महापालिका निवडणूक; ठाकूर कंपनीचे साम्राज्य खालसा होणार?

ठाकूर साम्राज्य संपवणे ही आता अश्यक्यप्राय राहिलेली गोष्ट नाही.

महापालिका निवडणूक; ठाकूर कंपनीचे साम्राज्य खालसा होणार?

विधानसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाची लाट होती. अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यात मजबूतीने उभा असलेला वसई-विरारमधील ठाकूर कंपनीचा किल्ला या लाटेत उद्धस्त झाला. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, त्यांचे
चिरंजीव क्षितिज ठाकूर हे बाप-बेटे निवडणुकीत पराभूत झाले. दहशतीपेक्षा हिंदुत्व प्रभावी ठरले. त्याची पुनरावृत्ती महापालिकेच्या निवडणुकीत होणार काय, साम्राज्य या प्रश्नाची जोरदार चर्चा वसई-विरारमध्ये आहे.

वसई-विरार महापालिकेतील आजचे चित्र पाहिले, तर बहुजन विकास आघाडीचा अर्थात ठाकूर कंपनीचा पराभव निव्वळ अशक्य वाटतो. एकूण ११५ नगरसेवकांपैकी १०५ नगरसेवक त्यांचे आहेत. भाजपाचा केवळ एक नगरसेवक आहे. शिवसेनेची परिस्थितीही तशीच आहे. तरीही हे अशक्य शक्य होऊ शकते. कारण विधानसभा निवडणुकीत भाजपाने हा चमत्कार करून दाखवलेला आहे. मात्र त्यासाठी भाजपाला अचूक रणनीती वापरावी लागणार आहे. १९९१ मध्ये व़डराई चांदी प्रकरणापासून भाई ठाकूर या नावाची वसई-विरारमध्ये मोठी दहशत आहे. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर ठाकूर कंपनी दाऊद टोळीतून बाहेर पडली. दहशतीच्या पायावर वसई-विरारमध्ये त्यांचे राजकीय साम्राज्य उभे राहिले.

 

गेल्या काही वर्षांत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ठाकूर कंपनीतील पंटर बिल्डर बनले. अनेकांनी राजकारणात नशीब आजमावले. कंपनीवाले बरेच माणसाळले. पूर्वीच्या काळी भाईगिरी करणाऱ्यांच्या हाती आज चांगला पैसा खेळतो आहे. अनेकांवर खंडणी, मर्डर, हाफ मर्डर अशा केसेस असल्या तरी तो मार्ग सोडून आता कैक वर्षे लोटली आहेत. सुखवस्तू जीवनाची सवय लागली आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखे राडे करण्याची क्षमताही संपलेली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. संघाची कुमक सुद्धा सोबत होती. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे… या घोषणांचा जनमानसावर खोल ठसा उमटला होता. एकूणच राज्यभरात भाजपाची लाट होती. त्यामुळे वसई-विरारमध्ये बविआचे पानिपत झाले. वसईत स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. नालासोपाऱ्यात राजन नाईक यांनी क्षितीज ठाकूर यांची विकेट घेतली. बोईसरमध्ये शिवसेनेचे विलास तरे विजयी झाले.

हे ही वाचा:

सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’ 

संतोष देशमुखांचे अखेरचे शब्द…आता बास करा, मला मारू नका!

पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

बहुजन विकास आघाडीचा बाजार उठला. ठाकूर कंपनीला हादरा बसला. महापालिका निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे. परंतु हे मिशन अर्थातच सोपे नाही. राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपाकडे संघटन आहे, हे खरे, परंतु स्थानिक पातळीवर चेहऱ्यांची वानवा आहे. विधाससभा निवडणुकी आधी वसई-विरारचे पहिले महापौर राजीव पाटील भाजपाच्या मार्गावर आहेत, अशी जोरदार चर्चा होती. ते बहुजन विकास आघाडीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. भाई ठाकूर यांच्या नात्यातले आहे. वसई-विरारमध्ये त्यांना मानणारा एक मोठा गट आहे. ते फुटणार या चर्चेमुळे राजीव पाटील यांच्यावर ठाकूर कंपनी नाराज होती की त्यामागे वेगळी काही व्यावसायिक कारणे होती हे कळायला मार्ग नाही. परंतु दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे हे नक्की. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते बविआच्या पोस्टरवरून गायब झाले होते. भाई ठाकूर या निवडणुकीत स्वत:
प्रचारात उतरले होते. त्यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त झाले.

विधानसभा निवडणुकीत दणका मिळाल्यानंतर हितेंद्र ठाकूर सजग झाले आहेत. महापालिकेसाठी ताकद लावून उतरलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना महापालिका गमवायची नाही. कारण महापालिका हातून गेली याचा अर्थ साम्राज्य खालसा झाले. महापालिका निवडणुकीत भाजपाच्या बाजूने जाणारे अनेक मुद्दे आहेत. २००९ पासून बविआ इथे सत्तेवर आहे. एकहाती सत्ता असूनही इथे वीज, पाणी, रस्त्यांची समस्या सुटलेली नाही. वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवण्यात
बविआला यश आलेले नाही. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. महापालिका हद्दीतील जनसुविधांसाठी राखीव ८२२ भूखंड हडप करण्यात आले आहेत. याप्रकरणी भाजपाचे स्थानिक नेते मनोज गोपाळ पाटील यांनी जनहीत याचिका दाखल केलेली आहे. मोकळ्या जागा गिळण्याचे काम जोरात सुरू आहे, त्यामुळे शहराचा श्वास घुसमटतोय. लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. पक्ष पातळीवर सुद्धा नाराजी आहे. ठाकूर कंपनीच्या घराणेशाहीला लोक विटलेले आहेत. कुटुंबाला देऊन काही उरले तर ते अन्य पदाधिकाऱ्यांना मिळते. अनेकांना क्षमता असूनही डावलेले जाते. २००९ पासून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या बविआला येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात त्यांना एण्टी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकांना बदल हवा आहे.

भाजपाच्या पथ्यावर पडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षात इथले लोकसंख्येचे गणित आमूलाग्र बदलले आहे. स्वस्तात घरे मिळाल्यामुळे परराज्यातून आलेल्या लोकांनी इथे मोठ्या प्रमाणात वस्ती केलेली आहे. वसई-विरारच्या मूळ रहिवाशांपेक्षा ही संख्या आता मोठी झालेली आहे. पूर्वीपासून राहणारे स्थानिक लोक ठाकूर कंपनीच्या दहशतीखाली होते. नवागतांबाबत आता ती परिस्थिती राहिलेली नाही. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये भाजपाच्या मतदारांचा भरणा जास्त आहे.
भाजपाच्या पथ्यावर पडणारी परिस्थिती असली तरी महापालिकेचा पेपर भाजपासाठी सोपा नाही. निवडणूक जिंकण्यासाठी मोठा जुगाड करावा लागणार आहे. राजीव पाटील जर भाजपाच्या सोबत आले तर भाजपाच्या विजयाची शक्यता वाढते. भाजपाच्या नेतृत्वाने लक्ष घातले तर ही कामगिरी फत्ते होऊ शकते. राजीव पाटील यांच्यासोबत बविआतील दुसरी फळी भाजपाच्या सोबत येऊ शकते. जोड, तोड आणि जुगाड हाच भाजपाच्या विजयाचा राजमार्ग ठरू शकतो. ठाकूर साम्राज्य संपवणे ही आता अश्यक्यप्राय राहिलेली गोष्ट नाही. एक चाणक्य ताकदीने उतरला की सगळे मार्गी लागू शकते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version