25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीयलफडीच लफडी चहुकडे, गं बाई गेला पाटकर कुणीकडे...

लफडीच लफडी चहुकडे, गं बाई गेला पाटकर कुणीकडे…

Google News Follow

Related

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत आर्थिक व्यवहार असलेले त्यांचे मित्र सुजीत पाटकर यांच्या कलिन्यातील सुमीत आर्टीस्टीका फ्लॅटवर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ED ची धाड पडली. या धाडीत अनेक महत्वाची कागदपत्र ED च्या हाती लागली. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पाटकर यांनी दोन दिवसात आपण संजय राऊत यांच्याशी आपले कसलेच आर्थिक संबंध नाही, याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असे जाहीर केले होते. ती पत्रकार परिषद तर आजतागायत झाली नाही. परंतु पाटकर यांच्यावर काल आझाद मैदान पोलिस ठाण्यात कोविड सेंटर फसवणूक प्रकरणात गुन्हा मात्र दाखल झाला आहे. यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पत्रचाळीचा घपला आहे हे निर्विवाद. पत्राचाळ प्रकरणामध्ये प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा फ्रण्ट मॅन असल्याचा ED ला संशय आहेच. ज्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रकरणातही पाटकर हे केवळ संजय राऊतांचे फ्रण्ट मॅन असण्याची दाट शक्यता आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल एण्ड मॅनेजमेण्ट सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील कोविड सेंटरचे ज्या प्रकारे कंत्राट देण्यात आले ते पाहाता याची खात्री पटल्याशिवाय राहात नाही. पुण्यातील कोविड सेंटरसाठी कंत्राट मिळावे यासाठी लाईफलाईनने साधा अर्जही केला नव्हता. केवळ एका जुजबी प्रेझेण्टेशनच्या आधारे त्यांना हे काम मिळाले.

पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर पालिकेने माहितीच्या आधारे ही बाब मान्य केली आहे. २ सप्टेंबर २०२० रोजी लाईफलाईनला पुणे कोविड सेंटरचे काम मिळाले. पुढे आठ दिवसात तीन मृत्यू झाले. यात एका पत्रकाराचाही समावेश होता. त्यामुळे पुणे महापालिकेने पीएमआरडीएला पत्र लिहीले. लाईफ लाईनकडे कोविड सेंटरसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स आणि अन्य स्टाफ नसल्यामुळे यांचे कंत्राट तात्काळ रद्द करावे, अशी मागणी केली. त्यामुळे ९ सप्टेंबरला हे कंत्राट रद्द झाले.

या कंपनीला अन्य कुठेही कोविड सेंटरचे काम देण्यात येऊ नये, असा शेरा मारून पीएमआरडीएने लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. परंतु इतके रामायण झाल्यानंतरही लाईफ लाईनला दहीसर, वरळी, महालक्ष्मी आणि मुलुंड येथील कोविड सेंटरचे काम देण्यात आले. यावरून एक बाब स्पष्ट झाली की सुजीत पाटकर हा लाईफ लाईनचा फक्त चेहरा होता. खरा सूत्रधार वेगळाच होता.

सुजीत पाटकर सातत्याने संजय राऊतांशी आपला कोणताही आर्थिक संबंध नसल्याची कॅसेट सातत्याने वाजवत होते. ते फक्त आपले कौटुंबिक मित्र आहेत असे सांगत होते. परंतु हे धादांत खोटे होते. वाईनचे वितरण करणाऱ्या मॅगपाय डीएफएस या कंपनीत संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या विनिता आणि पूर्वशी या सुजीत पाटकर सोबत संचालक होत्या.
२००९ ते २०११ या काळात किहीम बीचवर विकत घेण्यात आलेले आठ भूखंड पाटकर यांची पत्नी स्वप्ना आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावावर विकत घेण्यात आल्या आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावे विकत घेतलेल्या प्लॉटसाठी आपण पत्नीला कर्जाऊ रक्कम दिली होती असे सुजीत यांचे म्हणणे आहे. परंतु या लोनचे हफ्ते सुजीत यांनीच फेडल्याची माहिती समोर आल्यामुळे हा दावाही फोल ठरला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे पाटकर हे संजय राऊत यांचे बेनामी पार्टनर असण्याची शक्यता जास्त आहे. पत्राचाळ प्रकरणातील रक्कम पाटकर यांच्या नावे गुंतवण्यात आली असावी असा ED लाही संशय आहे.
अलिकडेच व्हायरल झालेल्या संजय राऊत यांच्या शिवीगाळवाल्या ऑडीओ क्लीपमध्ये अखेरच्या भागात ती जमीन माझ्या किंवा सुजीतच्या नावावर करून दे असे संजय राऊत म्हणतायत. ती जमीन किहीम बीचवरील तीच जमीन आहे. ED च्या तपासात ही माहिती उघड झाली असून स्वप्ना पाटकर यांनीही ED ला दिलेल्या जबाबात ही बाब कबूल केली आहे.

सुजीत पाटकर हे या सर्व प्रकरणात पूर्णपणे अडकले आहेत. कोविड सेंटर प्रकरणात तर त्यांनी बोगस कागदपत्र दाखवून काम मिळवले. पुण्यात कोविड सेंटरचे काम मिळवण्यासाठी त्यांनी सादर केलेली पार्टनरशिप डीड आणि मुंबईत सादर केलेली पार्टनरशिप डीड यात प्रचंड फरक आहे. पहिल्या पानावर दिलेले साल २०२० आणि अखेरच्या पानावर दिलेले साल २०१० आहे. त्यामुळे खोटी कागदपत्र देऊन लाईफ लाईनने कोविड सेंटरचे काम मिळवले, रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. त्यातून जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात ओरबाडला हे पुरेसे स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा:

लवासाचा १८५९ मध्यमवर्गीयांना गंडा… पवारसाहेब देशमुख, मलिक, राऊत सोडासुप्रियाताईंची चिंता करा…

कोरोनामुळे कोलमडलेली राज्याची अर्थव्यवस्था शेतीने सांभाळली

बीडीडी चाळीतील पाेलिसांना मिळणार १५ लाखांत घर

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे; कारण

 

बोगस ब्लॅक लिस्टेड कंपनीला जेव्हा मुंबईतील कोविड सेंटरचे काम दिले जाते, त्याचे कारण न समजण्या इतकी मुंबईकर जनता खुळी नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांचे मित्र आणि त्यांच्या परिवाराचे पार्टनर सुजीत पाटकर यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. स्वत:च ब्लॅक लिस्ट केलेल्या लाईफ लाईनला मुंबईतील कोविड सेंटरचे काम का दिले, त्यांना मुंबईकरांच्या जीविताशी का खेळू दिले याचे उत्तर मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना द्यावे लागेल.

ED ची धाड पडल्यानंतर सुजीत पाटकर त्यांच्या कलिन्यातील फ्लॅटवर दिसेनासे झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी बहुधा पोलिसांना चांगलेच कष्ट पडणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा