जॉर्ज सोरोस हाच होता यूपीए सरकारचा रिंग मास्टर? ठाकरे- पवार विचारणार का जाब?

जॉर्ज सोरोस हाच होता यूपीए सरकारचा रिंग मास्टर? ठाकरे- पवार विचारणार का जाब?

भारतात नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही काही नवी बाब नाही. अशा काही नेत्यांनी तुरुंगवारीही केली आहे. परंतु देशद्रोहाचा आरोप झालेले राहुल गांधी हे पहिलेच बडे नेते आहेत. काँग्रेस आणि अमेरीकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे संबंध जुने आहेत. देशात यूपीएचे सरकार आल्यानंतर सरकारी तंत्रात त्यांचा हस्तक्षेप होता, अशी बरीच खळबळजनक माहिती उघड होते आहे. केंद्रातील मोदी सरकार हटवण्यासाठी अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणे, देश अस्थिर करणे या खेळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सहभाग का आहे, याचे उत्तर या जुन्या संबंधात आहे. इतकी गंभीर माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसच्या मित्र पक्षांची राहुल यांच्याबद्दल काय भूमिका असणार, हा प्रश्न निर्माण होतोच. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही याचे उत्तर द्यावे लागले. एक तर राहुल गांधी यांचे समर्थन किंवा विरोध करावा लागेल, किमान त्यांना जाब विचारावाच लागेल.

जॉर्ज सोरोस यांचे गांधी- नेहरु परिवाराशी असलेले संबंध जुने आहेत. नेहरु परिवारातील बी. के. नेहरु विदेशात अनेक महत्त्वाच्या पदांवर होते. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासातही कार्यरत होते. मॅक्डोलना फ्रिडमन या हंगेरीअन ज्यू तरुणीसोबत त्यांचा विवाह झाला होता. ज्यांना फोरी नेहरु म्हणून ओळखले जाते. जॉर्ज सोरोस हे ही हंगेरीअन ज्यू परिवारातील आहेत. त्यांचे फोरी नेहरु यांच्याशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्या घरी सोरोस यांची ये- जा होती. फोरी यांच्या मृत्यनंतरही नेहरु गांधी परिवाराशी सोरोस यांचे हे संबंध जारी राहिले.

भाजपा नेत्यांनी सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल यांच्यावर जे काही आरोप केले आहेत, ते संसदेत केलेले आहेत. अर्थात ऑन रेकॉर्ड केले असून त्याचे कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे आहेत. शिवाय काँग्रेस नेतेही या संबंधांवर शिक्कामोर्तब करतायत. शशी थरूर यांचा २००९ चा एक ट्वीट सध्या चर्चेत आहे. २५ मे २००९ रोजी हा ट्वीट कऱण्यात आला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाला. या काळात सोरोस यांचे भारतात आगमन झाले होते. दिल्लीतील इंपिरीअल हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम होता. याच दरम्यान शशी थरुर आणि सोरोस यांची भेट झाली असावी. या ट्वीटमध्ये ‘भारताबाबत सोरोस उत्साहित आहेत आणि भारताच्या शेजारी देशांबाबत उत्सुक’ असे थरुर म्हणतात. सोरोस यांचा उल्लेख ‘ओल्ड फ्रेंड’ असा करतात. शशी थरुर यांची सोरोस यांच्याशी मैत्री असण्याचे कारण उघड आहे.

सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सोरोस इतक्या लगबगीने भारतात का येतात? शशी थरूर यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी का घेतात? असे अनेक सवाल या ट्वीटमुळे निर्माण होतात. सोरोस, थरुर यांना भेटले याचा अर्थ ते अन्य काँग्रेस नेत्यांनाही भेटले असणार हे उघड आहे. जागतिक दर्जाचा एक अब्जाधीश उद्योगपती भारतात येऊन आठवडाभर मुक्काम करतो, ही बाब निश्चितपणे उत्सुकता चाळवणारी आहे. अब्जाधीशांचा वेळेचा हिशोब सेकंदावर चालतो, असे असताना भारतात इतका वेळ का थांबतात? एक आठवडा हा निश्चितपणे छोटा अवधी नाही. सोरोस यांचे २००४ च्या निवडणुकीनंतरही असेच आगमन झाले होते. हा काही योगायोग नाही.

