शिंदे फडणवीसांमध्ये काही पेटलंय का?

भाजपा आमदार नितेश राणे यांनी सवाल केलाय, भाजपा-शिवसेना युतीतला शकुनी मामा कोण?

शिंदे फडणवीसांमध्ये काही पेटलंय का?

वर्तमानपत्रात काल झळकलेल्या जाहिरातीमुळे मविआमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट आली होती. या जाहिरातीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सत्तारुढ शिंदे-फडणवीस सरकारचा पाया हलावा अशी अनेकांची सुप्त इच्छा होती. अनेकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रेमाचे प्रचंड उमाळे आले. आज झळकलेल्या दुसऱ्या जाहिरातीमुळे विरोधकांच्या प्रेमावर पाणी पडले असावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सरकार आले. या दोघांमध्ये काही पेटले आहे का अशी चर्चा, महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी सवाल केलाय, भाजपा-शिवसेना युतीतला शकुनी मामा कोण?

 

‘तीन पक्ष एकत्र आले की भांड्याला भांडे लागायचेच’, असा युक्तिवाद मविआचे नेते स्थापनेपासून करत आले आहेत. आज भांड्याला भांडे आपटून भांडी साफ चेपली आहे. परंतु मविआचे नेते आपले झाकून शिंदे-फडणवीसांमध्ये कधी फाटतेय याकडे सतत वाकून पाहात असतात. भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये भांडी एकमेकांना कधी लागतायत, याकडे बारीक लक्ष लावून असतात.

 

काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांना निमित्त मिळाले. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव राजीनामा देण्याची भाषा करतायत म्हणजे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा संदेश लोकांमध्ये गेला.
विरोधकांनी सुद्धा या जाहिरातीनंतर सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रय़त्न केला. ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’, ही जाहिरात भाजपा समर्थकांना अस्वस्थ करून गेली. महाराष्ट्रात भाजपाकडे आमदारांचा आकडा जास्त असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नाहीत, याची सल कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितपणे आहे. सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकलेल्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटो नव्हता. ही बाब त्या अस्वस्थतेत भर टाकणारी ठरली.

 

जाहिरातील देवेंद्रजींचा फोटो नव्हता, तसा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो नव्हता. त्यामुळे ही जाहिरात घाई गडबडीत वर्तमानपत्रांकडे पाठवण्यात आली असं म्हणायला वाव आहे. शिवसेनाप्रमुखांचा फोटो नसलेला ही पहिली जाहिरात असावी. एका जाहिरातीमुळे महाराष्ट्रातील सरकार वाहून जाणार नाही हे खरे, पण तडा जायला अशी फुटकळ कारणे सुद्धा पुरेशी ठरतात.

 

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ११ महीन्यांपूर्वी ताकदीने प्रयत्न करून महाराष्ट्रातील मविआचे सरकार घालवले. नवे सरकार आणले. हे प्रय़त्न इतके लेचेपेचे नाहीत. सरकार चालवताना कुठेही कटूता निर्माण होऊ नये, हा शिंदे-फडणवीस या दोन्ही नेत्यांचा कायम प्रयत्न असतो. दुसऱ्या दिवशी झळकलेल्या जाहीरातीमुळे हा मुद्दा स्पष्ट झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी कोट्यवधींची जाहिरात देणारा हा शुभचिंतक कोण ? असा खोचक सवाल विचारला. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी, भाजपा-शिवसेना युतीतील शकुनी मामा कोण? असा सवाल केला आहे. दोन्ही प्रश्नांमध्ये शब्द वेगळे वापरले आहेत, दोघांचाही भाव वेगळा आहे, परंतु दोघांनी जे मांडले आहे, त्याचा आशय मात्र एकच आहे. नितेश राणे यांचा प्रश्न रास्त आहे. कोणी तरी काडी केली आहे, हे नक्की.

हे ही वाचा:

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना

अमेरिकी राजदूत डोभालबद्दल म्हणाले, उत्तराखंडच्या गावातला मुलगा राष्ट्राचा आधार बनला!

कुस्ती महासंघाच्या निवडणूक निकालाचे चित्र ६ जुलैला होणार स्पष्ट

‘उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत आली’, असे विधान केले आहे. ‘भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते’, असे विधान कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाही ते मनातले सडेतोड वक्तव्य करायचे. शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत आली, हे अगदी बरोबर आहे. परंतु भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवला नसता, तर फक्त ४० आमदार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते का? याबाबत पण शिवसेना नेत्यांनी विचार करायला हवा. हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत, म्हणून राज्यात पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचाराला बळ मिळाले आहे. अन्यथा मविआच्या काळात हा विचार खुंटीला बांधून ठेवण्यात आला होता. याला सह अस्तित्व म्हणतात.

 

मधमाशी फुलांतला मध खाते, परंतु याच मधमाशीमुळे फुलांचे परागीकरण होते. बोली भाषेत सांगायचे तर फुलांचा वंश वाढतो. याला सह अस्तित्व म्हणतात. कोण कोणावर उपकार करत नाही. पहिल्या दिवशीच्या जाहिरातीतून जो काही मेसेज लोकांपर्यंत गेला तो निश्चितपणे चांगला नाही. त्यामुळे हा प्रकार टाळणे हे सरकारच्या आणि शिवसेना-भाजपा युतीच्या हिताचे आहे. शिंक्यावर टांगलेले हे लोण्याचे मडके कधी खाली कोसळते, याकडे बरेच बोके लक्ष ठेवून आहेत.
जाहिरातीच्या माध्यमातून झी न्यूजने केलेला सर्व्हे पाण्यात गेला हे नक्की. या सर्व्हेमध्ये आलेली आकडेवारी युतीसाठी महत्वाची होती. ज्या सरकारला शिल्लक सेनेचे नेते गेले दहा महिने सातत्याने घटनाबाह्य सरकार म्हणतात, त्या सरकारला लोकांचे आशीर्वाद आहेत, हे स्पष्ट करणारी ही आकडेवारी होती. झी ने मतदारांचे सर्वेक्षण केले त्यात भाजपाला ३०.२० टक्के आणि शिवसेनेला १६.२० टक्के मतदारांचा कौल मिळालाय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना २६.१० टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२० टक्के पसंती मिळालेली आहे.

 

याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यातील सरकारच्या मागे जनतेची ४६.४० टक्के पसंती आहे. घटनाबाह्य सरकारच्या विरोधकांच्या दाव्याला केराची टोपली दाखवणारा हा सर्वे आहे. मविआच्या कार्यकाळात विकासाला लागलेला ब्रेक शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उठलेला आहे. मुंबई-पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. समृद्धी महामार्ग, शिवडी-न्हावाशेवा, सागरी महामार्ग, मुंबई-गोवा, नवी मुंबई विमानतळ, बुलेट ट्रेन असे अनेक प्रकल्प वेगाने मार्गा लागताना दिसतायत. लोकांना या दोन सरकारमधला फरक जाणवतो आहे. नव्या सरकारमुळे लोकांना मिळालेला दिलासा झीच्या सर्वेच्या निमित्ताने ठसठशीतपणे समोर आलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेला पाठिंबा लोकांसमोर नेण्याची गरज असताना सरकार जाहिरातीच्या अनावश्यक वादात अडकले. काड्या करणाऱ्यांना वेळीच आवरले नाही, तर भविष्यात त्यांचा संजय राऊत होतो. युतीच्या नेत्यांनी ही बाब लक्षात घेऊन नीतेश राणे यांच्या सुचनेनुसार शकुनीला हुडकून काढण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version