अब्रूचा खिमा – पाव

अब्रूचा खिमा – पाव

महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यापासून कोण संजय राऊत असा प्रश्न अनेक नेत्यांनी उपस्थित केला.  त्यात राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही त्यात समावेश आहे. अनेकांनी असा प्रश्न संजय राऊत यांच्याबद्दल वारंवार विचारल्यामुळे संजय राऊतदेखील या प्रश्नाच्या बहुधा प्रेमात पडलेले आहेत. इतरांबद्दलही ते हाच प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अगदी हाच प्रश्न उपस्थित केला. कोण संजय निरुपम?

हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शिउबाठा गटाची बिनपाण्याने हजामत तर करून घेतलीच शिवाय स्वतःच्या अब्रूचा खिमा पावदेखील करून घेतला. एखादा किडकिडीत शरीरयष्टिचा माणूस आपल्या बेटकुळ्या दाखवत फिरत असतो आणि बघणाऱ्यांना त्याची प्रचंड गंमत वाटत असते, तशी परिस्थिती सध्या शिउबाठा नेत्यांची झालेली आहे.

शिउबाठाची प्रकृती सध्या तोळामासा झालेली आहे. फुटीनंतर तर या पक्षात आता प्राणच शिल्लक नाही. तरीही हे नेते आपल्या ताकदीचा बडेजाव करत फिरत असतात. संजय राऊत सध्या लोकसभेतल्या २३ जागांचा खुळखुळा वाजवत आहेत आणि त्यांच्यासोबत मविआचे इतर नेतेही त्यांचीच री ओढत आहेत.

राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांची दिल्लीतील उठबस वाढलेली आहे. दिल्लीतील नेत्यांशी त्यांची जवळीक वाढलेली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडशी त्यांचे एक जवळचे नाते तयार झाले आहे, असे त्यांना वाटू लागले आहे. या नात्यामुळे संजय राऊत यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. राज्यातील काँग्रेसला जमेस न धरता त्यांना फाट्यावर मारून थेट दिल्लीशी बोलणी करू अशी संजय राऊत त्‍यांना धमकी देत आहेत. राज्यातल्या नेत्यांशी चर्चा न करता दिल्लीशी बोलणी करून लोकसभेच्या २३ जागा आम्ही खेचून आणू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊतांचा फुगा असा फुगत असताना काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्या फुग्याला टाचणी लावली आहे. निरुपम जे बोललेत ते मस्तच आहे. निरुपम असे म्हणाले की, काँग्रेसच्या समर्थनाशिवाय स्वबळावर शिउबाठा महाराष्ट्रात एकही जागा जिंकू शकत नाही. तुमचे डझनावारी खासदार पळून गेलेले आहेत. उरलेले सुद्धा कधी पळून जातील याचा नेम नाही. आता निरुपम एवढे सगळे बोलल्यानंतर संजय राऊत यांना पत्रकार याबाबत विचारणा करणार नाहीत, असे होऊ शकत नाही. जेव्हा पत्रकारांनी राऊत यांना याबाबत छेडले तेव्हा राऊत यांनी आपला आवडता सवाल पत्रकारांसमोर उपस्थित केला. संजय निरुपम कोण? संजय राऊत यांच्या या प्रश्नाला संजय निरुपम यांनी अत्यंत बोचरे उत्तर दिले आहे. हे उत्तर असे आहे की, जे संजय राऊत यांना बराच काळ सलणार आहे.

राऊतांपेक्षा मला जास्त कोण ओळखणार, राऊतांची स्मरणशक्ती बहुधा क्षीण झालेली आहे, अशा प्रकारचा टोला निरुपम यांनी लगावला आहे. या उत्तरामागे खूप मोठा इतिहास आहे. शिवसेनेचा आवाज मराठीप्रमाणे हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठीप्रमाणेच हिंदीतही मुखपत्र सुरू करण्याचा विचार बाळासाहेबांच्या मनात आला. हिंदी सामना सुरू करण्याचा विचार त्यांनी केला आणि माणसे शोधण्यास सुरुवात केली. संजय राऊत यांच्या परिचयामुळे निरुपम बाळासाहेबांपर्यंत पोहोचले.

हिंदी सामनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. हिंदी सामनामुळे निरुपम यांचा राबता मातोश्रीवर वाढला, मातोश्रीवर त्यांची उठबस वाढली. स्वाभाविकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळीकही निर्माण झाली. त्याचा परिणाम १९९५मध्ये जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा निरुपम यांना राज्यसभेचा लॉटरी लागली. प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत सामनाचे कार्यालय आजही आहे. हिंदी सामनात वर्णी लागल्यानंतर निरुपम आपल्या जुनाट स्कूटरवरून येत होते. या निरुपमना मातोश्रीपर्यंत संजय राऊत यांनी नेले पण त्यांना राज्यसभेचा लॉटरी आधी लागली. ज्यांना संजय राऊत यांनी मातोश्रीपर्यंत नेले पण राज्यसभेची लॉटरी मात्र आधी निरुपम यांना लागली, याची सल राऊतांच्या मनात होती. एकूणच कानामागून आली आणि तिखट झाली अशीच परिस्थिती संजय राऊत यांच्याबद्दल होती.

