बनावट स्टँप घोटाळा हे महाराष्ट्रातील गाजलेले प्रकरण. त्याचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये होते. अब्दुल करीम तेलगी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी. हे प्रकरण घडले तेव्हा छगन भुजबळ राज्याचे गृहमंत्री होते. ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडल्यानंतर भुजबळांना पुन्हा या प्रकरणाची आठवण झालेली आहे. दोषी नसताना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला असा ठपका भुजबळांनी ठेवला. तेलगी प्रकरणात भुजबळांचा राग नेमका काय होता?
तेलगी घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, भुजबळ उपमुख्यमंत्री होते. शरद पवार तेव्हाही सूत्रधाराच्या भूमिकेत होते. १९९१ मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी अटक झालेल्या तेलगीला तुरुंगात राम रतन सोनी नावाचा गुरु भेटला त्यानेच याला बनवाट स्टँपपेपरचा धंदा दाखवला. १९९८ मध्ये याने इंडियन सेक्युरिटी प्रेसमधून भंगारात विकले जाणारे छपाईयंत्र विकत घेऊन हा धंदा सुरू केला. त्याने प्रत्यक्ष स्टँप पेपर छापायला सुरूवात केली १९९९ मध्ये.
२००१ मध्ये तेलगीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. पुणे बंड गार्डन पोलिसांना ५०० कोटी रुपयांचे बनावट स्टँप पेपर सापडले. या घोटाळा प्रकरणी त्याला २००३ मध्ये अटक करण्यात आली. तिथून घोटाळ्याचे धागेदोरे सापडत गेले. याप्रकरणी संशयाची सुई भुजबळांकडेही वळली. ‘या प्रकरणात तुमचे नाव चर्चेत आले आहे, मंत्री म्हणून तुम्ही चौकशीला सामोरे कसे जाणार?’ असे सांगून पवारांनी आपला राजीनामा मागितला होता. पवारांच्या येवल्यातील सभेनंतर छगन भुजबळ या विषयावर बोलले आहेत.
हे ही वाचा:
शिवसेना पक्षाचे नाव, चिन्हाबाबत ३१ जुलैला सुनावणी
गावस्कर रोहित शर्माच्या कप्तानीवर नाराज
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामासाठी पिंडवाराचे १००० कारागीर लागले कामाला
मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार
‘सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय़ चौकशीचे आदेश दिले होते. माझीही चौकशी झाली. परंतु सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझे नाव नव्हते. याचा अर्थ माझा विनाकारण राजीनामा घेतला गेला’, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे. भुजबळ जे काही म्हणालेत ते अर्धसत्य वाटते. कारण त्यावेळी तेलगीची नार्को टेस्ट झाली होती. त्या नार्को टेस्टमध्ये तेलगी याने भुजबळ यांच्यासह शरद पवार यांचेही नाव घेतले होते. एखाद्या आरोपीने नार्को टेस्टमध्ये नाव घेतले याचा अर्थ ती व्यक्ति दोषी असतेच असे नाही. परंतु ही बाब संशय निर्माण करणारी नक्कीच असते. तेलगीने काय संदर्भात पवारांचे नाव घेतले? त्यांचा तेलगीशी, या घोटाळ्याशी काय संबंध होता? जनतेच्या मनात हा प्रश्न होता. तरीही शरद पवार यांची साधी चौकशीही झाली नाही. अलिकडे ईडीची नोटीस आली असल्याचा कांगावा करत, ईडी कार्यालयात जाऊन करा मला अटक, असे आव्हान देणाऱ्या पवारांनी तेव्हा तपास यंत्रणांना असे आव्हान दिलेले नव्हते. आपले मंत्री पद गेले, बदनामी झाली, परंतु पवारांवर साधा शिंतोडाही उडाला नाही, ही बहुधा भुजबळांची खंत असावी.
बनावट स्टँपपेपर घोटाळा हा देशातील महाघोटाळ्यांपैकी एक होता. देशातील २५ राज्यातील ७० शहरात याची व्याप्ती होती. घोटाळ्याची रक्कम सुमारे २२ हजार कोटीची असल्याचे सीबीआयने म्हटले असले तरी ही रक्कम त्यापेक्षाही मोठी असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने या प्रकरणी तेलगीला ठोठावलेल्या दंडाची रक्कमच २५० कोटी होती. तेगलीने या प्रकरणात इतका पैसा कमावला की देशाच्या १८ राज्यांमध्ये त्यांने कोट्यवधीच्या मालमत्ता निर्माण केल्या. शंभरावर बँक खात्यांमध्ये त्याने कोट्यवधी रुपये रिचवले.
घोटाळ्याची माहिती पाहिल्यानंतर एकट्या तेलगीने हे कांड केले यावर विश्वास ठेवता येत नाही. तेलगीने बनावट स्टँप घोटाळा सुरू केल्यानंतर त्याला एखादा बाप भेटला असणार याची शक्यता आहे. त्याशिवाय हे सगळे बिनबोभाट चालले नसते. त्याच्या यशात अनेकांचा हातभार लागला असणार हे नक्की. हातभार लावणारे ते हात मजबूत असणार हेही ओघाने आलेच. तेलगीने नार्को टेस्टमध्ये ज्या अधिकाऱ्यांची, राजकीय नेत्यांची नावे घेतली, त्यांची चौकशीच झाली नाही. त्याने शरद पवारांचे नाव घेतले होते. पण चौकशी फक्त भुजबळांची झाली. शरद पवारांना चौकशीसाठी बोलावण्याची तसदी तपास यंत्रणांनी घेतली नव्हती.
तेलगीच्या निमित्ताने आपले करीयर संपवण्याचा प्रय़त्न झाला, अशी खदखद कदाचित भुजबळांच्या मनात होती. अजित पवार ज्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले त्याच मेळाव्यात त्यांच्या इतकेच जळजळीत तिखट भाषण भुजबळांनी केले होते. भुजबळांसारखा पवार समर्थक त्यांच्याविरोधात इतका आक्रमकपणे कसा बोलला, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. तेगली प्रकरणात आपल्याला गोत्यात अडकवून पवार नामानिराळे राहिले ही कदाचित ती खदखद असू शकेल. वयाच्या ५८ वर्षीच तेलगीचा बंगळूरु तुरुंगात मृत्यू झाला. त्यामुळे या घोटाळ्यातील अनेक रहस्य त्याच्यासोबत संपली आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)