायत. माजी राज्यपाल कोशियारी यांनी बेताल वक्तव्य करून शिवछत्रपतींचा अपमान केला होता, याचीही आठवण अजित पवारांनी करून दिली.
राज्यपाल पदावर विराजमान झाल्यानंतर कोशियारी सर्वात आधी शिवनेरीवर पायी चालत गेले आणि त्यांनी महाराजांना अभिवादन केले. ते छत्रपतींचा अपमान कसे करू शकतील? कोशियारी यांनी केलेल्या छत्रपतींच्या तथाकथित अपमानाचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला. कोशियारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. ‘कोशियारी यांचा हेतू समाजप्रबोधनाचा होता, कोणत्याही महापुरुषाच्या अपमानाचा नव्हता’, असे मत न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अभय वाघवासे यांनी निकाल देताना नोंदवले.
अजित पवारांना या निकालाबद्दल माहीत नसेल काय? की माहीत असून सुद्धा ते अजाणतेपणाचा आव आणतायत? कोशियारी यांचा महापुरुषांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, एवढे सांगून न्यायालय थांबलेले नाही. त्यांचा हेतू समाज प्रबोधनाचा होता, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. तरीही राहुल गांधींच्या सोबत कोशियारी यांना हाणण्याचा मोह अजित पवारांना आवरला नाही. कोशियारी यांच्याकडे बोट दाखवून राहुल गांधी यांची पाठराखणच करतायत. कोशियारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणीत क्लीनचीट दिली होती हे अजित पवार विसरले आहेत किंवा ते स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठे समजतायत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राहुल गांधी यांनी अनेकदा स्वा. सावरकरांचा अपमान केला होता. परंतु तेव्हा काँग्रेसचे दोन्ही मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोंड शिवून बसले होते. आता सरकार कोसळले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सांभाळून घेण्यात दोन्ही पक्षांना तेवढा रस उरलेला नाही. परंतु येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा शेकू शकतो हे माहीत असल्यामुळे थोरल्या पवारांनी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा:
बुलंदशहरमध्ये शेतात बांधलेल्या घरात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला
देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’
इंदूरची ती विहीर खुनी की अनधिकृत बांधकाम जीवघेणे
सावरकरांना माफीवीर म्हणनू हिणवणे योग्य नाही, असे सांगताना संघाशी त्यांचा काही संबंध नव्हता हेही जोडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने खरं तर राहुल गांधींचा जळजळीत निषेध करायला हवा होता. त्यांच्याकडून माफीची मागणी करायला हवी होती. त्यांचे कान उपटायला हवे होते. परंतु सत्ता असताना ते खुर्चीकडे पाहून शांत बसले आता महाविकास आघाडी टिकवण्यासाठी ते राहुल गांधींना कोरडे सल्ले देतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातवादी राजकारणाचा विचार करता सावरकरांसाठी फार आक्रमक भूमिका घेणे त्यांना सोयीचे नाही.
शरद पवारांनी तर सावरकरांची गुळमुळीत पाठराखण करताना संघ विरोधाचा कंडू शमवून घेतला. सावरकर यांचा संघाशी संबंध नव्हता, असे विधान जाणीवपूर्वक केले आहे. महापुरुषांचा अपमान करण्याची परंपरा नेहरुंनी सुरू केली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यांचे पणतू सावरकरांचा अपमान करतायत. महाराष्ट्राचे तथाकथित बडे नेते सोयीच्या राजकारणासाठी शांत बसले आहेत.
म्हणे शरद पवारांनी सावरकरांच्या अपमानाबाबत काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी जरी सावरकर मुद्दयावर त्यांच्या भूमिकेवर ठाम असले तरी मित्रपक्षांच्या भावना लक्षात घेऊन ते या विषयावर पुन्हा बोलणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिउबाठाच्या भूमिका काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, याच्याशी जनतेला काय घेणे देणे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करून जो अधमपणा केला आहे, त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी हीच महाराष्ट्राची भावना आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)