देशपांडे हल्ल्यातील दाखलेबाज अशोक खरातचे भांडूप कनेक्शन काय? गॉडफादर कोण?

देशपांडे हल्ल्यातील दाखलेबाज अशोक खरातचे भांडूप कनेक्शन काय? गॉडफादर कोण?

कोविड काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या तयारीत असताना मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. देशपांडे या पत्रकार परिषदेत जे काही बोलले त्यामुळे या प्रकरणातील भांडूप कनेक्शन उघड झाले आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीसेस प्रकरणातही हेच कनेक्शन समोर आले आहे, हा काही निव्वळ योगायोग नाही. देशपांडेवरील हल्ला हा राजकीय वैमनस्यातून झाला, यात कोणालाच शंका नाही. हल्ल्याचा घटनाक्रम पाहिला तर हल्ला कोणी केला, हे
समजणे फार कठीण नाही.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीस या कंपनीवर कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत माझ्यावर हल्ला झाला, हा देशपांडे यांचा दावा सूचक आहे. सुनील उर्फ बाळा कदम आणि राजीव उर्फ राजू सोलंकी यांना अटक झाली. यापैकी राजू सोलंकी हा हॉटेल व्यावसायिक आहे. केईएमच्या समोर याचे हॉटेल आहे.
बाळा कदम याचा व्यवसाय बिल्डरांशी संबंधित आहे. शिल्लक सेना नेते संजय राऊत आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांचे बंधू भांडूपचे आमदार सुनील राऊत यांच्याशी बाळा कदम यांचे संबंध सर्वश्रूत आहेत.

कोविड काळात वीरप्पन गँगने मुंबईला लुटण्याचे काम केले आहे, असा देशपांडे यांचा दावा होता. या प्रकरणात त्यांनी महापालिका आयुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार सुद्धा दाखल केली होती. संदीप देशपांडे यांच्या हल्लात दोन आरोपांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यापैकी अशोक खरात भांडूपमध्ये राहणारा हा ठाकरे गटाच्या माथाडी सेनेचा पदाधिकारी आहे. हा सुनील राऊत यांचा कार्यकर्ता आहे. या खरातची पार्श्वभूमी पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाची आहे. खूनाचा प्रयत्न, धमकावणे, दरोडा असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. तो काही काळ ठाणे जेलमध्येही मुक्काम करून आला आहे.

२०१२ मध्ये खरात महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरला होता. अशा पार्श्वभूमीच्या माणसाला माथाडी सेनेचा उपाध्यक्ष कोणी केले, याचे उत्तर शोधणे फार कठीण नाही. या खरातचे वरूण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा कदम यांच्यासोबत बरेच फोटो सोशल मीडियावर या हल्ल्यानंतर व्हायरल झाले आहेत.

हल्लेखारांनी देशपांडेंवर हल्ला करताना शिवी घालून तु ठाकरेंशी नडतोयस काय? तू वरूणशी नडतोयस का? या शब्दात धमकावत मारहाण केल्याची माहिती देशपांडे यांनी पोलिसांना दिल्याचे समजते. परंतु या विषयावर भाष्य करणे देशपांडे यांनी टाळले. बाळा कदम आणि अशोक खरात यांचा भांडूपशी संबंध निव्वळ योगायोग नाही. महावीर फर्निचर, ग्रेस फर्निचर यांच्याविरोधात आम्ही तक्रार करणार होतो, त्याचा सुगावा त्यांना लागला असावा त्यातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

भारतीय जवानांचे ‘गलवान’ आणि पॅंगॉन्ग मध्ये घोड्यांवरून पेट्रोलिंग

कसब्यावर बोलू काही…भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

तुनिषा आत्महत्या प्रकरण शिझान खानला न्यायालयाकडून दिलासा

मुंबईकरांना आणखी एक भेट , मुंबई – गोवा मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस

कोविड महामारी आधी ज्यांचा टर्नओव्हर १० लाखही नव्हता त्यांचा टर्नओव्हर कोट्यवधींमध्ये गेला. या कंपन्यांकडे स्वत:कडे कोणतीही वस्तू नसताना यांनी कोविड सेंटरना बेडशीट, गाद्या, खाटा पुरवल्या. परंतु हा पुरवठा फक्त कागदावर होता. वस्तू प्रत्यक्षात कधीच पुरवल्या गेल्या नाहीत. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि या दोन कंपन्यांमध्ये काही गोष्टी खूपच समान आहेत. दोन्ही ठिकाणी मोठ्या कंत्राटांचा अनुभव नव्हता, क्षमता नव्हती. राजकीय कनेक्शनमुळे ही काम मिळाली. सढळ हस्ते बोगस कागदपत्रांचा वापर करण्यात आला. चार आण्याच्या वस्तू ४० रुपयांना महापालिकेच्या म्हणजे पर्यायाने मुंबईकरांच्या गळ्यात मारण्यात आल्या. बेडशीट, पंखे, खाटा, गाद्यांच्या भाड्यासाठी जेवढे पैसे मोजले, त्यात चौपट वस्तूंची खरेदी झाली असती इतका हा घोटाळा मोठा आहे. याच कंपन्यांना जी साऊथ पी नॉर्थ पी साऊथ या प्रभागांची कामे वाटण्यात आली.

अर्थ स्पष्ट आहे की या नवख्या छोट्या कंपन्या फ्रण्टला ठेवून प्रचंड मलिदा खाण्यात आला. हे घोटाळे उघड केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ला झाला होता. आता संदीप देशपांडे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. देशपांडे प्रकरणात अटक झालेला खरात आणि लाईफ लाईन प्रकरणात अटक झालेला बाळा कदम यांचे भांडूप कनेक्शन असे आहे. परंतु बाळा कदम किंवा खरात हे फक्त याप्रकरणातील मोहरे आहेत. त्यांचे कर्तेकरविते कोण, हा कळीचा प्रश्न आहे. ही नावे तपासात उघड होतील का? झालीच तर त्यांना शिक्षा होईल का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.

महाविकास आघाडीच्या काळात विरोधकांवर हल्ले करण्याचे प्रकार सर्रास होत होते. मारहाण करणाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांकडून सत्कारही व्हायचे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ते थांबतील अशी अपेक्षा होती. परंतु देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. हे सरकार ही गुंडगिरी सहन करणार की चिरडणार, याचे उत्तर जनतेला हवे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version