ओरडणार, बोंबलणार आणि शांत बसणार…

ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्री बसवता येणे शक्य आहे, हे काँग्रेसला ठाऊक आहे

ओरडणार, बोंबलणार आणि शांत बसणार…

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या एकेकाळच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर्तमानातील हतबलतेबाबत त्यांचे मित्रपक्ष पूर्णपणे आश्वस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जाहीर करण्याच्या मागणीबाबत ते फार गांभीर्याने पाहात नाहीत. चिखेंगे, चिल्लाएंगे और थक हार कर बैठ जायेंगे… हा कोणत्या तरी हिंदी सिनेमातील संवाद आहे. हा संवाद ठाकरेंवर अगदी फिटट् बसतो हे काँग्रेसचे नेतृत्व जाणून आहे. आज-उद्या ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा चेहरा जाहीर करा म्हणून बोंब ठोकणार, तिथे साफ दुर्लक्ष करायचे असे काँग्रेस नेत्यांनी आधीच ठरवले आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिवस. काँग्रेस पक्ष हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करतो. यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबईत येणार आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी पुन्हा एकदा रेटण्यात येणार आहे. १६ ऑगस्ट रोजी मविआच्या निर्धार मेळाव्यात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. उद्या होणाऱ्या मविआच्या बैठकीतही पुन्हा चेहरा नक्की करण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे.

काँग्रेस नेते याबाबत फारसे गंभीर नाहीत, ही बाब पृथ्वीराज चव्हाण यांनी पुरेशी स्पष्ट केलेली आहे. परंतु वेताळाला खांद्यावर मारून घेऊन जाणाऱ्या राजा विक्रमाप्रमाणे उद्धव ठाकरेही आपला हट्ट सोडायला तयार नाहीत.

ठाकरेंचे स्वीय सचिव आणि ताजे ताजे विधान परिषदेवर निवडून आलेले मिलिंद नार्वेकर यांनी ठाकरेंना पत्र लिहीले होते. नार्वेकरांना पत्र लिहीण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा मीडियाकडे बोलून मन मोकळे करता आले असते. संजय राऊत तेच करतात. त्यांनी मीडियात जाहीर केले होते की उद्धव ठाकरे आमचा चेहरा आहेत. पत्रापेक्षा मीडिया जास्त सोयीचा. महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणे ठिक, पण घरच्या घरी पत्र काय लिहायचे? उद्या आदित्य ठाकरे, पत्र लिहून पप्पांचा सल्ला घेतील. एक कागद वाया घालवायची गरजच नव्हती. मातोश्रीवर गेल्यावर कानात सांगितले असते तरी चालले असते. पण नाही… नार्वेकरांना पत्र लिहिण्याचा मोह आवरला नाही.

गेल्या वेळी ठाकरेंचा झंझावात लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा-फडणवीसांना शिव्या घालत महाराष्ट्रभर फिरला, परंतु त्याचा फायदा उबाठा शिवसेनेपेक्षा काँग्रेसला झाला, असा दावा या पत्रात करण्यात आलेला आहे. इतकी मेहनत करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करायचे सोडून काँग्रेसचे नेते प्रचार प्रमुख पदावर बोळवण करतायत, अशी खंत या पत्रात व्यक्त करण्यात आली. तेव्हा विधानसभा निवडणुकीत फक्त पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घ्या, म्हणजे काँग्रेससाठी घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

नार्वेकरांना हे सुचवायचे होते की, मातोश्री मैदान तोफ धडाडत होती, म्हणून तुमची संख्या १ वरून १७ आणि १३ वर गेली. परंतु मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव घेणार नसाल तर ही तोफ फक्त पक्षासाठी धडधडेल. काँग्रेस नेते ठाकरेंना किंमत द्यायला तयार नाही ते नार्वेकरांना कशाला मीठ घालतील? ठाकरेंनी मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी ज्या प्रकारे झटकली ते पाहाता काँग्रेस ठाकरेंना फार महत्व देऊ इच्छित नाही ही बाब स्पष्ट आहे.

हे ही वाचा:

आग्र्यात स्कुटी चालविणाऱ्या मुलीचा पाठलाग; युसूफ, फिरोजला अटक

हाथरस, उन्नाव बलात्कार प्रकरणे हाताळणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडे कोलकाता प्रकरण !

कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?

जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के

ठाकरेंची हतबलता त्यांना माहिती आहे. काय आहे ही हतबलता? ठाकरेंकडे आज ना स्वत:ची विचारधारा आहे, ना मतदार. ठाकरेंचा पक्ष आमच्याच विचारांचा आहे, असा निर्वाळा खुद्द शरद पवार यांनी काही काळापूर्वी दिला होता. हा विचार कोणाचा आहे? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा तर नक्कीच नाही. तो नेहरु आणि गांधींचा. ज्या मतदारामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ९ जागा मिळाल्या तो मतदारही त्यांचा नाही. तो मुस्लीम मतदारही काँग्रेसचा मतदार आहे.

नाशिकमध्ये दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी दंगेखोरांवर कारवाई सुरू केली. मग या दंगेखोरांनी, त्यांच्या नातेवाईकांनी ठाकरेंच्या पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना फोन करून मदतीची मागणी केली. त्या मागणीसमोर वाजे मान तुकवतायत, असा व्हीडीयो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. मान तुकवणे भाग आहे. कारण जी हतबलता ठाकरेंची तीच राजाभाऊंची.  माझ्या तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हटल्यावर जी ऊर्जा शिवतीर्थावर टाळ्यांचा कडकडाट करायची ती उर्जा आज ठाकरेंकडे उरलेली नाही. त्यांची जागा जाळीदार टोपीवाल्या आणि दाढीवाल्या ऊर्जेने घेतली आहे. याच हतबलतेमुळे उबाठा शिवसेनेचे सचिव अबु आजमी यांचे मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी स्वागत झाले. याच हतबलतेमुळे ठाकरेंच्या पक्षाचे सचिव विनायक राऊत हे आझमींचा उल्लेख साहेब असा करतात. ही हतबलता काँग्रेसला ठाऊक आहे.

तुमच्याकडे तुमचा विचार नसेल, तुमचा मतदार नसेल तर तुमच्या मागणी काय? तुमची इच्छा काय याला अर्थ उरतो?  दहा वर्षांनंतर महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बसवण्यासाठी काँग्रेस पक्ष उत्सुक आहे. हे ठाकरेंशिवाय शक्य आहे, हे त्यांना ठाऊक आहे. शरद पवारही काँग्रेसची री ओढतायत, हे पाहण्याशिवाय ठाकरेंकडे पर्याय नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version