आदित्य यांचा हमराज विरोधकांना सामील झाला

कनाल यांच्याकडे आदित्य ठाकरेंची अनेक गुपिते असू शकतील.

आदित्य यांचा हमराज विरोधकांना सामील झाला

शिउबाठाचे युवानेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय जाणारे राहुल कनाल आता ठाकरेंना रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून तसे जाहीर केले आहे. हे कनाल म्हणजे शिवसेनेसाठी ज्यांनी फार कष्ट उपसले, घाम गाळला, पक्ष मोठा करण्यासाठी योगदान दिले, अशा पैकी नाहीत. सत्ता आल्यानंतंर गुळाच्या आशेने जे मुंगळे येतात तसे कनालही आले होते. परंतु त्यांच्या जाण्याने आदित्य यांचा एक हमराज विरोधी गोटात सामील होणार आहे, ही बाब ठाकरेंसाठी धक्कादायक आहे.

राहुल कनाल हे वांद्रे पश्चिम येथे राहतात. बॉलिवूडशी त्यांचे चांगले संबंध आहेत. वांद्रे येथे त्यांचे भाईजान नावाचे हॉटेल आहे. आदित्य यांना बॉलिवूडपर्यंत नेणारे तेच आहेत, असेही म्हटले जाते. परंतु जे काही असेल, राहुल कनाल यांचे आदित्य यांच्या दृष्टीने महत्व होते. ते युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर त्यांना साई संस्थानचे विश्वस्थ पद बहाल करण्यात आले. नवनीत राणा यांचे लीलावती हॉस्पिटलमधील फोटो व्हायलर झाल्यानंतर हेच कनाल हॉस्पिटलच्या सीईओला दम देण्यासाठी सरसावले होते. जेव्हा महापालिकेतील भ्रष्टाचार खोदून काढण्यासाठी आयकर विभागाच्या धाडी सुरू होत्या त्यावेळी कनाल यांच्या घरावरही धाड पडली होती.

याच कनाल यांनी एका ट्वीटद्वारे आदित्य यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. याबाबत ओरड झाल्यानंतर  माफी मागून हा ट्वीट डीलिट केला. हे घडले सप्टेंबर २०२२ मध्ये म्हणजे मविआची सत्ता गेल्यानंतरचा आहे. परंतु नंतर हळूहळू कनाल आणि आदित्य यांचे संबंध बिघडायला लागले. आमच्या दोघांचे संबंध बिघडवण्यासाठी कोणी तरी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे कनाल यांनी म्हटले होते.

कनाल शिवसेनेत प्रवेश करणार असा गौप्यस्फोट नीतेश राणे यांनी केला. शिउबाठाने युवासेनेची पदं गोठवून त्यावर शिक्कामोर्तब केले. पाठोपाठ कनाल यांचा ट्वीट आला. मला हटवले तर चालेल, परंतु ज्या लोकांनी तुमच्यासाठी दिवस रात्र काम केले, त्यांना तुम्ही कसे काय हटवू शकता असा सवाल कनाल यांनी केला असून पता तो चला एरोगन्स क्या है… अशी खंत ही व्यक्त केली आहे. हा एरोगन्स अर्थात उर्मटपणा आदित्य यांचा आहे. काल पर्यंत ज्यांच्या आरत्या ओवाळताना कनाल थकत नव्हते, त्या आदित्य यांचा उर्मटपणा जाता जाता कनाल यांनी वेशीवर टांगला.

अर्थात कनाल आल्यामुळे ठाकरेंचे बळ जेवढे वाढले होते, तेवढेच गेल्यामुळे कमी होईल. अर्थात शून्य. सत्तेत आल्यानंतर जवळच्यांचे भले करण्याचा त्यांना मोठेपणा देण्याचा मोह सत्ताधाऱ्यांना होतो. आदित्य यांनाही झाला होता. त्यातून वरूण सरदेसाई आणि राहुल कनाल यांच्यासारखे लोक मोठे झाले. हे जणू आदित्य ठाकरेंचे सेनापती आहेत, अशा प्रकारे या लोकांचा वावर पक्षात सुरू होता. परंतु त्यांच्या पाठीशी चार लोकही नव्हती हे त्यांचे सत्य.

हे ही वाचा:

लोकल ट्रेनमध्ये लैंगिक छळ करणारा तरूण अटकेत; चित्रा वाघ यांच्याकडून कारवाईची मागणी

तरुणाच्या हत्येनंतर सलग तीन दिवस फ्रान्स पेटलेला

ड्रोनच्या किमतीवरून वाद घालणाऱ्यांनी सत्य तर जाणून घ्या!

अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद

त्यांची पक्षात लावण्यात आलेली वर्णी म्हणजे फक्त आदित्य ठाकरे यांची सोय होती. त्या मोबदल्यात त्यांना पक्षात मोठेपण मिळत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर त्यांनी जुन्या जाणत्यांना बाजूला सारून स्वत:च्या निष्ठावंतांची टीम बनवली तेच आदीत्य यांनी केले. त्यांनी युवा सेनेच्या नावाखाली आपली टीम बनवली. पुढे हीच टीम मूळ शिवसेना म्हणून प्रस्थापित करायची अशी योजना होती. परंतु उद्धव यांनी बनवलेली स्वत:ची टीम आणि आदित्य यांची टीम यात महत्वाचा फरक होता. आदित्य यांच्या टीममध्ये शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचा इतिहास काय याचा गंधवार्ता असलेले लोक कमी होते. कनाल त्यातलेच.

परंतु पाठीशी फार मोठा जमाव नसताना कनाल यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत स्वागत होणार आहे. कारण कनाल आणि आदित्य यांचे ज्या कारणांमुळे फाटले ती कारणे अत्यंत गंभीर आहेत. नेते राजकारण करत असताना आपली गुपितं जपून ठेवतील असे हमराज सोबत बाळगत असतात. मिलिंद नार्वेकर यांना उद्धव यांची सगळी गुपितं माहिती आहेत, प्रफुल पटेल यांना शरद पवारांचे सर्व अंतरंग माहिती आहेत. तसेच कनाल यांना आदित्य यांची सगळी माहिती आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. फटका आदित्य यांना बसणार आहेत. त्यांची अत्यंत खासगी गुपितं माहिती असलेला एक माणूस त्यांच्या विरोधी गोटात गेला आहे. मविआच्या काळात घडलेल्या बॉलिवूडशी संबंधित दोन महत्वाच्या परंतु, अत्यंत गंभीर घटनांवरून पडदा उठवण्यात कदाचित कनाल कारणीभूत ठरण्याशी शक्यता आहे. पडत्या काळात ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे.

न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version