२००४ आणि २००९ मध्ये जॉर्ज सोरोस भारतात आला होता. काही दिवस इथे तळ ठोकून होता. काँग्रेस नेते आणि देशातील वरिष्ठ नोकरशहांच्या गाठीभेटी घेत होता. या सगळ्या कड्या जोडल्यानंतर एक स्पष्ट चित्र समोर येते ते म्हणजे सोरोस यांचे गांधी- नेहरु परिवाराशी असलेले घनिष्ट संबंध यूपीए सरकारच्या काळात अधिक घट्ट झाले. सोरोस यांची सरकारी तंत्रात लुडबुड होती. ही देवाणघेवाण होती. कारण याच काळात सोरोस त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून राजीव गांधी फाऊंडेशनला मोठा अर्थ पुरवठा होत होता. हेच ते कारण आहे, ज्यामुळे मोदी सत्तेवर आल्यानंतर सोरोस अस्वस्थ झालेले दिसतात. कारण सरकारी तंत्रातला त्यांचा हस्तक्षेप संपलेला असतो. मोदी आपल्या तालावर नाचणाऱ्यातले नाहीत, याची त्यांनी खात्री असते. आपली कळसूत्री बाहुली सत्तेवरून दूर झाली, याची सल त्यांना निश्चित असणार. म्हणूनच मोदी यांना सत्तेवरून हटवण्यात सोरोस यांना विलक्षण रस असतो. त्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करणार असे ते जाहीरपणे सांगतात. त्यानंतर भारताच्या अर्थकारणावर एका पाठोपाठ एक हल्ले सुरू होतात. उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य केले जाते. राहुल गांधी आणि सोरोस एकत्र येऊन मिले सुर मेरा तुम्हारा हे गाणे गायला लागतात. भाजपाने या गोड आणि गूढ संबंधातील काही कड्या लोकांच्या समोर आणलेल्या आहेत. सोरोस आणि अमेरीकन डीप स्टेट ओसीसीआरपी या वृत्तसंस्थेला एकत्रितपणे पैसा पुरावतात. हा पैसा सदर वृत्तसंस्थेला मिळणाऱ्या एकूण निधीच्या ७० टक्के इतका प्रचंड आहे.
अमेरिकेतील भारताच्या राजदूतानेही ही बाब कबूल केली आहे की, अमेरीकी एजन्सी ओसीसीआरपीला अर्थ पुरवठा करतात. असे संशयास्पद अर्थकारण असलेल्या वृत्तसंस्थेवर राहुल गांधी यांचे इतके प्रेम का? ही वृत्तसंस्था सतत भारताच्या विरोधात बातम्या पेरते, त्या विश्वसनीय आहेत, असे समजून राहुल गांधी त्यावर पत्रकार परिषदा घेतात. संसदेचे कामकाज ठप्प करतात. हे एकदा नाही, वारंवार होते. सोरोस हेच या खेळाचे रिंग मास्टर असतात.

हे ही वाचा : 

दंतेवाडात चकमक, सात माओवाद्यांना कंठस्नान!

एलन मस्कची संपत्ती ४०० अब्ज डॉलर्स पार!

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

मंत्री मंडळात कोणताही तिढा नाही, फॉर्मुला ठरलाय, लवकरच कळेल

देशात २००४ साली काँग्रेसचे सरकार आले. २००९ मध्ये याच सोरोस महोदयांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ५ टक्के गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. काँग्रेस सरकार सोरोसवर इतके मेहरबान असण्याचे कारण, भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून उघड केले आहे. ते म्हणजे, सोरोसच्या विविध एनजीओ या सोनिया गांधी सर्वेसर्वा असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशनच्या सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी एक आहेत. एकदा या फाऊंडेशनच्या देणगीदारांची यादी खणून काढण्याची गरज आहे. कारण चीनी कम्युनिस्ट पार्टी हा पक्ष सुद्धा राजीव गांधी फाऊंडेशनच्या देणगीदारांपैकी एक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जॉर्ज सोरोस याने फेकलेल्या पैशावर जगतो आहे का? सोरोस यांचे मनसुबे पूर्ण करण्याचे काम राहुल गांधी यांनी खांद्यावर घेतले आहे का? सोरोस याचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य केले जाते आहे का? असे अनेक सवाल निर्माण झाले आहेत. काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.

गांधी- नेहरु परिवाराशी घनिष्ठ संबंध असलेले इंडीयन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचेही सोरोस यांच्या एनजीओच्या गोतावळ्याशी संबंध आहेत. किंबहुना त्यांच्या कामाची दिशाही एकच आहे. काँग्रेसच्या मित्र पक्षांना या आरोपांचे गांभीर्य असेल तर त्यांनी काँग्रेसला जाब विचारण्याची गरज आहे. जर भाजपाच्या आरोपांवर त्यांना विश्वास नसेल तर किमान भाजपाला तरी पुरावे सादर करायला सांगा. राजकारण एका बाजूला ठेवा. देश राहिला तर राजकारण सुद्धा करता येईल. भाजपाने राहुल गांधी यांना देशाचा सगळ्यात मोठा गद्दार म्हटले आहे. महाराष्ट्रातून याबाबत ठाकरे- पवार तोंड उघडणार आहेत का? काँग्रेसच्या सोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा फेर विचार करणार आहेत का? राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे घालण्याचा कार्यक्रम जारी ठेवणार आहेत?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version