अवकाश संशोधन क्षेत्रातील उद्याचा दिवस भारताच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने महत्वाचा. चांद्रमोहिमेचा एक महत्वाचा टप्पा आपण गाठणार आहोत. भारताने १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेले ‘चांद्रयान-३’ सुरक्षितपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आतापर्यंत नियोजित कार्यक्रमानुसार सर्व काही होते आहे. उद्या विक्रम लँडर, पोटातील प्रज्ञान रोव्हरसह सांयंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. गेल्या
मोहीमेच्या वेळी नेमकी इथेच गफलत झाली होती. हा प्रयत्न जर यशस्वी ठरला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. २००८ मध्ये भारताने चांद्रयान मोहीमेला प्रारंभ केला. पहिल्याच मोहीमेत चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे सूक्ष्म कण सापडले होते. ही माहिती खूपच महत्वाची होती. कारण अवकाशाची रहस्य माहिती करून घेण्यासाठी चंद्राच्या किती तरी पुढचा पल्ला गाठण्याची गरज आहे.
चंद्रावर जर पाणी असेल तर इथे माणसाचा मुक्काम शक्य होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पाण्याच्या अणूचे विभाजन करून ऑक्सिजन आणि हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते. इंधनाचा प्रश्न सुटू शकतो. भविष्यात इथे कायमस्वरूपी अंतरीक्ष स्थानक बनवणे शक्य होऊ शकते. इथे पृथ्वीवरून पाणी आणण्याचा पर्याय महागडा आहे. ज्याचा खर्च प्रति लिटर १ दशलक्ष डॉलर असू शकतो. ज्या खाजगी कंपन्या अंतरिक्षाची सफर करवतात. त्या प्रतिकिलो हाच दर आकारतात. चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर भारत विक्रम लँडर उतरवणार आहे, तो भाग जगाच्या दृष्टीने अपरीचित आहे.
इथल्या बऱ्याच भागावर बर्फाच्या स्वरुपात पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ पाण्याच्या दृष्टीने नाही तर प्लॅटीनम, लिथिअम सारख्या मूल्यवान खनिजाचे साठे इथे असावेत असा कयास आहे. त्यामुळे उद्याचा दिवस भारताच्याच नव्हे जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला सुरूवातीपासून रशियाचे सहकार्य आहे. गेल्या काही वर्षापासून अमेरीकी अंतराळ संशोधन संस्था नासासोबतही भारताच्या इस्त्रोने समन्वय प्रस्थापित केला आहे.
हे ही वाचा:
सेवा नाहीत; मग कामगार रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशाला?
वेळ जवळ आली; आता ‘पृथ्वी’ चंद्राभोवती फिरणार!
आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज
एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस
अंतराळ संशोधन कार्यक्रमांसाठी अब्जावधी रुपये खर्च होतात. तरी सुद्धा नवनव्या मोहीमांची तयारी सुरू आहे, किंबहुना या मोहिमांबाबत देशादेशांत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. समोर लोण्याचा गोळा दिसत असल्याशिवाय इतकी चुरस कधीही निर्माण होत नाही. अंतराळ संशोधनाशी संबंधित बाजारपेठेची उलाढाल २०२० मर्यंत ४४७ अब्ज डॉलरची होती. २०२५ पर्यंत हा आकडा ६०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. या बाजारपेठेत आघाडी घेण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने २०१९ मध्ये न्यू स्पेस इंडीया लि. या कंपनीची स्थापना केली.
व्यावसायिक दृष्टीकोनातून जगातील अन्य देशांना अंतराळ संशोधनाशी संबंधित सेवा पुरवणे हे या कंपनीचे उद्दीष्ट आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या कंपनीचे उत्पन्न १७ अब्ज रुपये होते. त्यात निव्वळ फायदा ३ अब्ज रुपयांचा होता. हा इस्त्रोचा उपक्रम आहे. ही कंपनी जगातील ५२ देशांना सेवा पुरवते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार २०१९ ते २०२१ या काळात इस्त्रोचे उत्पन्न २८८ कोटी रुपये असल्याची माहिती उघड केली होती.
उद्या विक्रम लँडर जर चंद्रावर उतरले तर अशाप्रकारचे सॉफ्ट लँडीग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. भारताचे हे यश देशाचा लौकीक वाढवणारे तर आहेच, परंतु एक महासत्ता बनण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल असेल. भारताचे पुढचे पाऊल सूर्याच्या दिशेने पडणार आहे. ब्रह्मांड अफाट आहे, त्याचा थांग लावण्याइतपत विज्ञानाचा विकास झालेला नाही. आपल्या सूर्यमालेतील चंद्राची रहस्ये जर पूर्णपणे उलगडली गेली नसतील तर अशा लाखो सूर्यमालांची एक आकाश गंगा आणि अशा लाखो आकाशगंगांचे ब्रम्हांड असा हा पसारा आहे. आपल्या पुराणात ब्रम्हांडांची संख्याही अनंतकोटी सांगितली आहे. ती पुराणातील वांगी नसून सत्य आहे, हे सध्याच्या खगोलशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. मल्टीवर्सची संकल्पना पुढे येते. ज्याच्या आदी आणि अंत कुणालाही ठाऊक नाही अशा अंतराळाची गुपितं उलगडण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. चांद्रयान-३ याचा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या मोहिमेच्या यशानंतर भारताचा दबदबा जगात वाढणार आहे.
उद्या या मोहिमेचा अत्यंत महत्वाचा दिवस. ही मोहीम यशस्वी ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये यासाठी आतापासून वक्तव्य सुरू झाली आहेत. चीनने भारतीय भूमीवर केलेला, कब्जा कश्मीरमध्ये सुरू असलेला दहशतवाद, ईशान्य भारतातील अस्वस्थता याबाबत मोदींनी दोष देणारे चांद्रयानाचे श्रेय मात्र थेट नेहरुंना आणि काँग्रेसला देऊन मोकळे होतील. परंतु उद्या असंतुष्ट घुबडांचे हे आवाज कुणालाही ऐकू येणार नाहीत, इतका मोठा जल्लोष होऊ दे ही ईश्वर चरणी प्रार्थना करूया.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)