जा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा…

विधिमंडळातील शक्ती परीक्षेत अजित पवारांचे पारडे जड आहे, हे स्पष्ट झाले आहे

जा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा…

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. विधिमंडळाच्या पायरीवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्याचे शास्त्र आजही विरोधकांनी पाळले. परंतु या घोषणाबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार दिसला नाही. सभागृहात अजित दादांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार दिसले. उघड नसली तरी आतल्या आत ‘जा दादा जा दिल्या घरी सुखी राहा’, अशी भूमिका थोरल्या पवारांनी घेतली की काय, अशी शंका यावी, असे वातावरण पहिल्या दिवशी पाहायला मिळाले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभागृह तहकूब करण्यात आले. सभागृहात अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्ती परीक्षण अपेक्षित होते. स्वतंत्र आसन व्यवस्था असल्यामुळे कोण कोणासोबत आहे, हे स्पष्ट होणार होते. ‘आमच्या बाजूला १९ आमदारांचे बळ आहेत’, असा दावा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. परंतु शरद पवार गटाच्या बाकांवर फक्त आठ आमदार दिसल्यामुळे पाटील यांचा दावा निकाली निघाला.

जितेंद्र आव्हाड यांची जयंत पाटील यांनी प्रतोद म्हणून नियुक्ती जाहीर केलेली आहे. परंतु आव्हाड सभागृहात फिरकलेच नाहीत. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांसाठी जी आसन व्यवस्था करण्यात आली होते, त्यावर बहुसंख्य आमदार होते. चार आमदार अजूनही कोणत्या बाजूला आहेत हे स्पष्ट झालेले नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि मंत्र्यांनी काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले. आजही कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थोरल्या पवारांना भेटायला गेले. ते आशीर्वाद घ्यायला गेले आहेत, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

‘आपण सोबत राहू असा आग्रह’ काल प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना केला होता. आज पुन्हा ते आणि अजितदादांनी थोरल्या पवारांसोबत चर्चा केली. ‘आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही, तुम्हीच आमच्यासोबत चला’, असे बहुधा हे नेते थोरल्या पवारांना पटवत असावेत. काल थोरल्या पवारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. आजही त्यांची भूमिका नेमकी काय होती हे उघड झालेले नाही. मात्र एकूण मामला तळ्यात मळ्यातलाच दिसतोय. हे सगळं चित्र शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जीव खालीवर करणारे आहे.

शरद पवार स्वत: भाजपा सोबत जाणार नाहीत, असे म्हटले जाते. हे खरे जरी असले तरी बाकीचे नेते हळूहळू तिथे सरकतील अशी दाट शक्यता आहे. अजित पवार आता एनडीएमध्ये आणि थोरले पवार यूपीएमध्ये असे चित्र पाहायला मिळणार आहे. हे सगळं शरद पवारांच्या संमतीने होतेय का? असा संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. परंतु यात त्यांच्या मजबूरीचा भाग जास्त आहे.

बंगळुरूमध्ये आज भाजपाविरोधक पक्षांची बैठक सुरू झालेली आहे. पाटण्यात भाजपाविरोधी आघाडीचा प्रयोग सुरू झाला होता. त्याचा पुढचा भाग बंगळुरूत पार पडणार आहे. आज उद्या असे दोन दिवस ही बैठक असेल. पवार आज या बैठकीला जाणार होते, परंतु ते गेले नाही. ‘बहुधा उद्या ते बैठकीला जातील’ अशी शक्यता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पवारांचे चेले संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात पक्ष गमावलेले पवार तिथे गेले काय आणि न गेले काय, त्यातून काय मोठा फरक पडणार आहे.

गेल्या वेळी सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला हजर राहिलेल्या थोरल्या पवारांना फोटो सेशनच्या वेळी मागे ढकलण्यात आले होते. तेव्हा तरी त्यांचा पक्ष एकसंध होता. परंतु आता त्यांच्या पक्षात उभी फूट पडलेली असताना त्यांना किती गंभीरपणे घेतले जाईल?  परंतु पक्ष गमावलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे तीन प्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार असतील तर पवारांनाही तेथे उपस्थित राहायला काय हरकत आहे? पक्षात फूट पडल्यामुळे पवारांनी ही बैठक पहिल्या दिवशी तरी टाळली असावी. पहिल्या दिवशी न जाऊन इतर नेते बैठकीला येण्यासाठी किती गळ घालतात, त्याचा अंदाज थोरले पवार घेत असावेत.

विधिमंडळातील शक्ती परीक्षेत अजित पवारांचे पारडे जड आहे, हे आज स्पष्ट झाले आहे. दोन तृतीयांश आमदार त्यांच्यासोबत नसल्यामुळे दादांच्या सोबत जाणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द होईल, अशी अपेक्षा बाळगून बसलेल्यांचा भ्रमनिरास होणार आहे. जर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सुखाने नांदणार असतील, तर उरलेले आमदार किती दिवस मागे राहणार? ‘आपल्याला पुरोगामी भूमिका घेऊन पुढे जायचे आहे’, असे थोरले पवार काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. ही पुरोगामी भूमिका नेमकी काय असते? ती कशाशी खातात? थोरल्या पवारांच्या दृष्टीने ट्रिपल तलाकचे समर्थनही पुरोगामी असू शकते. परंतु प्रश्न हा निर्माण होतो की विरोधात बसून भाजपाविरोधाच्या भूमिकेला चिकटून बसण्यात कोणाला रस असणार? शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकारणावर नजर टाकली तरी सत्ता यात एकमेव भूमिकेच्या अवतीभोवती ते घोटाळत राहिल्याचे दिसते. ते त्यांच्या सहकाऱ्यांनाही ठाऊक आहे.

हे ही वाचा:

आकांक्षा – अभिजित अंतिम विजेते

नोव्हाक जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणत कार्लोस अल्कराझ विम्बल्डन विजेता

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याने केले कुत्र्याला ठार; कलाकार, कर्मचाऱ्यांत भीती

ते भाजपासोबत जाणार नाहीत, कारण त्यांना भाजपाची भूमिका पटत नाही, असे ते अनेकदा म्हणाले आहेत. परंतु तरीही भाजपाच्या पथ्यावर पडणारी भूमिका त्यांनी अनेकदा घेतलेली आहे. पवारांनी राजकारणात पाच पेक्षा जास्त दशकं काढली. त्यांच्या कारकीर्दीचा हा अखेरचा टप्पा आहे. परंतु सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तरी ही भाजपाविरोधी भूमिका आणखी किती काळ कवटाळून बसतील? त्यामुळे भविष्यात सुप्रिया देखील अजित दादांच्या मागोमाग भाजपा-शिवसेनेसोबत गेल्या तर फार आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही.

‘ शरद पवार नमस्कार करत फिरले तरी पक्ष पुन्हा उभा करतील’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते. ते बोलायला ठिक आहे, प्रत्यक्षात पक्ष उभा करणे, चालवणे हे कर्मकठीण आहे. हे पवारांनाही ठाऊक आहे, त्यामुळे उघडपणे नसले तरी आतून त्यांनी अजित दादांना संकेत दिले असावे, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version