तहव्वूरमुळे श्वास कोंडलाय, दाऊदला आणले तर बंदच पडेल…

तहव्वूरमुळे श्वास कोंडलाय, दाऊदला आणले तर बंदच पडेल…

दहशतवादी तहव्वरू राणाला भारतात आणल्यानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. जनतेला २६/११ चा काही प्रमाणात वचपा काढल्याचे समाधान आहे. परंतु, विरोधकांचा मात्र पार तिळपापड झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश खूपत असल्यासारख्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना तर आपले बिंग फुटणार? मुंबई हल्ल्याचे लोकल कनेक्शन उघड होणार? या भीतीने अनेकांना घाम फुटलाय. तहव्वूर राणाचा संबंध केवळ २६/११ च्या हल्ल्याशी होता. कल्पना करा, अशा अनेक घातपातांशी संबंध असलेला माफीया दाऊद इब्राहीम याला भारतात आणले तर काँग्रेसची परीस्थिती काय होईल?

भारतात आणल्यानंतर न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत रवाना केले आहे. त्याची चौकशी सुरू झालेली आहे. मुंबई हल्ल्याचा तपशील त्याला विचारला जातोय. मुंबई हल्ल्याच्या आधी तो दुबईत गेला होता. तिथे त्याची एका विशिष्ट व्यक्तिशी गाठभेट झाल्याची माहिती त्याने उघड केलेली आहे. संपूर्ण चौकशीत असा बराच खळबळजनक तपशील बाहेर येणार आहे. हा हल्ला घडवताना त्याच्या सोबत कोण होते? त्यात पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित किती? लष्कर ए तोयबाशी संबंधित किती होते? मुंबईत तो कोणाला भेटला? भारतात त्याचे कनेक्शन कोणाशी होते? हे सगळं तपासात समोर येणार आहे. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांची गाळण उडाली आहे.

१९९३ साली मुंबईत जेव्हा साखळी बॉम्बस्फोट घडले तेव्हा त्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांनी भारतातून सहज पोबारा केला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी या घटनेची सखोल चौकशी कऱण्यासाठी गृहसचिव एन. एन. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या अहवालातील १३ पानेच जनतेसमोर आलेली आहेत. बाकी अहवाल गुलदस्त्यातच राहिला. ‘देशात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि माफीयांची अभद्र युती आहे. ही युती देशात एक समांतर सरकार चालवीत आहे.’ असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यात दडलेली बड्या राजकीय नेत्यांची नावे आजपर्यंत बाहेर आलेली नाही. परंतु मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे आणि महाराष्ट्रातील काही राजकारण्यांचे काही तरी गुळपीठ होते, याबाबत आता जनतेच्या मनात कोणताही संशय नाही.

एप्रिल १९९४ मध्ये मुस्लीम लीगचा आमदार झियाउद्दीन बुखारी याची अरुण गवळी टोळीच्या राजू फिलीप याने हत्या केली. बुखारीला साखळी बॉम्बस्फोटांबाबत बरंच काही माहिती होते, म्हणून त्याला ठार करण्यात आले होते, अशी कुजबुज त्याच्या हत्येनंतर होती. आश्चर्य म्हणजे या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजू फिलीप याची न्यायालायाने पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली होती. २६/११ च्या हल्ल्यातही या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. काही नेत्यांचा या प्रकरणात निश्चितपणे सहभाग असणार, असा संशय घ्यायला पुरेसा वाव आहे. पाकिस्तानमध्ये बसलेले आयएसआयचे म्होरके, मुंबईच्या किनाऱ्यावर उतरून इथल्या रस्त्यावर बेछूट गोळ्या चालवणारे दहशतवादी, यांच्या शिवायही या कटात काही बिनचेहऱ्याचे लोक सहभागी होते. त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे ओरबाडण्याचे काम तहव्वूर राणा करू शकतो याची जाणीव झाल्यामुळे अनेक नेत्यांची छाती धडधडायला लागलेली आहे. कारण ज्या काळात पाकिस्तानमध्ये २६/११ च्या कटाची आखणी सुरू होती, त्याच काळात मुंबईत हिंदू दहशतवादाची चर्चा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केली होती. याच काळात ‘हू किल्ड करकरे’ सारखे पुस्तक लिहीले गेले. इथेही पुन्हा हिंदू दहशतवादाची थिअर मांडण्यात आली. एस. एम. मुश्रीफ यांच्या सारख्या वरीष्ठ निवृत्त अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहीले होते, ही बाब नजरेआड करता येणार नाही. दिग्विजय सिंह, कृपाशंकर सिंह यांच्यासारखे दिग्गज काँग्रेस नेते या पुस्तकाचे ढोल पिटत होते. जेव्हा २६/११ घडवण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मुंबईत आले तेव्हा त्यांना हिंदू नावे असलेली ओळखपत्र देण्यात आली. अजमल कसाबने समीर चौधरी असे नाव धारण केले होते. तो जिवंत पकडला गेला म्हणून तो अजमल कसाब असल्याचे उघड झाले. मेला असता तर त्याच्या खिशात समीर चौधरी या नावाचेच ओळखपत्र सापडले असते. म्हणजे हिंदू दहशतवादाची जी थिअरी काँग्रेसकडून मांडण्यात येत होती, त्याच थिअरीला बळकटी देण्याचे काम आयएसआयकडून या हल्ल्याच्या माध्यमातून केले जाणार होते. हा निव्वळ योगायोग कसा असेल ?