निरुपम आणि राऊत यांच्यामधून विस्तव जात नव्हता. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचा सरकार होते. त्या काळात हिंदी सामनातून निरुपम यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर कठोर टीका केली. त्यानंतर राऊत यांनी आपल्या सामनातील रोखठोक कॉलममधून निरुपम यांची प्रचंड खरडपट्टी काढली. ती इतकी जळजळीत होती की, या लेखातून बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. रोखठोकमधील या लेखानंतर आता संजय राऊत यांची सामनाच्या कार्यकारी संपादकपदावरून तात्काळ उचलबांगडी होणार अशी अनेकांची खात्री झाली होती. पण शिवसेनाप्रमुखांचे मन मोठे असल्यामुळे संजय राऊत बालंबाल बजावले.

संजय निरुपम आणि संजय राऊत यांच्यातील हा दोस्ताना यानंतर अनेक वर्षे असाच राहिला. १९९५मध्ये संजय निरुपम खासदार झाले तर संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी १० वर्षे जावी लागली. २००५मध्ये राऊत खासदार झाले. निरुपम हे आपल्याआधी खासदार झाले हे राऊत विसरू शकणार नाहीत. आजपर्यंत विसरलेले नाहीत. त्यामुळे संजय निरुपम कोण? हा प्रश्न विचारण्याच्या फंदात त्यांनी पडू नये.

निरुपम यांची राजकीय उंची यथातथा राहिली. पण हे विसरतां येणार नाही की, वाजपेयी सरकार असताना सरकारमध्ये प्रभावी मंत्री असलेल्या प्रमोद महाजन यांना निरुपम भिडले होते. याच कारणामुळे त्यांना शिवसेनेतून नारळ मिळाला, पण शिवसेनेतून नारळ मिळाल्यानंतर सुद्धा निरुपम संपले नाहीत. आजही ते सक्रिय आहेत काँग्रेसचे एक नेते आहेत.

राज्यात शिउबाठाची किती ताकद उरली आहे, हे सगळ्या जनतेला ठाऊक आहे. पण ते सत्य जनतेला उघडपणे सांगण्याचे काम निरुपम यांनी केले आहे. शिउबाठा राज्यात स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही, हे सत्य आहे. हे सत्य निरुपम यांनी केलेले आहे.

हे ही वाचा:

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

कर्नाटक: एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात सापडले सांगाडे!

जुन्या फायली, खराब झालेली उपकरणे, जुन्या गाड्यांतून बाराशे कोटींची कमाई

हे सत्य सगळ्यांना माहीत असले तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण हा प्रश्न होता, पण या मांजराच्या गळ्यात एकाने नव्हे तर दोघांनीही घंटा बांधली आहे. त्यापैकी एक म्हणजे वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर आणि दुसरे संजय निरुपम. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने दोन काँग्रेसला असे सांगितले आहे की, राज्यात प्रत्येकाने १२-१२ जागा लढवायच्या. वंचितला वाटते आहे की, जेवढी ताकद त्यांची आहे तेवढीच ताकद शिउबाठाची आहे.

शिउबाठाला पहिली थप्पड दिली प्रकाश आंबेडकरांनी तर दुसरी दिली संजय निरुपम यांनी. निरुपम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, शिउबाठा राज्यात एकही जागा स्वबळावर लढू शकत नाही. आज शिउबाठाचे बळ किती हे जर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारले तरी ते सांगू शकणार नाहीत. कारण प्रचंड संदिग्धता आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीपर्यंत बळकट होण्यापेक्षा त्यात पडझड होईल अशी शक्यता आहे.

निरुपम यांनी हेच सांगितले की, तुमचे एक डझन खासदार पळून गेले आणि उरलेलेही तुमच्यासोबत राहण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत शिउबाठाचे बळ किती हे मविआच्या नेत्याने सांगितले आहे. मविआचे जागावाटपावरून हाणामारी सुरू झालेली आहे. पिक्चर तो अभी शुरू हुआ है.

निरुपम आणि राऊत यांच्यात प्रचंड साम्यस्थळ आहेत. बराच काळ त्यांचा प्रवास समांतर सुरू राहिला. दोघांच्या प्रवास प्रभादेवीच्या सामना कार्यालयातून सुरू झाला. याच कार्यालयातून ते मोठे बनले. याच कार्यालयातून संपादक असलेले हे दोघे राज्यसभेचे खासदार बनले. या दोघांनीही शिवसेना संपविण्याचे काम केले हे दोघांमधील ठळक साम्य.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version