मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे पैशाच्या दोन बॅगा होत्या असा आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. त्यात काहीही आढळले नाही. निवडणुकीच्या काळात पैसे कसे फिरवले जातात, हे राऊतांना चांगले ठाऊक आहे. त्यांनी असे बाष्कळ आरोप करायला नको होते. हे आरोप आता पक्षप्रमुख ठाकरेंना गोत्यात आणण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या काळात पैशाचे गटार वाहते. हे वाहते गटार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अहोरात्र काम करतो आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ मार्चपासून देशभरात ४६५० कोटी किमतींचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये रोकड आहेच, शिवाय एक मोठा हिस्सा दारु, ड्रग्ज, सोने-चांदी आदी किमती धातू यांचा आहे. एक मार्च २०२३ पासून सुरू केलेल्या कारवाईत एवढा ऐवज सापडल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने १५ एप्रिल रोजी जाहीर केले. याचा अर्थ देशभरात रोज शंभर कोटी रुपयांचा माल किंवा रोकड जप्त करण्यात येत आहे. याच काळात फक्त महाराष्ट्रात २३ कोटी रुपये आणि १७ लाख लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला.
निवडणुकीच्या काळात पूर्वी फक्त पैशाच्या थैल्या फिरायच्या आता, त्यात सोन्या-चांदीचा समावेश करायला लागतोय, हा नोटबंदीचा महीमा. काळा पैसा कमी झाला आहे. लोक जास्त रोकड ठेवत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही रात्री साडे आठ वाजता दूरदर्शनवर येतील आणि मित्रों… अशी साद घालत आपला कार्यक्रम करतील अशी भीती धनदांडग्यांच्या मनात आहे. ज्या काळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हा ऐवज पकडला तो असा काळ होता, जेव्हा लोकसभा निवडणुकांमध्ये रंग भरायला पण सुरुवात झालेली नव्हती. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला झाले. त्याच्या महिनाभर आधीचे हे आकडे आहेत. याचा अर्थ निवडणूक आयोग पैशाच्या आवागमनावर बारीक लक्ष ठेवून आहे.
हे ही वाचा:
स्वाती मालीवाल हल्ल्याच्या आरोपावर केजरीवालांनी प्रश्न टाळला
‘भावेश भिंडेकडून ‘मातोश्री’ला किती मलिदा मिळाला? एसआयटी चौकशी करा’
भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!
बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!
मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या नाशिक दौऱ्यात त्यांनी पैशाच्या मोठ्या बॅगा आणल्या होत्या अशाप्रकारचा आरोप वाचाळवीर संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या दौऱ्यात त्यांच्या बॅगा निवडणूक आय़ोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यात काहीही आढळले नाही. तपासणीनंतर हा स्टंट होता असा दावा विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. म्हणजे काहीही केले तरी आक्षेप घ्यायचा असा उबाठा शिवसेनेचा पवित्रा आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून पैशाच्या वाटपावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासणे ही फार छोटी गोष्ट आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात आली आहे. संजय राऊतांनी आरडाओरड करण्याच्या आधीपासून निवडणूक आयोग काम करतोच आहे. उबाठा शिवसेनेच्या चिखलफेकीतून निवडणूक आयोगही वाचला नाही, ही गोष्ट वेगळी, पण निवडणूक आयोग आपले काम चोखपणे करतो आहे. संजय राऊतांची ही डायलॉगबाजी उद्या उबाठा शिवसेनेला अडचणीत आणणार हे निश्चित. कारण उद्या उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची किंवा त्यांच्या अन्य नेत्यांच्या वाहनाची तपासणी झाली, तर आता संजय राऊतांना बोलायची सोय उरणार नाही.
निवडणुकीच्या आधी दारु वाटप आणि पैसे वाटप करण्याची संस्कृती काँग्रेसने या देशात आणली. मतदानाच्या आधी दोन दिवस मतदारांना कोंबडीच्या तंगड्या आणि दारु पाजायची आणि आपली पाच वर्षांची सोय करायची हा नाद लावण्याची सुरूवात काँग्रेसनेच केली. कारण पैसा याच पक्षाकडे होता. त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसून उबाठाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बॅगेकडे बोट दाखवत आहेत.
उद्या महायुतीने महाराष्ट्र पादाक्रांत करत दणदणीत यश मिळवले तर लोकांना या बॅगांची आठवण करून देता येईल. पैशाची ताकद कशी जिंकली अशी आसवं ढाळत आरोप करता येतील, त्यासाठी राऊतांनी ही बोल बच्चनगिरी करून घेतलेली आहे. त्याची ठोस कारणेही आहेत, राज्यात महायुतीला दणदणीत यश मिळणार असे चित्र आहे. राऊतांचे मेंटॉर शरद पवारांना याची जाणीव झाल्यामुळे ते निरवानिरवीची भाषा करतायत. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, अशा प्रकारच्या भविष्यवाण्या करतायत. तोच धागा पकडत राऊतांनी पैशांच्या बॅगांकडे बोट दाखवायला सुरूवात केलेली आहे. महायुतीच्या समोर का हरलो याचे उत्तर देण्यासाठी त्यांनी आणखी एक कारण तयार ठेवले आहे. महाराष्ट्रातील ४८ च्या ४८ जागा जिंकण्याची भाषा करणारे आता, हरण्याच्या कारणांच्या शोधात आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)