आमदार गुवाहाटीला गेल्यापासून शिवसेनेत आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. जे गेल्या अडीच वर्षात घराबाहेर पडत नव्हते ते पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. सत्ता जातेय ही भावना खूपच वेदनादायी आहे. या वेदना पचायला जड असातात. पोटात मुरडा पडण्याची शक्यता असते. सध्या तरी चित्र तेच दिसते आहे.
अडीच वर्षांपूर्वीचे चित्र आठवा. मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या. सोबत सुमारे अर्धा डझन अपक्षांचीही कुमक होती. सत्ता स्थापन करून कल्याणकारी राज्य देणे युतीला शक्त होते. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत शरद पवारांशी वाटाघाटी करत होते. भाजपाला अंधारात ठेवून हा गेम सुरू होता. मुख्यमंत्री आमचाच असे संजय राऊत वारंवार सांगत असताना भाजपा नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. ज्यांनी निवडणुकीत जिवाचे रान करून प्रचाराचा धुरळा उडवला ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेच्या तयारीला लागले होते. परंतु अचानक शंकेची पाल चुकचुकली. अचानक उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे फोन घेणे बंद केले. आपण फडणवीसांचे फोन घेत नव्हतो हे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेही. पुढे अडीच वर्षात काय काय झालं हा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे.
गेली अडीच वर्षे अहंकाराचे आणि सूडाचे राजकारण केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे चक्र उलटे फिरले आहे. अहंकाराचे गाठोडे बाजूला ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि अल्पमतात आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केल्यानंतरही ही चर्चा बंद झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ देवेंद्र फडणवीस नाही, तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देखील फोन केला होता, म्हणे. पण तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. थोडक्यात बाहेर डरकाळ्या सुरू असल्या तरी प्रत्यक्षात कढी पातळ झालेली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या दणक्याने पुरते हादरलेले आहेत.
‘अहम् ब्रह्मास्मी’चा तोरा उतरलाय. अडीच वर्षात पहिल्यांदा शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. बहुधा पक्षाच्या स्थापनेपासून ही पहिल्यांदाच असावी. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारीणी सुद्धा आहे, हे यानिमित्ताने लोकांना कळले. मंत्र्यांचे सुद्धा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. खासदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. गेली दोन- अडीच वर्षे एकांतात घालवणारे मुख्यमंत्री अचानक सोशल झाले आहेत.
फक्त मुख्यमंत्रीच नाही तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही ऍक्शनमध्ये आले. गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे आमदार म्हणून वरळी मतदार संघात क्वचितच फिरकले. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष होता. अतिवृष्टीमुळे मालाड, कांदीवलीतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी गेले, लोकांचे संसार पाण्याखाली गेले तेव्हाही पालकमंत्री म्हणून लोकांना धीर देण्याची गरज आदित्य ठाकरे यांना वाटली नाही. तेव्हा याबाबत मूग गिळून बसलेला मीडिया आज आदीत्य ठाकरे इन ऍक्शनचे मथळे सजवतो आहे.
वरळी मतदार संघाशी मीठा एवढाही संबंध न ठेवणारे आदीत्य ठाकरे बंडखोरांना दम भरत होते. एअरपोर्टवरून विधान भवनाला जाणारा रस्ता वरळीतून जातो, अशा धमक्या देत होते. धमक्या देण्यासाठी का होईना त्यांना वरळीची आठवण झाली, याबाबत वरळीकरांनी समाधान व्यक्त केले म्हणे.
आदित्य ठाकरे आता ठिकठिकाणी मेळावे घेत फिरत आहेत. आधी दहिसर, कर्जत, अलिबाग असा मेळाव्यांचा त्यांनी धडाका लावला आहे. सत्ता असताना ज्यांच्यावर सत्तेच्या जादुई प्रभावाचे तुषारही उडाले नाहीत, त्या शिवसैनिकांवर आता ठाकरे पिता- पुत्रांचे प्रेम उतू जात आहे. सत्तेचा पाया डळमळायला लागल्यावर मुख्यमंत्री प्रचंड सक्रीय झाले आहेत. दोन दिवसात १६० पेक्षा जास्त शासन आदेश जाहीर करून त्यांनी सक्रियतेचा जागतिक विक्रम केला आहे. अडीच वर्षात इतकी सक्रियता दाखवली असती तर मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टीकेचे धनी व्हायला लागले नसते.
हे ही वाचा:
माकडाला चिप्स देताना तो पडला दरीत!
‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक
… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले
नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी उद्धव ठाकरे अडून बसले होते. स्थानिक आगरी समाजबांधवांनी मोर्चे काढले. शिष्टमंडळ पाठवून बोलणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव ठाकरे यांनी कशाकशाला दाद दिली नाही, पण आता सत्ता जातेय की राहतेय अशी परीस्थिती निर्माण झाल्यानंतर या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नावे द्यायला तात्काळ मान्यता दिली.
सत्ताधाऱ्यांना चांगल्या काळात माज येतो आणि वाईट काळात शहाणपण. सत्तेचा मोह नसलेल्या मुख्यमंत्र्यांचे हे बदलते रंग महाराष्ट्राची जनता पाहते आहे. एका आठवड्यात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली. निष्ठावान मीडियाला हाताशी धरून अजून लोकांचा बुद्धीभेद करण्याचे काम सुरू आहेत. बातम्या पेरून जनतेचे समर्थन मिळाले असते तर नेत्यांनी राजकीय पक्ष न काढता पीआर कंपन्या काढल्या असत्या.
दंडेली करणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते विरोधी विचारांचे समर्थन करणाऱ्यांना झुंडीने तिंबून काढत होते. पोलिसांचा वापर राजकीय धुणी धुण्यासाठी होत होता. विरोधकांचे अटक सत्र सुरू केले होते. विरोधकांना झोडणाऱ्या कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर सत्कार होत होते. आता तेच मुख्यमंत्री पुन्हा एकदा विचारी आणि सुसंस्कृत पणाच्या कोशात शिरत आहेत.
एकीकडे बदललेला राजकीय माहोल आणि राजकीय नेत्यांचे बदललेले रंग मूकपणे पाहाणारी जनता हिशेब चुकते करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्तांतरीची आतूरतेने वाट बघते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)