लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी लगबग वाढली आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. दोन तास चाललेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आला नसला तरी काँग्रेसचा पारा वाढवण्याचे काम मात्र या बैठकीने केलेले आहे, हे मात्र नक्की.
हिंडेनबर्ग रिसर्च एण्ड शॉर्ट सेलिंग फर्मच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित अहवालानंतर अदाणी समूह प्रचंड अडचणीत आला होता. श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत नंबर दोनवर आलेल्या गौतम अदाणींना या अहवालानंतर आज ३२ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. शेअर बाजारात त्यांना काही अब्ज डॉलर्सचा फटका बसला. परंतु गेल्या चार महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. अदाणी समुह बऱ्यापैकी सावरला आहे. अदाणींचे शेअर गेल्या काही दिवसांत बऱ्यापैकी वधारले आहेत.
जागतिक स्तरावरील अनेक तज्ज्ञांनी सुद्धा हिंडेनबर्ग अहवालाची हवा काढली आहे. मोबिअस कॅपिटलचे प्रमुख मार्क मोबिअस यांनी हिंडेनबर्गचा अहवाल अचूक असल्याबद्दल अलिकडेच साशंकता व्यक्त केलेली आहे.
इस्त्रालयचे मंत्री नीर बरकत यांनी अलिकडेच एनआयए या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे. ‘आमचे हायफा बंदर एका भारतीय कंपनीला चालवायला दिले याचा अर्थ स्पष्ट आहे, की आम्ही भारतीय उद्योजक आणि भारत सरकारवर पूर्ण विश्वास ठेवतो.’ हायफा बंदर इस्त्रायलने अदाणी समुहाला चालवायला दिले आहे.
इस्त्रायल हा शेती, शस्त्र निर्यात, तंत्रज्ञान, संशोधन अशा अनेक क्षेत्रात पुढारलेला देश आहे. अशा देशाने त्यांच्या दोन पैकी एका बंदराचे काम अदाणी समुहाला दिले याचा अर्थ अदाणींच्या क्षमतेबाबत त्यांच्या मनात कोणतेही प्रश्नचिन्ह नाही.
राहता राहिला प्रश्न भारतीय राजकीय पक्षांचा. त्यांनी हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदाणी समुहाला टार्गेट करायला सुरूवात केली. अदाणी समुहाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे, काही पक्ष या मागणीची री ओढत आहेत.
परंतु अदाणी यांचे समर्थन करणारे शरद पवार फक्त एकटेच नाहीत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जरी अदाणी यांच्याविरुद्ध बोलत असल्या तरी त्यांच्या राज्यातील तेजपूर बंदराचे काम त्यांनी अदाणी समुहाला सोपवले आहे. राजरहाट येथील उभारण्यात येणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये अदाणी समुहाला मोठी जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्यावर देण्यात आली आहे.
७ फेब्रुवारी २०२३ मध्ये काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी एक ट्वीट केला होता. तेजपूर पोर्ट अदाणी समुहाला दिल्यानंतर ममता आणि अदाणी यांचे संबंध मधुर झाले आहेत. तेव्हा पासून ना त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलत ना अदाणींच्या विरोधात. ही खदखद फक्त चौधरी यांच्या मनात नाही, तर सर्वच काँग्रेस नेत्यांना असेच वाटते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा अदाणींच्या विरोधात आज सकाळी ट्वीट केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज अदाणी आणि पवार यांची भेट झाली. काही दिवसांपूर्वी पवार एनडीटीव्हीवर मुलाखतीसाठी गेले होते, या संपूर्ण मुलाखतीत अदाणींची बाजू मांडली जाईल असेच प्रश्न त्यांना विचारले. त्यावेळी पहिल्यांदा जाहीरपणे पवारांनी हिंडेनबर्ग अहवालावर टीका केली. गौतम अदाणी यांची उघडपणे पाठराखण केली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थकांनी पवारांना न भूतो न भविष्यती अशा प्रकारे ट्रोल केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रोलरच्या भूमिकेविषय पूर्णपणे नापसंती व्यक्त केली होती. आज पवार आणि अदाणी कोणत्या विषयावर बोलले हे उघड झाले नसले तरी दोघांमध्ये काय चर्चा झाली असणार याचा अंदाज बांधणे फार कठीण नाही. अदाणींनी पवारांना काय विनंती केली असेल हे समजण्यासाठी राजकीय पंडीत असण्याचीही गरज नाही.
हे ही वाचा:
अमृतपालचा शोध घेता घेता त्याची पत्नी सापडली पोलिसांच्या तावडीत !
‘रॉन्ग साईड ड्रायव्हिंग’ करणाऱ्यांना रेड सिग्नल
मुंबई पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’,५१ ठिकाणी छापे, ३९० जणांना अटक
अल्पसंख्याकही घेत आहेत, सरकारी योजनांचा भरघोस लाभ !
पवार भाजपामध्ये येणे भाजपाच्या तेवढे सोयीचे नाही जेवढे यूपीएमध्ये राहून काँग्रेसच्या पायात खोडा घालणारे पवार भाजपाच्या जास्त सोयीचे आहेत. पवार यांची ही आवडती भूमिका आहे. कर्नाटकमध्ये सुमारे ४५ जागांवर पवार उमेदवार देणार आहेत, या जागा निश्चितपणे काँग्रेसची पकड असलेल्या असतील. इथे पवार भाजपाच्या फायद्यासाठी लढतील.
नागालँडमध्ये हेच काम पवारांनी भाजपाच्या विरोधात आणि नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेते नेफ्यू रीओ यांच्यासाठी केले होते. भाजपाच्या उमेदवारांना फटका बसला होता. अदाणींसाठीही पवार बहुधा यूपीएमध्ये राहून तिच भूमिका व्यक्त करतील. विरोधी पक्षांमध्ये अदाणी मुद्यावर आधीच फूट पडली आहे. ती फूट रुंदावण्याचे काम पवार करतील कारण ते गौतम अदाणी यांचे चाहते आहेत. अगदी आत्मचरित्रात त्यांनी अदाणींच्या कर्तबगारीचा उल्लेख केलेला होता.
पवार आणि अदाणींचे अद्वैत हे असे आहे. एक राजकीय नेता आणि उद्योगपती यांचे सूर उत्तम प्रकारे जुळणे हे देशहिताचे असते. परंतु काँग्रेसला हे मान्य नाही. फक्त रॉबर्ट वॉड्रा यांनी उद्योगाच्या नावावर केलेले उपद्व्याप काँग्रेसला मान्य आहेत. कारण वाड्रा हे सोनियांचे जावई आहेत. इटालीत नसली तरी भारतात मात्र जावयांचे लाड करण्याची परंपरा आहे.
त्यामुळे भलेबुरे उद्योग मात्र वाड्रा यांनीच करावे, अस काँग्रेसला वाटू शकते. इतर उद्योगपतींना सरकारने मदत केली तर यांच्या पोटात मुरडा उठतो. काँग्रेसवाले मोदी-अदाणी यांचा एकत्र उल्लेख मोदाणी असा करतात. परंतु पवारांनी आता उघडपणे अदाणी यांची भेट आणि बाजू घेतल्यानंतर विरोधक त्यांना पदाणी म्हणून हिणवणार काय हा सवाल आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)