भाजपाच्या माघारीचा अर्थ काय?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात आली

भाजपाच्या माघारीचा अर्थ काय?

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार होती. भाजपाने या जागेसाठी जय्यत तयारी सुद्धा केली होती. परंतु आज भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपाच्या या माघारीचा नेमका अर्थ काय?

गेल्या दोन दिवसांत अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात वेगवान घडामोडी घडल्या. अंधेरी पोटनिवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार काल मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना भेटले. भाजपाने या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशाप्रकारचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रकारांनी छेडले तेव्हा ते म्हणाले की, आम्ही यापूर्वीही असे निर्णय घेतले आहेत, परंतु हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेऊ. त्यांचा एकूण सूर पाहाता भाजपा अंधेरीतून माघार घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आज दुपारी ही शक्यता प्रत्यक्षात आली. मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना ही माहीती दिली.

भाजपाने महाराष्ट्राची परंपरा जपली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. निवडणूक टळल्यामुळे उलट सुलट चर्चा होणे स्वाभाविक आहे. काल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा माणुसकीहीन, संवेदनाहीन आणि संस्कृतीहीन पक्ष असल्याची टीका केली होती. भूमिका व्यक्त करायला उशीर केला, उशीरा संवेदना दाखवली असा टोला राज ठाकरेंनाही लगावला होता. भाजपाच्या माघारीनंतर अशा प्रकारच्या आणखी काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

महाविकास आघाडी सत्तेवर असताना पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर उत्तर अशा तीन पोट निवडणुका झाल्या. भाजपाने त्या ताकदीने लढवल्या. परंतु राजकारणात परीस्थितीनुसार रणनीती बदलावी लागते. राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्याही बदलाव्या लागतात आणि खेळीही. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात प्रचंड फरक आहे. त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती. राज्यात अराजक माजले असल्याचा आरोप भाजपा नेते करत होते. त्यामुळे जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहतायत याचा अंदाज घेणे आणि महाविकास आघाडीला हादरे देणे हे दोन्ही उद्देश भाजपा समोर होते. आता परिस्थिती वेगळी आहे. भाजपा हा सत्तारुढ पक्ष आहे. सत्तेवर असताना संघर्षाची भूमिका उपयोगी नसते. ती घेतली तर तुमची शिवसेना होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदावर बसून सतत भाजपावर टीका करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते. काहीही झालं तर त्याचा ठपका केंद्र सरकारवर ठेवत होते. सत्ताधारी पक्षाकडून ही रडारड जनतेला अपेक्षित नसते. लोकांना काम आणि विकास हवा असतो. सत्तेवर असताना ज्या चुका उद्धव ठाकरे यांनी केल्या त्या भाजपा टाळण्याचा प्रयत्न करते आहे, हे त्यांच्या फायद्याचेच आहे.

भाजपाने या जागेसाठी महिनाभर तरी तयारी केली होती. या मतदार संघात निवडणूक कार्यालयही सुरू केले होते. परंतु अखेरच्या क्षणी वातावरणाचा अंदाज घेऊन भाजपा या लढती मधून बाहेर पडला. चार पावले मागे जाण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले. अंधेरीची जागा वाढली तरी भाजपाच्या ताकदीत फार भर पडली नसती. शिंदे-फडणवीस सरकारलाही त्याचा फार उपयोग नव्हता.

भाजपाने आपली मूठ झाकली ठेवली. उद्धव गटाला ही जागा मिळाली असली तरी ती जिंकता आली नाही. त्यामुळे ठाकरे यांचा विजय झाला तरी भाजपाचा पराभव झालेला नाही. भाजपाने आपली ताकद आगामी महापालिका निवडणुकींसाठी जपून ठेवली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऐन सणावारात या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण होणारा कडवटपणा टाळून भाजपाने एक प्रकारे जनतेसाठी सुखाची दिवाळी दिली आहे. अन्यथा या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण दिवाळसणात चिखलफेकीचे फटाके तडतडत राहिले असते, सणाच्या आनंदाला गालबोट लागले असते.

हे ही वाचा:

भारतातून गव्हाची दुप्पट निर्यात

पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी सांगितलं पाकिस्तान का आहे मागे?

खोटी बातमी दिल्याप्रकरणी लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

रोहितने शमीला एकच षटक दिले आणि भारताने सामनाच जिंकला

भाजपाच्या माघारीनंतर राज ठाकरे यांचे पत्र ही भाजपाची स्क्रीप्ट होती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टात सुनावणी दरम्यान आले असताना केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही असाच दावा केला आहे. पराभवाच्या भीतीने भाजपाने माघार घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनीही डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने माघार घेतल्याचा दावा केला. ही मंडळी बहुधा सामना वाचत नाहीत. कारण काल शरद पवार यांनी माघारीबाबत जी भूमिका घेतली, त्याचे सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. शिवसेनेने गोपिनाथ मुंडे आणि शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर हीच भूमिका घेतली होती, असा सूरही लावला. परंतु शिवसेना पक्षप्रमुखांनी जी भूमिका मांडली त्याच भूमिकेच्या विरोधात शिवसेनेचे नेते बोलतायत. भाजपाला बेटकुळ्या दाखवण्यापूर्वी त्यांनी किमान ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या दणदणीत यशाकडे तरी नजर टाकायला हवी होती. पण विरोधक काहीही म्हणोत. भाजपाने घेतलेला निर्णय जनतेला मात्र निश्चितपणे रुचला आहे.

२०१४ मध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजपाचे सुनील यादव आणि शिवसेनेचे रमेश लटके हे दोघेही चांगले मित्र. आज ते दोघे जगात नाहीत. दोघांचाही एका पाठोपाठ एक असा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या दिवशी भाजपाने माघार घोषित केली तो दिवस म्हणजे १७ ऑक्टोबर. हा दिवस म्हणजे सुनील यादव यांचा जन्मदिवस. यादव यांच्या जयंतीदिनी लटके यांच्या पत्नीला भाजपाने एकप्रकारे रिटर्न गिफ्ट दिले, असे म्हणता येईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version