लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठी धमाल सांगली मतदार संघातून झाली होती. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी एकाच वेळी महायुती आणि मविआला धक्का दिला होता. विजयी झाल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ४ जून २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जेमतेम ९९ जागा जिंकलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेची स्वप्न पडू लागली होती. ती झिंग आता उतरली असून काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित नेत्यांचे पाय जमिनीवर आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. विशाल पाटलांना आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले
आहेत.
विशाल पाटील हे एकांडे नाहीत, भाजपाकडे आशेने पाहणाऱ्यांची गर्दी आहे. हे का घडते आहे, हे लक्षात घ्या. काँग्रेसचे राजकारण कायम सत्ता केंद्रीत राहिले आहे. परंतु सत्ता मिळवण्यासाठी लागणारे बळ काँग्रेसने कधीच गमावले आहे. १९८४ नंतर काँग्रेसला कधीही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. पी.व्ही.नरसिंहराव यांचा सत्ता काळ असो किंवा यूपीएचा, काँग्रेसला सत्तेसाठी मित्रपक्षांचा टेकू लागत आला आहे. परंतु काँग्रेसची सध्याची परीस्थिती इतकी विकलांग आहे,
की मित्रांच्या जोरावर सत्ता मिळणे दुर्लभ झालेले आहे.
४ जूनला लोकसभेचे निकाल लागले तेव्हा हे चित्र बदलेले अशी किंचित शक्यता निर्माण झाली होती. काँग्रेसला जागा ९९ मिळाल्या होत्या. भाजपाच्या जागा ३०३ वरून थेट २४० वर आल्या असल्या तरी काँग्रेसच्या तुलनेत एकट्या भाजपाकडे अडीच पट जागा होत्या. म्हणजे २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या होत्या. तरीही एनडीए आणि इंडी आघाडीच्या जागांमध्ये ५९ जागांचा फरक होता. एनडीएचे घटक पक्ष असलेले तेलगू देसम आणि जदयू हे पक्ष आपल्या बाजूला वळवून सरकार स्थापन करण्याच्या खटपटी लटपटी करण्याचा प्रयत्न सुरू होता. निकालानंतर जेव्हा जयराम रमेश,
राहुल गांधी आणि खरगे यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा खरगे यांनी तसे संकेत दिले होते. प्रत्यक्षात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयूचे नेते नीतीश कुमार मजबूतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहिले आणि काँग्रेसचे सत्ता स्वप्न हवेत विरले.
हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण असे की, अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी ज्या काँग्रेसला सत्तेची स्वप्न पडत होती. त्या काँग्रेसचे नेते आता झोपेतून जागे झालेले आहेत. त्यांना वस्तुस्थितीचे भान आलेले आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीत चमत्कार झाला, त्याचे एकमेव कारण काँग्रेसचे सगळे नेते विशाल पाटील यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत या करीष्म्याची पुनरावृत्ती करणे विशाल पाटलांनाही शक्य झाले नाही. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या अपक्ष उमेदवार जयश्री
पाटील यांना विशाल पाटील यांनी पाठींबा दिला. जयश्री पाटील या विशाल यांच्या नात्यातील होत्या. परंतु त्यांचा पराभव झाला. चमत्कार वारंवार होत नाही, याची जाणीव विशाल पाटीलांना झाली.
काही दिवसांपूर्वी महायुतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना डोळा मारला. आमच्यासोबत आलात तर निधी मिळेल, असे गाजर दाखवले. त्याला उत्तर देताना चार दिवसांपूर्वी विशाल पाटलांनी एका जाहीर कार्यक्रमात विधान केले. मंत्रीपद मिळत असेल तर काँग्रेस किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची आपली तयारी आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार जयकुमार गोरे यांचे उदाहरण दिले. विशाल पाटील असे करू शकतात. ते अपक्ष असल्यामुळे दोन तृतीयांश वगैरेची भानगड त्यांना लागू होत नाही. काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रिपद मिळणार नाही, त्यासाठी त्यांना भाजपामध्येच दाखल व्हावे लागेल हे विशाल पाटलांना ठाऊक आहे. भाजपामध्ये जाण्याची तयारी आहे, हे त्यांनी सूचित केले आहे.
हे ही वाचा:
प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात गांधी कुटुंबीय आणि सॅम पित्रोदा यांचे नाव!
सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश
धोनीचा नवा शिलेदार मैदानात उतरतोय!
काँग्रेसचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी ते त्याच संस्कृतीत वाढले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता नाही, दिल्लीत तर अजिबात नाही. चंद्राबाबू आणि नीतीश कुमार यांच्यासारख्या नेत्यांमुळे केंद्र सरकार कायम अस्थिर राहील असा काँग्रेसचा होरा होता. मध्येच सरकार गडगडेल आणि काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल असे खयाली पुलाव पकवण्यात काँग्रेस नेते मग्न होते. परंतु हेच दोन नेते मोदी सरकारचे सगळ्यात मजबूत आधारस्थंभ आणि पंतप्रधान मोदींचे कडवे समर्थक बनले. फक्त २४० खासदार हाताशी
असताना, स्वत:चे बहुमत नसताना मोदी पहील्या दोन टर्मच्या तुलनेत अधिक आक्रमकपणे सरकार चालवतायत. कुठेही बहुमत नसल्याचा न्यूनगंड नाही, कुठेही सरकारच्या स्थिरतेबाबत शंका नाही, असे चित्र आहे.
पंतप्रधान मोदी आत्मविश्वासाच्या एव्हरेस्टवर दिसतात. त्यामुळे एकूणच काँग्रेसमध्ये चलबिचल आहे. राहुल गांधी जोपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व करतायत तोपर्यंत सत्ता टप्प्यातही येणार नाही, हे उमगल्यामुळे ही चलबिचल आहे. अस्वस्थेची पातळी इतकी उंचावली आहे की, कधी काळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनाही पक्षात काही भवितव्य आहे, असे वाटत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून तहव्वूर राणाच्या अटकेपर्यंत थरूर काँग्रेसच्या भूमिकेला छेद देताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना दिसतात. त्यामुळे विशाल पाटीलांना मंत्रिपदाचे डोहाळे
लागले, ही काही आश्चर्यकारक किंवा अपवादात्मक घटना नाही. उद्या नाना पटोले भाजपामध्ये दाखल झाले तर कुणाला फार आश्चर्य वाटायला नको. काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व आपल्याला सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊ शकत नाही, याची जाणीव पक्षातील अनेक नेत्यांना झालेली आहे. ती अधिक खोलवर झिरपत चालली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व ओझे बनले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)