वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मविआतून बाहेर पडले. त्यांनी उमेदवार घोषित करायला सुरूवातही केली. काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मात्र उमेदवार दिला नाही. उलट त्यांना पाठींबा जाहीर केला. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यामुळे मविआतील अंतर्गत साठमारी उघड झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस सातत्याने वंचितबाबत नाराजी व्यक्त करतायत. गेले दोन अडीच महिने मला टॉर्चर केले जात आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मागासवर्गीय आहे, वंचित आहे अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. इथे त्यांनी आंबेडकरांचे नाव घेतले नसले तरी निशाणा मात्र त्यांच्यावरच होता हे स्पष्ट आहे. काँग्रेस आणि वंचितमध्ये कडवटपणा वाढत चालला आहे. एका पत्रकार परिषदेत पटोले यांनी वंचितच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. वंचितला आमची मैत्री मान्य नव्हती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार द्यायची सुरूवात केली, त्यामुळे त्यांना मैत्री नको हे सिद्ध झाले. त्यांना मैत्री नको असेल तर आम्ही कसे थांबणार? या शब्दात पटोले यांनी आंबेडकर यांना लक्ष्य केले.
काँग्रेसने अकोल्यातून डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. इथून प्रकाश आंबेडकर लढतात. काँग्रेस यंदा त्यांना पाडण्यासाठी ताकद लावणार हे निश्चित.
वंचितला आमची मैत्री मान्य नव्हती असे नाना पटोले म्हणतात, परंतु शरद पवार गटाने मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याशी मैत्री करण्यात यश मिळवलेले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मात्र पाठिंबा जाहीर केला आहे. हे खरे तर आश्चर्य आहे. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात विस्तव जात नाही अशी परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर आंबेडकरांनी अनेकदा जळजळीत टीका केली आहे.
या टिकेचे लक्ष्य अनेकदा शरद पवार होते. २०२३ मध्ये ठाकरेंनी जेव्हा वंचितसोबत युती जाहीर केली, तेव्हा शरद पवारांच्या सोबत आमचे भांडण जुने आहे, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले होते. विरोधकांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ताब्यात घेण्याचा वशीकरण मंत्र पवारांना साध्य आहे. त्याची झलक त्यांनी यापूर्वीही दाखवलेली आहे. मविआमधील तीन पक्षांमध्ये एकवाक्यता संपुष्टात आल्याचे संकेत यामुळे मिळत आहेत. शरद पवार यांनी वंचितला गळाला लावल्याची कुजबुज काँग्रेसच्या गोटात सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात वंचित आणि शरद पवारांच्या मैत्रीचा आधार काय हे मात्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस हिताच्या कबरीवर ही मैत्री झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्यात वंचितने मनसेतून फुटून निघालेले वसंत मोरे यांना उमेदवारी दिली असल्यामुळे काँग्रेसचे रंवीद्र धंगेकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे मुरलीधर मोहोळ मात्र मोरे यांच्या उमेदवारीमुळे सुखावले असण्याची शक्यता आहे.
वंचितने नावाला कोल्हापूरात आंबेडकरांनी काँग्रेसचे उमेदवार शाहु महाराज यांना पाठिंबा दिलेला असला तरी तो व्यक्तिगत आहे. वंचितच्या पाठिंब्यासाठी सुप्रिया सुळे यांनी वंचितचे आभार मानले आहेत. बारामती मतदार संघातील चुरस यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!
‘संजय सिंह यांना जामीन दिल्याने तपासावर विपरित परिणाम नाही’
तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा
दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!
वंचित आघाडीने अजून पर्यंत राज्यात २४ जागा जाहीर केल्या आहेत. ते आणखी काही उमेदवार जाहीर करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी निवडणुका होतील अशी शक्यता आहे.भाजपाच्या विरोधात तगडा पर्याय उभा करण्यासाठी वंचित आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न मविआतील नेत्यांनी केला. चार जागा देऊन वंचितची व्होटबँक आपल्या पदरात पाडून घेण्याचा उबाठा गटाचा आणि एकूणच मविआचा प्रयत्न होता. परंतु चार जागांची खिरापत वंचितने नाकारली. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ठाकरे आणि शरद पवारांच्या शिल्लक पक्षांची ताकद किती हे प्रकाश आंबेडकर चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे त्यांना जागा वाटपात घसघशीत वाटा हवा होता. मविआतील नेत्यांना मात्र आंबेडकरांची ताकद चार-पाच जागांच्या पलिकडे आहे, असे वाटत नव्हते.
प्रकाश आंबेडकरांमुळे मविआचे भले झाले नसले तरी मविआचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे भले मात्र होणार आहे. अशा काही लोकांचे भले केल्याच्या मोबदल्यात स्वत:चे भले कसे करून घ्यायचे हे प्रकाश आंबेडकर यांना चांगलेच ठाऊक आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. मविआशी आघाडी झाली असती तरी त्यात त्यांनी वचिंतचा फायदा करून घेतला असता. आता अशी आघाडी होण्याची शक्यता मावळली असताना ते वंचितच्या मतपेढीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. ही ताकद मविआसाठी उपद्रव ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारखे नेते त्यांच्यासोबत व्यक्तिगत तडजोडी करून स्वत:चे भले करून घेत आहेत.
हा महायुती आणि मविआतील महत्वाचा फरक आहे. कधी काळी भाजपाच्या जवळ असलेले महादेव जानकर हे शरद पवारांच्या सोबत जातील अशी शक्यता असताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावून त्यांना आपल्याकडे ओढून घेतले. महायुतीला या खेळीचा फायदा होणार आहे. दुसऱ्या बाजूला मविआचे रिमोट कंट्रोल म्हणवले जाणारे शरद पवार मात्र लेकीच्या मतदार संघापुरता वंचितसोबत सौदा करतात. मविआचा कडेलोट झाला तरी चालेल बारामतीची गढी वाचली पाहिजे यासाठी ही सगळी धडपड. आघाडीतील याच बिघाडीमुळे मविआचा खेळ खल्लास होतो आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)