ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी धाड टाकली. त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. साळवींनी दिलासा देण्यासाठी पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. घाबरायचे नाही, रडायचे नाही आता लढायचे, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, या शब्दात धीर दिला.
गेल्या दोन तीन वर्षांतील घटनाक्रम पाहिला तर शिवसेना पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दांचा अर्थ लागत नाही. ठाकरे पाठीशी असणे म्हणजे नेमके काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही जुनेजाणते शिवसैनिकही करीत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वेळा भूषवलेले यशवंत जाधव यांच्या मागे आयकर विभागाचा ससेमीरा लागला होता. त्यांच्याकडे डायरी सापडली होती. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली होती. तेव्हा जाधव दांपत्य मातोश्रीवर हेलपाटे मारत होते. परंतु उद्धव ठाकरे त्यांना भेटत नव्हते. साहेब मिटींगमध्ये आहेत, असे सांगून त्यांची पाठवणी व्हायची. अनेकदा अशा फेऱ्या मारून जेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटले तेव्हा या विषयात मी काही करू शकत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, असा प्रेमळ सल्ला त्यांनी जाधवांना दिला.
आता असं गृहीत धरू की जाधव हे पराकोटीचे भ्रष्ट होते, भ्रष्टाचाराच्या पैशाचे प्रचंड वावडे असलेल्या ठाकरेंना त्यांची प्रचंड चीड होती. जाधवांनी त्यांच्या मातोश्रीला दोन कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ भेट दिले असा उल्लेख त्यांच्या डायरीत सापडल्यामुळेही ठाकरे वैतागले असतील. जाधव त्यांच्या मातोश्रीला इतक्या महागड्या भेटवस्तू आणि रोकड देतात, आपल्याला का देत नाहीत, याचा राग बहुधा त्यांना आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते जाधवांना मातोश्रीवर भेटत नव्हते, असं आपण धरून चालू. परंतु त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना कॅंसर झाल्याची बातमी कळल्यानंतर ठाकरेंनी किंवा त्यांच्या युवराजांनी त्यांची साधी विचारपूसही केली नाही, त्याचे कारण नेमके काय होते. पक्षाच्या आमदाराच्या गंभीर आजाराबाबत कळल्यानंतरही ठाकरे साधी चौकशी करत नाहीत ही पाठीशी उभे राहण्याची काय पद्धत आहे ? पाठीशी उभे राहणारे नेहमी धीर देण्यासाठी उभे राहात नाहीत. काही लोक कडेलोट करण्यासाठीही पाठीशी उभे राहतात.
हे ही वाचा:
‘मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा
मराठी भाषा, संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शन
गाझामधील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा!
शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हीडीयो क्लीपप्रकरणी पोलिसांनी ज्या साईनाथ दुर्गेला अटक केली, त्याचा किस्सा ऐका. दुर्गेची बाजू लढवली महीला वकील धनश्री लाड यांनी. असं म्हणतात, दुनिया गोल आहे. या वकीलीण बाई एकदा शीतल म्हात्रे यांना भेटल्या. म्हणाल्या मी दुर्गे यांच्यासाठी उभी राहिले, परंतु अजून माझी फी मिळालेली नाही. आता एखादा शिवसैनिक जर पक्षासाठी कोणाशी पंगा घेत असेल तर त्याची बाजू लढवण्याची जबाबदारी पक्षाची. त्यासाठी वकील देणे, त्याचा खर्च करणे हे काम पक्षाचे. पक्षाच्या नेत्यांचे. इथेही खिशात हात घालण्याची दानत नाही.
सूरज चव्हाण याला काल ईडीने अटक केल्यानंतर काल आदित्य ठाकरे यांनी तो कसा देशभक्त असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली, वगैरे असे फाजील तर्क दिले आहेत. एक्सवर इतकी बकबक करण्यापेक्षा ठाकरे त्याच्या पाठीशी असल्यामुळे तो फोर्स मल्टी सर्व्हीस या वाळू, माती, विटा पुरवणाऱ्या कंपनीला खिचडी पुरवण्याची ऑर्डर मिळाली हे एकदा जाहीर करून टाका.
भ्रष्टाचार करताना ठाकरे पाठीशी होते, टक्केवारी घेताना पाठीशी होते. त्यामुळेच पालिकेचे अधिकारी थेट जाऊन चव्हाणसोबत गाठीभेटी करत होते, कंत्राटदार त्याला भेटत होते एवढेही ठाकरे यांनी जाहीर केले तरी खूप झाले. वाल्या कोळी कुटुंब पोसायला वाटमारी करत होता. त्याच्या लुटीतून ज्यांचे भरणपोषण होत होते, त्यांना पापात मात्र भागीदार व्हायचे नव्हते. ठाकरेंची भूमिका नेमकी हीच आहे. लुटीत ज्यांची सर्वात मोठी भूमिका होती, ते आता फक्त पाठीशी उभे राहण्याच्या बाता करीत आहेत.
ठाकरे यांनी राजन साळवी यांना दोन वेळा फोन केला, त्यामुळे हजार हत्तींचे बळ आले होते असे साळवी म्हणाले. परंतु साळवींना ठाऊक असायला हवे की तुरुंगात गेल्यानंतर या हजार हत्तींच्या बळासह खडी फोडावी लागेल किंवा चक्की चालवावी लागेल. तुरुंगात जाण्याची वेळ आली तर ठाकरे वकीलाची फी देतील याचीही शक्यता नाही, किंवा तुरुंगात गेल्यावर कुटुंबियांची काळजी घेतील हीही शक्यता नाही. कारण फक्त त्यांचे कुटुंब ही त्यांची जबाबदारी आहे.
कोर्ट कज्जांतून सुटका करण्याचा आणखी एक मोठा मंहामंत्र ठाकरेंना अवगत झालेला आहे. कायद्याचा फास आवळायला लागला की असीम सरोदे याच्या नेतृत्वाखाली एक महापत्रकार परिषद घ्यायची, जेणे करून कोर्टाच्या केसचा फैसला सरोदे पत्रकार परिषदेतच जाहीर करून टाकतील. ठाकरेंची पाठीशी उभे राहण्याची स्टाईल ही अशी आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)