24 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरसंपादकीयजोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला...

जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…

Google News Follow

Related

महाराष्ट्रात स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांची अजिबात कमतरता नाही. ही मंडळी कायम दलित, शोषित, पीडित, वंचित असा गजर करीत असतात. छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचा दावा करतात. शरद पवार त्यांचे अग्रणी आहेत. याच पवारांनी महाराष्ट्रात जातीय विद्वेषाचे वातावरण निर्माण केले असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा केलेला आहे. हा दावा किती अचूक आहे, हे त्यांचे कट्टर समर्थकच सिद्ध करत आहेत. उत्तम जानकर यांनी समाजातील सोशित-पीडीतांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या  नेत्यांना जोडेपुशांच्या रांगेत उभे केले आहे. उंदीर ठरवले आहे. हेच जानकर पवारांचा मात्र पहाड असा आदरयुक्त उल्लेख करतात. बहुधा त्यांना खोदा पहाड, निकला चुहा ही म्हण माहीत नाही. पहाड पोखरण्याची कला परमेश्वराने फक्त उंदराला बहाल केलेली आहे, हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीय विद्वेषाचा वणवा निर्माण केला. कधी ‘वाजवा तुतारी, हटवा वंजारी’ अशी घोषणा देऊन वंजारी नेत्यांना टार्गेट केले. कधी समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून त्यांनी, त्यांच्या ब्रिगेडी समर्थकांनी ब्राह्मणांना टार्गेट केले. नेता एकदा जातवादी मानसिकतेचा असला तर समर्थकांमध्ये हे झिरपायला किती वेळ लागतो. तथाकथित सवर्ण आणि ओबीसींना टार्गेट करून झाले, आता ते शोषित-पीडितांनाही लक्ष्य करतायत. अत्यंत शेलक्या भाषेत त्यांचा उल्लेख करतायत. पवार आणि त्यांच्या ईको सिस्टीमने निर्माण केलेल्या मारकडवाडी पॅटर्नला गोपीचंद पडळकर, राम सातपुते, सदाभाऊ खोत यांनी टार्गेट केल्यानंतर जी मुक्ताफळे माळशिरसचे राष्ट्रवादी शपचे आमदार उत्तम जानकर यांनी उधळली आहेत, त्यातून राष्ट्रवादी शपच्या नेत्यांच्या मानसिकतेवर झळझळीत प्रकाश पडला आहे.

राम सातपुते यांच्यासारखे मोहीते पाटलांकडे जोडे पुसायला असतात. पडळकरांसारखे बारके चिरके उंदीर पवार नाश्त्याला खातात. ही जानकर यांची मुक्ताफळे आहेत. गमंत बघा, पडळकर आणि जानकर हे दोघेही धनगर समाजाचे. परंतु सरंजामदारांसोबत राहून जानकरही त्यांच्यासारखे वागू बोलू लागलेत. मोहीते पाटलांना मोठे ठरवण्यासाठी आपण आपल्याच समाजबांधवाचा उपमर्द करतो याचाही त्यांना विसर पडला. संत तुकाराम महाराज संतांचा एक गुण सांगतात, ‘आपणा सारीखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे…’ काही असंतांनाही हा गुण लागू होत असावा, अन्यथा पवारांचे चेलेही तितकेच जातवादी झाले नसते. जानकर यांच्या तोंडून मोहीते-पाटील, पवारांसारखी सरंजामी भाषा आली नसती.

