मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब… काँग्रेसला नवा ताप

चोक्सीचे येणे ही काँग्रेसवर आलेली नवी आफत आहे.

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब… काँग्रेसला नवा ताप

देशात सुमारे १३ हजार ५०० कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चोक्सी याला बेल्जिअममध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारत सरकारने त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर तोफा डागल्या होत्या. कारण केंद्रात भाजपाचे सरकार होते. भाजपाने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. सरकारच्या अकार्य़क्षमतेमुळे त्याला परत आणणे शक्य होत नसल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला. वस्तूस्थिती वेगळी होती. चोक्सीचे सबंध कोणाशी होते, याचा खुलासा तो अँटीग्वात असतानाच झाला.

भारताने जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेतून दहशतवादी तहव्वूर राणा याला मानगुटीला पकडून आणले, त्यातुलनेत चोक्सी याला आणणे सोपे आहे. कारण त्याला बेल्जियममध्ये अटक झालेली आहे. हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे दोघे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून २०१८ मध्ये भारताबाहेर पळाले. ईडीच्या माध्यमातून आपल्याला लवकरच अटक होणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोबारा केला. आधी अमेरिका आणि तिथून अँटीग्वामध्ये आश्रय घेतला. तिथले नागरीकत्व मिळवले. उपचारासाठी तो बेल्जियममध्ये असताना त्याला अटक करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने चोक्सीच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरण्टच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेसने मोठा गदारोळ घातला होता. ‘सगळेच मोदी चोर असतात’, असे विधान करेपर्यंत राहुल गांधी यांची मजल गेली. २०१९ साली गुजरातमध्ये केलेल्या या विधानाच्या विरोधात त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. राहुल गांधी सतत मोदींवर ठपका ठेवत होते, परंतु काँग्रेसची खरी पोलखोल २०१८ मध्येच झाली होती. अँटीग्वातील चोक्सी याचा वकील डेव्हीड डॉरसेटने एक खळबळजनक दावा केला होता. त्याने काँग्रेसचे पार कपडेच उतवले होते. चोक्सीचे काँग्रेसशी संबंध असल्यामुळे त्याला टार्गेट करण्यात येत असल्याचे त्याने मीडिया समोर सांगितले. त्याच्या या विधानामुळे आता बॅकफूटला येण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. अँटीग्वातील स्थानिक एबीएस टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत डोरसेट याने हे विधान केले. चोक्सीना अटक करण्याचे प्रयत्न राजकीय हेतूने प्रेरीत आहेत का? याचा अँटीग्वा न्यायालयाने विचार करण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

चोक्सीचे काँग्रेस पक्षाशी संबंध होते, म्हणून त्याला भाजपाचे सरकार टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत चोक्सीचा वकील व्यक्त करतो, याला विशेष महत्व आहे. भाजपाकडून चोक्सी प्रकरणाबाबत काही आरोप करण्यात आले होते. गीतांजली जेम ही चोक्सीची कंपनी होती. या कंपनीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणग्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु याबाबत ठोस तपशील समोर येऊ शकला नाही. एक कनेक्शन मात्र असे आहे, ज्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच
अडचणीत आला. २०१५ मध्ये एका फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीची बाजू मांडणारे वकील एच.एस.चंद्रमौली यांना काँग्रेसने मंडेकेरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यावर भाजपाने काँग्रेसवर इतका भडीमार केला की,
चंद्रमौली यांची उमेदवारी काँग्रेसला रद्द करावी लागली. चोक्सीशी संबंधांचे आरोप काँग्रेस नेते अभिषेक संघवी यांच्यावर झाले, पी.चिदंबरम यांच्यावर झाले.

हे ही वाचा:

दिल्लीत १५ परदेशी नागरिकांना अटक, बांगलादेशासह ‘या’ देशांच्या नागरिकांचा समावेश!

राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलश स्थापित

तो आलाय, झोडपतोय, प्रतिस्पर्धी थरथरताहेत

“हिटमॅनचा सायलेंट मोड सुरूच आहे!”

राजकारणात विरोधक एकमेकांवर चिखलफेक करतच असतात. मुद्दा त्यात तथ्य किती असते हा आहे. यूपीएच्या कार्यकाळात सरकारी बँकांची लूट सुरू होती. मंत्री हाले आणि बँक डोले अशी परिस्थिती होती. सरकारी बँका बुडीत
जात होत्या. मेहुल चोक्सीच्या १५३० कोटीच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास नकार दिल्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी अलाहाबाद बँकेच्या मॅनेजरची हकालपट्टी केली होती, असा आरोप भाजपाने केला होता. याच कारणामुळे बहुधा
यूपीएच्या काळात बँकांचे एनपीएचे आकडे फुगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले आहे, बँका बुडवून फरार झालेल्या उद्योगपतींकडून वसुली सुरू झाली. किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या याने तर अनेकदा सांगितले आहे,
मी घेतलेल्या कर्जाच्या तुलनेत माझ्याकडून बरीच जास्त वसुली झालेली आहे.

मल्ल्या, चोक्सी, नीरव मोदी यांच्या बऱ्याच मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तहव्वूर राणाच्या पाठोपाठ आता चोक्सी आणि नीरव मोदी भारतात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे उद्याच घडेल, याची शक्यता कमी. कारण चोक्सीच्या वकीलांनी आजारपणाचे कारण पुढे केलेले आहे. त्याला कॅन्सर झाल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे तो कधी भारतात येईल हे ठोसपणे सांगणे कठीण असले तरी तो येणार हे नक्की. चोक्सी भारतात आल्यानंतर त्या तपशीला बाबत अधिक माहिती उघड करेल जी त्याच्या वकीलांनी थोडक्यात स्पष्ट केली होती. चोक्सीचे काँग्रेस नेत्यांशी कसे संबंध आहेत ? त्या संबंधांमुळे चोक्सीचे कसे कसे भले झाले? पंजाब नॅशनल बँक बुडवण्यात त्याची कोणी कोण मदत केली होती?

यूपीए सरकार हे देशाच्या इतिहासातील सगळ्यात बदनाम सरकार होते. कट्टरतावादी, दहशतवादी, भ्रष्ट उद्योगपती यांच्या सगळ्या काळ्या उद्योगांना तत्कालिन काँग्रेस नेत्यांची भरभरून साथ मिळाली. चोक्सी जेव्हा भारतात येईल तेव्हा त्याचा तीर्थप्रसाद नेमक्या कोणाकोणाच्या मुखात पडला याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे चोक्सीचे येणे ही काँग्रेसवर आलेली नवी आफत आहे. चोक्सीचे काँग्रेसशी संबंध होते, हा आरोप त्याचे वकील पत्र घेतलेल्या इसमाने केला आहे. त्यामुळे चोक्सी हात झटकू शकत नाही, की मागे फिरू शकत नाही. त्याला ते विधान सिद्ध करावे लागले. त्याचे काँग्रेसशी जिव्हाळ्याचे संबंध कसे निर्माण झाले, हेही सांगावे लागेल. काँग्रेसने भाजपाच्या विरोधात केलेल्या अनेक आरोपांचे बूमरॅंग झालेले आहे. चोक्सीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याचा प्रत्यय येतो आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version