बॉलिवूड ही एक विचित्र जमात आहे. शितं तिथे भूतं हे या जमातीचे सूत्र असावे, किंवा सरशी तिथे पारशी म्हणा. एके काळी एचडीआयएल, बॉलिवूड आणि पार्ट्या हे समीकरण होते. ३ ऑक्टोबर २०१९ मध्ये एचडीआयएलचे प्रमुख राकेश वाधवान आणि त्यांचे पुत्र सारंग उर्फ सनी वाधवान पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी तुरुंगात गेले आणि हे समीकरण कोलमडले. शितं गायब झाल्यावर भूतंही गायब झाली.
गणेशोत्सवात वाधवान यांचे पाली हील येथील घर फिल्मी ताऱ्यांनी गजबजलेले असे. हा सगळा सनी वाधवान आणि त्यांची पत्नी अनु दिवान यांचा गोतावळा. २०१९ पर्यंत अनू इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असायची. सेलिब्रेटींचे फोटो ती तिच्या इन्स्टा अकाऊंटवर आवर्जून टाकायची. काल-परवा तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिने टाकलेल्या पोस्टचा अपवाद केला तर तिची शेवटची इन्स्टा पोस्ट जून २०१९ ची आहे. गणेशोत्सव जल्लोषात सुरू आहे. परंतु अनू दिवानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेशोत्सवाचा एकही फोटो नाही. सेलिब्रेटीचा फोटो नाही.
एचडीआय़एल आणि बॉलिवूड हे समीकरण बनवणारी व्यक्ति म्हणजे राकेश यांचा मुलगा सनी. २००७ मध्ये एचडीआयएलचे शेअर बाजारात लिस्टींग झाले. त्यानंतर प्रमोशनच्या नावावर फिल्मी पार्ट्या, फॅशन शोजचे आयोजन करण्यात आले. एचडीआयएलच्या प्रगतीचा आलेख इतका चढा होता की, एचडीआयएलचा शेअर जो अलिकडे तीन ते पाच रुपयादरम्यान फिरत असतो, एकेकाळी १४०० रुपयांपर्यंत जाऊन आला होता. लक्ष्मी वाधवान यांच्या घरी पाणी भरत होती. अनेक आमदार, खासदार, मंत्री त्यांच्या कंपनीसाठी चाकरासारखे राबत होते.
संपत्तीच्या ढिगावर वाधवान कुटुंबिय बसले होते. त्यांच्याकडे एक खासगी यॉट, दोन चार्टर्ट विमाना असा सरंजाम होता. रोल्स रॉईस, पोर्शे, फरारी, लॅम्बोर्गिनी, बीएमडल्ब्यू अशा अनेक महागड्या कारचा ताफा. ही सगळी शानोशौकत वापरण्याची मुभा ताऱ्या सिताऱ्यांना होती. खासगी यॉटवर फिल्मी पार्ट्या होत असत. अनेकदा हा ताऱ्यांचा हा काफीला अलिबागच्या फार्म हाऊसवर एकत्र होत असे. रात्रभर उंची दारूच्या नद्या वाहात असत. अनेकदा बडे बॉलिवुड स्टार सनीकडून चार्टर्ट विमानं वापरायला घेत. सनीच्या पार्ट्या अत्यंत महागड्या असायच्या एकेका पार्टीत किमान कोटी रुपयांचा चुराडा व्हायचा. सनीची पत्नी अनू ही बॉलिवूड ताऱ्यांची विशेष लाडकी होती. अनेकदा ती बॉलिवुडच्या मैत्रिणींसह परदेश दौरे करायची. ही सोय दोघांची होती. अनुसाठी बॉलिवूड ताऱ्यांसोबत फिरणे हे स्टेटस सिम्बॉल होते, तर त्यांच्यासाठी परदेशात फूकट चैन करण्याची सोय.
४ ऑक्टोबर २०१९ रोजी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने राकेश आणि सारंग वाधवान यांना अटक केली. या घटनेला येत्या तीन ऑक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होतील. ही अटक झाल्यानंतर सनी आणि अनु यांना गोचिडासारखे चिकटलेले, त्यांच्यासोबत ऐयाशी करणारे, त्यांच्या पैशावर पुरेपूर मौज करणारे अचानक गायब झाले. अनु दिवान हिचे घट्ट मित्र, सनीच्या मानलेल्या बहिणी, मैत्रिणी सगळेच. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पाश्चिमात्य पद्धतीने गालागाल टेकवून भेटणारे, आता त्यांना टाळू लागले. आपली वाधवान कुटुंबियांशी फारशी ओळख नव्हती.’ ‘कधी तरी पार्टीत भेटायचो’, असे दावे मीडियासमोर करू लागले. सिताऱ्यांना पोलिसांची भूणभूण नको होती, वाधवान यांना लागलेल्या बदनामीच्या काळ्या डागापासून त्यांना दूर राहायचे होते. एकानेही घरी जाऊन अनू दिवान आणि सनीच्या आईची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. सारंग किंवा राकेश यांना तुरुंगात भेटायला जाणे दूरच राहिले.
वाधवान कुटुंबियांची १९३ कोटी रुपयांची मालमत्ता आणि सुमारे ६३ कोटी रुपयांचे किमती जवाहीर ईडीने जप्त केले आहेत. यामध्ये त्यांची खासगी यॉट, दोन चार्टर्ड विमाने, महागड्या गाड्या सगळंच होते. म्हणजे काहीच उरलं नव्हतं. सगळी बँक खातीही गोठवण्यात आली. राकेश वाधवान यांची पत्नी आणि सनीची पत्नी अनू या दोघीच सध्या बाहेर आहेत. कधी काळी रोल्स रॉईससारख्या महागड्या कारमधून फिरणारी अनू दिवान आता इनोव्हा वापरते. एकेकाळी त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी इस्त्रायली कमांडो करण्या इतपत सनी सधन होता. आता तर अनेक खासगी कर्मचाऱ्यांना वाधवान कुटुंबियांनी कामावरून कमी केले आहे.
हे ही वाचा:
“श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जसे पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावं लागणार”
‘अल कायदाशी संबंधित एखादा पुजारी, साधू संत सापडला तर त्याच्यावरही कारवाई होईल’
मागच्या सीटवर बसणारे ७० टक्के लोक बेल्ट्स लावतच नाहीत
पीएमसी बँक आणि पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, तसेच ईडीमार्फत चौकशी सूरू आहे. वाधवान पिता-पुत्रांच्या अटकेला येत्या ३ ऑक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होतील. परंतु ते बाहेर कधी येतील याचा मुहूर्त कोणालाही माहीत नाही.
घपले तुम्हाला कमी काळात उंचीवर नेऊन ठेवतात. प्रचंड माया देऊन जातात. पैशाच्या राशींवर बसलेल्या अशा लोकांच्या आजूबाजूला आशाळभूतांची गर्दी जमा होते. गुळाला मुंग्या याव्यात तशी. पण गुळ संपले की मुंग्याही गायब होतात. कधी काळी सेलिब्रेटींच्या घोळक्यात वावरणारे वाधवान कुटुंबिय सध्या याचा अनुभव घेतायत. काय म्हणावं याला? बाप बडा न मैया, सबसे बडा रुपय्या म्हणावं की समय बडा बलवान म्हणावं?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)