मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर राणा याने भारतात होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी केलेली आणखी एक याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २०१२ मध्ये २६/११ हल्लाप्रकरणातील एक आरोपी अबु जुंदाल उर्फ अबु हमजा उर्फ सैयद जबीउद्दीन अन्सारी याला सौदी अरेबियातून उचलले होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुक टकला यालाही दुबईतून झटपट उचलण्यात आले.
राणाचा प्रकरण म्हणजे त्याला फरार घोषित करण्यात आपल्याकडून झालेला उशीर. हे मात्र निश्चित, २६/११ च्या हल्ल्याचे लोकल कनेक्शन जे जुंदाल सांगू शकला नाही, ते तहव्वूर राणा सांगू शकतो. मुंबईवर २००८ मध्ये हल्ला झाला होता. तहव्वूर राणाला फरार घोषित करायला पुढची सहा वर्षे लागली. त्याच वेळी त्याला फरार घोषित केला असता तर कदाचित तो भारताच्या हाती लवकर लागला असता. हा विलंब का लावण्यात आला याचे उत्तर त्यावेळी सत्ताधारी असलेले यूपीए सरकारचे नेतेच देऊ शकतील. कदाचित त्यांना तहव्वूर राणाला गजाआड करण्यापेक्षा कर्नल पुरोहित यांना तुरुंगात डांबण्यात जास्त रस होता.
राणा हा मूळचा पाकिस्तानी. २६/११ च्या हल्ल्यात तो पाकिस्तानी अमेरिकन असलेल्या डेव्हीड कोलमन हेडली याच्यासोबत कटाच्या आखणी पासून सामील होता. या प्रकरणातील एक मोठा मासा अबु जुंदाल हा २०१२ मध्येच भारताच्या ताब्यात आला आहे. जुंदालचा इतिहास खतरनाक आहे. मे २००६ मध्ये खबऱ्यांकडून एटीएसला एक खळबळजनक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे एटीएसने मोहिम हाती घेतली. चांदवड-मनमाड हायवेवर एक संशयास्पद टाटा सुमो आणि टाटा इंडीका या गाड्यांचा थरारक पाठलाग करून त्यांना रोखण्यात आले. यात ३० किलो आरडीएस, १० एक ४७ रायफल आणि ३२०० बुलेट्स सापडल्या. पुन्हा एकदा धमाके घडवण्यासाठी ही रसद आलेली होती.
अबु जुंदाल जो या प्रकरणाचा म्होरक्या होता तो मात्र पोलिसांना चकवा देऊन पळाला. बांगलादेशमार्गे तो आधी पाकिस्तान आणि नंतर सौदी अरेबियामध्ये पोहोचला. रियासत अली अशी नवी ओळख त्याने घेतली होती. तो सौदीमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर त्याच्या अटकेसाठी एक विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. यासाठी सौदी सरकारला विश्वासात घेण्यात आले. सौदी गुप्तचर संस्था ‘जनरल इंटेलिजन्स प्रेसिडेन्सी’सोबत हे ऑपरेशन राबवण्यात आले. पाकिस्तानने जुंदालच्या बचावासाठी तो पाकिस्तानी नागरीक असल्याचा दावा केला, परंतु सौदीने पाकिस्तानच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. फार कागदी घोडे न नाचवता २०१२ मध्ये जुंदालला विनाविलंब भारताकडे सोपवण्यात आले.
हे ही वाचा:
कर्नल सूर्यप्रताप वक्फ विधेयकाचे समर्थन करत होते, ड्रायव्हर वसीमला आला राग आणि…
राहुल गांधींच्या संविधानावरील वक्तव्याबद्दल सुधांशु त्रिवेदींनी हाणला टोला
यमुनानगरमध्ये पंतप्रधान करणार थर्मल पॉवर युनिटचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!
जुंदाल हा बीडच्या गेवराईतला. २६/११ च्या हल्ल्यातील आरोपींना हिंदी शिकवण्याचे काम त्याने केले. ज्या दिवशी हा हल्ला झाला तेव्हा तो पाकिस्तानातील आयएसआयच्या कंट्रोल रुममध्ये होता. त्याला अटक झाल्यापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. जुंदालनंतर २०२८ मध्ये भारताच्या हाती लागलेला आणखी एक मोठा मासा म्हणजे फारुक टकला. माफिया डॉन दाऊस इब्राहीम टोळाचा हा गुंड १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील एक महत्वाचा आरोपी. भारतात आरडीएक्स आणण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती, आरोपींना भारताबाहेर पळवण्यातही तो सामील होता. पाकिस्तान आणि दाऊदच्यामध्ये असलेला तो महत्वाचा दुवा होता. दुबईत बस्तान बसवल्यानंतर तो भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेत दाऊदच्या कारवायांत तो सहभागी झाला.
