विरोधकांच्या ऐक्याचा बाजार उठणार काय?

पवारांना छत्रपती आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याची आठवण व्हावी, हा मोदींच्या उपस्थितीचा प्रभाव नसेल तर दुसरे काय आहे

विरोधकांच्या ऐक्याचा बाजार उठणार काय?

पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशभरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत असताना त्यात आघाडीवर असलेल्या दोन पक्षांचे दिग्गज नेते यावेळी मोदींच्यासोबत मंचावर उपस्थित होते. राज्यातील मोदीविरोधकांना भोवळ येईल असे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

 

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा लोकमान्यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निमित्त होते लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचे. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव हे काँग्रेसचे नेते होते. दीपक टिळकांचे चिरंजीव रोहित पवार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. कसबा विधानसभा त्यांना दोन लढवली आहे. दोन्ही वेळेला ते दिवंगत गिरीश बापट यांच्यासमोर पराभूत झाले.

 

 

टिळकांच्या पुण्यतिथीला २०२० मध्ये शंभर वर्षे झाली. ब्रिटीश सत्तेविरुध्द भारतीय जनतेचे नेतृत्व करणारे टीळक हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. महात्मा गांधीच्या आधी त्यांनीच काँग्रेसचे नेतृत्व केले होते. परंतु तरीही टीळकांच्या पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष देशभरात साजरे करण्याची बुद्धी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या काँग्रेसला
झाली नाही. काँग्रेसची ओळख कायम गांधी-नेहरुंच्या नावे असावी इतर कोणी देशासाठी परमोच्च योगदान दिले असेल तरी त्याची चर्चा होऊ नये हे गांधी परीवाराचे धोरण राहीले आहे. त्या धोरणाला अनुसरून इतर अनेक दिग्गज नेत्यांप्रमाणे टीळकांनाही वाळीत टाकण्याचे प्रयोग झाले.

 

टीळक परीवाराला याची जाणीव नसेल का? ‘स्वतंत्र, आधुनिक आणि शक्तीशाली भारताचे स्वप्न टीळकांनी पाहीले. राष्ट्रवाद, भारताची पुरातन विद्या, स्वदेशी अर्थकारण हे विचार टीळकांनी सांगितले. तोच विचार पंतप्रधान मोदी यांच्या कार्यात दिसतो’, असे दीपक टिळक म्हणाले. ‘भारताच्या प्रगतीत अतुलनीय योगदान असलेल्या व्यक्तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जेव्हा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा आमच्या समोर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे नावच नव्हते’, असेही दीपक टिळक म्हणाले. ज्यांचे संपूर्ण घराणे काँग्रेसचे आहे, अशा व्यक्तिचे हे मत आहे. सारासार विचार करण्याची क्षमता असलेली व्यक्ति मग ती कोणत्याही पक्षातील असो मोदींचा करीष्मा नाकारू शकत नाही, हे या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ठसठशीतपणे समोर आले.

हे ही वाचा:

६००० गुन्हे दाखल पण ७ जणांनाच अटक का?

टिळकांनी सावरकरांना देशकार्यासाठी प्रोत्साहित केले!

मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!

 

ज्यांना ब्रिटीश भारतीय असंतोषाचे जनक म्हणायचे, त्या टिळकांच्या परिवारातील सदस्यांनी केलेला हा गौरव आहे. परंतु या सोहळ्याचे महत्व फक्त एवढंच नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपा विरोधी आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरुद्ध कडाडून टीका करते आहे. मोदींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करते आहे. हा पुरस्कार सोहळा त्यांच्या दृष्टीने मोठा धक्का होता. शरद पवार यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे काँग्रेसकडून सुचवण्यात आले. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही तसा आग्रह धरला होता. परंतु हे सगळे सल्ले आणि सुचना धाब्यावर बसवून पवार या सोहळ्यात सामील झाले. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि आघाडीतील अन्य विरोधकांपेक्षा त्यांनी मोदींना महत्व दिले.

 

 

पवार कार्यक्रमाला जाणार असे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून मोदींची कान उघाडणी करावी, अशी सूचना काँग्रेसने केली. प्रत्यक्षात पवारांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी मोदींची वेळ आपणच मिळवून दिली होती, त्यामुळे कार्यक्रमाला जावेच लागेल असे पवार म्हणाले. पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर पवारांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हेही उपस्थित होते. हा विरोधकांना दुसरा धक्का. मोदींनी त्यांचा उल्लेख ‘मेरे मित्र’ असा केला. पवारांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून केली. देशात अनेक राज्ये होऊन गेली. मुघलांपासून यादवांपर्यंत प्रत्येक राज्य राज्यकर्त्यांच्या घराण्यावरून ओळखले जात असे, परंतु त्याला अपवाद होता, छत्रपती शिवरायांचा. त्यांचे राज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले. रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले.

 

 

पवार नेहमी शाहु, फुले, आंबेडकर या त्रयींचा गजर करत असतात. त्यात काही वावगे नाही. परंतु या मंचावर त्यांना फक्त छत्रपती आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याची आठवण व्हावी, हा मोदींच्या उपस्थितीचा प्रभाव नसेल तर दुसरे काय आहे?
देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे इतकी कटूता निर्माण झालेली आहे. टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात कटूतेचा लवलेशही नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर आले होते. व्यासपीठावर मोदींच्या पाठीवर थाप देत शरद पवार हास्यविनोद करतायत आणि मोदी अजित पवारांच्या पाठीवर थाप देतायत. रोहीत टिळक मोदींना चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत हे चित्र महाराष्ट्राची जनता पाहात होती.

 

 

मोदींना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित टिळक यांच्याविरोधात काँग्रेसच्या एका गटाने थेट राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. तरीही पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दीपक टीळक आवर्जून म्हणाले की, या पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे नाव आमच्या समोर नव्हते. टिळक परिवाराला दुसऱ्या नावाचा विचार करावासा वाटला नाही. भारत जोडो यात्रा काढणारे राहुल गांधी, दोन राज्यांत सत्ता असलेल्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, तिसऱ्यांदा प.बंगालच्या मुख्यमंत्री बनलेल्या ममता बॅनर्जी, औट घटकेचे बेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापैकी कुणीही नाही.

 

 

हा कार्यक्रम पूर्णपणे गैरराजकीय होता, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतील. पुढील दोन दिवसात पवार मोदींच्या विरोधात काही तरी जोरदार विधान करून इंडिया आघाडीतील मित्रांना शांत करण्याचा प्रयत्न करतील. परंतु काँग्रेस आणि शिउबाठाच्या पोटात या कार्यक्रमामुळे निर्माण झालेला पोटशूळ आणि डोक्यात शिरलेल्या संशयपिशाच्छाचे काय? विरोधकांच्या ऐक्याचे प्रकरण नेमके काय आणि कसे आहे, हे पुण्यात आज स्पष्ट झाले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version