सीमेच्या अलिकडे आणि पलिकडे दोन्ही बाजूला एका दिशेने काम सुरू होते. कोणीतरी निश्चितपणे यात समन्वय साधण्याचे काम करीत होते. मुंबईवर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला होता आणि तो हिंदूंनी घडवला असे दाखवण्याचा आयएसआयचा प्रयत्न होता. तोच प्रयत्न काँग्रेस नेते मालेगाव बॉम्बस्फोटापासून करत होते. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट, अजमेर दर्गा बॉम्बस्फोट आदी प्रकरणांचे बिल हिंदुत्ववादी संघटनांवर फाडण्यात येत होते. त्यासाठी आरोपींच्या घरात आरडीएक्स पेरण्याचे काम एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आले होते. त्यामुळे हे षडयंत्र फक्त मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून काही लोकांना ठार करायचे किंवा काही ठिकाणी बॉम्ब फेकण्याचे नव्हते. हिंदुत्ववादी संघटनाही रडारवर होत्या. दहशतवादाचा शिक्का मारून या संघटना उद्ध्वस्त करण्याचा डाव होता. या हल्ल्याचा मुख्य हेतू हाच असावा, असे मानायला वाव आहे. आयएसआयला ही स्क्रिप्ट कोणी दिली होती? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. कालपर्यंत या प्रश्नाचे उत्तर शोधणे कठीण होते. आज ते शक्य आहे. कारण तहव्वूर हुसेन राणा भारताच्या ताब्यात आहे. त्याला बोलते करण्याचे कसब असलेले अधिकारीही आपल्याकडे आहेत. हीच बाब काँग्रेसच्या नेत्यांना भयग्रस्त करते आहे.

हे ही वाचा..

“छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटले पाहिजे, पण…”

जग शिवरायांपासून प्रेरणा घेतंय, महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका

सामाजिक तेढ टाळण्यासाठी छत्रपती शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा

ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित जीसीसीमध्ये मोठी वाढ

तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेसच्या वतीने पहिली प्रतिक्रीया पी. चिदंबरम यांनी दिली. जे काही घडले ते आमच्यामुळेच असे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यांच्या हातात असते तर राणाला त्यांनी भारतात कधीच येऊ दिले नसते. जमल्यास त्याचा बाहेरच्या बाहेर काटा काढला असता. काँग्रेसचे नेते पाकिस्तानशी हातमिळवणी करू शकतात का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे होय असेच आहे. नोव्हेंबर २०१५ पाकिस्तान मीडियाला मुलाखत देताना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले होते, ‘जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा संवाद सुरू होणे शक्य नाही’.
मुलाखतकाराने त्यांना रोखले, प्रतिप्रश्न विचारला की, ‘हे तुम्ही आयएसआयला सांगताय का?’ त्यावर ते गडबडले आणि म्हणाले ‘आम्हाला चार वर्षे वाट पाहावी लागले. पुन्हा ते म्हणाले, ‘मोदींना हटवा आम्हाला सत्तेवर आणा दुसरा कोणताही मार्ग नाही.’ अर्थ स्पष्ट आहे, जे काँग्रेस नेते मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी २०१५ मध्ये पाकिस्तानला साकडे घालू शकतात, ते संघाला चिरडण्यासाठी २००८ मध्ये पाकिस्तानची मदत घेणार नाही, असे ठामपणे सांगता येईल?

तहव्वरू राणा हेच कनेक्शन उघड करणार यात ना सत्ताधाऱ्यांना शंका आहे, ना काँग्रेस नेत्यांना. म्हणूनच काँग्रेसची भंबेरी उडाली आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर इतका श्वास कोंडत असेल तर दाऊद इब्राहीमला भारतात आणले तर काँग्रेसचा श्वास बंदच पडेल. काँग्रेसच्या थरथराटाचे कारण हेच आहे. अशक्य ते शक्य करण्याच्या मोदींच्या क्षमतेवर काँग्रेसचा अतूट विश्वास आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version