पैशाची देवाणघेवाण, आरोपींना सुरक्षित निवारा पुरवणे, बनावट पासपोर्ट उपलब्ध करून देणे, हवालाचे व्यवहार बघणे ही सगळी कामे करीत होता. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करून देखील तो २४ वर्षे कायद्याच्या कचाट्यातून दूर राहिला. २०१८ मध्ये एक विशेष ऑपरेशन राबवून त्याची दुबईतून गठडी वळण्यात आली. यूएई सरकारने यात पूर्ण सहकार्य केले. २०१८ मध्ये त्याची झटपट भारतात रवानगी केली. त्याचा २६/११ च्या हल्ल्यात सहभाग नसला तरी तो दाऊद टोळीतला बडा मासा होता, आयएसआयशीही त्याचे संबंध असल्यामुळे या हल्ल्याबाबत त्याच्याकडेही माहिती असण्याची शक्यात होतीच.
जुंदाल आणि फारुक टकला यांच्या अटकेबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे हे त्या मध्यपूर्वेत घडले जिथे एकेकाळी फक्त आणि फक्त पाकिस्तानचा दबदबा होता. तिथे फार लांबण न लावत, आटोपशीर कायदेशीर प्रक्रिया पार पाडत, आखातातील देशांनी ज्या प्रकारे आरोपींना भारताच्या स्वाधीन कऱण्यात सहकार्य केले तसा प्रतिसाद अमेरिकेतून मिळाला नाही. जो बायडन प्रशासनाच्या काळात साधारणपणे २०२१ मध्ये तहव्वूर राणाचे भारतात हस्तांतरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली, परंतु गेली चार वर्षे हा मामला अमेरिकी न्यायालयात रखडलेला आहे.
२६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तहव्वूर राणा. या हल्ल्यातील लोकल कनेक्शनचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अबु जुंदाल. तो २०१२ पासून भारताच्या ताब्यात आहे. तो महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे. २६/११ हल्ल्याचे लोकल कनेक्शन होते असा स्पष्ट निर्वाळा केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या राम प्रधान समितीने दिला होता. परंतु तत्कालिन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही बाब दाबून टाकली. कारण, हिंदू दहशतवादाचा जो ढोल यूपीए सरकारला बडवायचा होता, त्यात हा लोकल कनेक्शनचा उल्लेख मोठा अडथळा ठरला असता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना महाराष्ट्रातून ज्यांचे सहकार्य होते, त्यातला अबु जुंदाल नंबर एकचा आरोपी होता. महेश भटचा मुलगा राहल भट हा तर डेविड कोलमन हेडली सोबत मुंबईत अनेक ठिकाणी फिरला होता. हेडलीला शिवसेना भवनमध्ये घेऊन जाणारा हाच. परंतु त्याचीही फारशी चौकशी झाली नाही.
केंद्रात यूपीएचे सरकार आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार दोघांनाही या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यात रस नव्हता. ना लोकल कनेक्शन तपासण्यात रस होता. तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आता २६/११ च्या हल्ला प्रकरणात न तपासले गेलेले दुवे नव्याने शोधण्याची संधी तपास यंत्रणांना मिळणार आहे. हा हल्ला फक्त पाकिस्तान प्रायोजित होता की भारतातील काही प्रस्थापितांचा या षडयंत्रात सहभाग होता, हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा सवाल आहे. जी माहिती अबु जुंदालकडून मिळाली नाही ती कदाचित राणाकडून कळू शकेल कारण राणा हा आयएसआय़सोबत काम करत होता. कटाच्या आखणीत त्याचा सहभाग होता. हिंदू दहशतवादाची थिअरी सिद्ध करण्यासाठी या हल्ल्याचा वापर करणारे कोण होते, यावर तो निश्चितपणे प्रकाश टाकू शकेल. गेली १७ वर्षे दबलेले एक सत्य उघड होण्याची वेळ जवळ आलेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)