पडळकर, सातपुते किंवा सदाभाऊ हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले नेते आहेत. समाजासाठी संघर्ष करत करत ते नेते झाले. त्यांच्या समाजाचा आवाज बनले. पडळकर शरद पवारांवर एकेरी टीका करतात, पातळी सोडून बोलतात ते व्यक्तिगत आकसातून नाही. त्यांचा रोष पवारांच्या कुटील राजकारणावर असतो. जाती-जातीत विखार निर्माण करणाऱ्या त्यांच्या नितीवर असतो. सरंजामदारांची मोट बांधून सत्ताकारण ताब्यात घेण्याच्या त्यांच्या धोरणावर असतो. पवार लोकशाही आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य मानणारे आहेत, त्याचाच वापर करत ते कधी देवाचे बाप बनतात, त्यांच्या व्यासपीठांवरून संतांची, देवादिकांची यथेच्छ निंदानालस्ती केली जाते. पातळी तेव्हाही पाळली जात नाही. पवारांना ते जर चालत असेल तर पडळकर, सातपुते आणि खोतांच्या टीकेमुळे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ होण्याची गरज काय? इतक्या शेलक्या भाषेत आगपाखड करण्याची गरज काय? बरं अशी आगपाखड केल्यामुळे गोत्यात कोण आले तर ते पवारच. सोशल मीडियावर जानकर यांच्या विधानावरून लोकांनी पवारांची यथेच्छ टवाळी केली.

‘पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक उतार चढाव पाहून सुद्धा पहाडासारखे उभे आहेत.’ असे जानकर म्हणतात. आपल्या नेत्यावर कौतुक सुमने उधळणे हा निष्ठा व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. नेत्याच्या विरोधकाचा उंदीर म्हणून उपमर्द करणे हाही निष्ठा व्यक्त करण्याचा प्रकार आहे. अशी निष्ठा व्यक्त करताना अनेकदा लोक हातात दुर्गंधीयुक्त चिखल घेऊन चिवडल्यासारखे करतात. जानकर यांनी तेच केले. ‘असे पाच उंदीर पवार साहेब सकाळच्या नाश्त्यात घेतात’, असे जानकर म्हणतात तेव्हा त्यांचा उद्देश ‘पवार किती मोठे आणि पडळकर-सातपुते किती छोटे’ हे सांगणे इतपत मर्यादीत असतो. परंतु हे करताना आपण आपल्या हातावर डांबर घेऊन नेत्यांचे तोंड काळे करीत आहोत, याचे भान जानकरांना राहात नाही. पवार आणि त्यांचे कन्यारत्न सुप्रिया सुळे यांचे मटणप्रेम सगळ्या जगाला ठाऊक आहे. संकष्टीच्या दिवशी किंवा मंदीरात दर्शनाला जायचे असेल हे विशेष करून उफाळून येते. त्या पवारांनाही मटण परवडेनासे झाल्यामुळे ते आता उंदीरांवर काम चालवतायत, अशी खिल्ली उडवण्याची संधी त्यांनी विरोधकांना दिली.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार; आयईडी स्फोटात दोन जवान जखमी

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

जानकर यांच्या गौप्यस्फोटानंतर लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारतायत, पवारांना जर मटण परवडत नसेल, ते उंदीरांकडे वळले असतील तर आमची काय स्थिती असेल याचा विचार करा, मोदीजी. या मुद्द्यावरून पवारांचे इतके ट्रोलिंग झाले की दिल्लीत ईव्हीएम विरुद्ध मोर्चे बांधणी करण्यासाठी पवारांनी बोलावलेल्या बैठकीला गेलेल्या जानकरांना पवारांनी नको नको तिथे हाणले असेल. पवार हे पहाडच आहेत. हा पहाड गेल्या काही वर्षात पडळकर यांच्यासारख्या उंदीरांनी असा काही भुसभुशीत केला आहे की तो फक्त बाहेरुन विशाल आणि आतून पोकळ झाला आहे. याला कोणी जबाबदार असेल तर ते स्वत: पवार आणि त्यांचे जातवादी राजकारण आहे. ही पवारांची करणी आहे. संविधान बचाओचा घोषा करणाऱ्या पवारांचे समर्थक इतके पेटले आहेत, की ते सांगतायत निवडणूक आयोगाने नकार दिला तरी आणि कोर्टाने नकार दिला तरी आम्ही बॅलेटवर मतदान घेणार. भारतातील लोकशाही संपवण्यासाठी, भारताचा सीरीया करण्यासाठी ही मंडळी जोरात कामाला लागलेली आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा