छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोणाचे ? ते मराठा की मराठी? महाराष्ट्राचे की हिंदुस्तानचे? की छत्रपतींच्या नावाने पक्षाचे दुकान चालवणाऱ्यांचे? अलिकडे उबाठाचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे पेटंट घेतल्यासारखे वागत असतात. गेल्या दहा वर्षातील काही घटनाक्रमाकडे नजर टाकली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. हे काम आता जागतिक पटलावर ठेवण्याच्या तयारीला ते लागले आहेत. या तुलनेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची झेप शिववडा आणि शिवथाळीच्या पलिकडे जाताना दिसत नाही.
केंद्र सरकारने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आहे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला पुन्हा एकदा लवून मुजरा केला आहे. मोदींनी पुन्हा एकदा आपल्या दैवताला साष्टांग दंडवत घातले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रायलाने महाराजांच्या शिवकालीन किल्ल्यांची यादी युनेस्कोला पाठवलेली आहे. जागतिक वारशांच्या प्रतिष्ठीत यादीत त्यांचा समावेश करण्यासाठी. छत्रपतींचा इतिहास आता जागतिक पटलावर मांडला जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पाठवलेल्या यादीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तो किल्ले शिवनेरी. स्वराज्याची राजधानी रायगड, जिथे महाराजांनी अफजल खान फाडला तो प्रतापगड, खान वधानंतर महाराजांनी ताब्यात घेतलेला पन्हाळा, कोकणच्या समुद्रात बांधलेले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, याशिवाय राजगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, साल्हेर आणि जिंजीचा समावेश आहे.जिंजीचा किल्ला तामिळनाडूतला. क्रुरकर्मा औरंगजेबाशी मराठ्यांचा जो २७ वर्ष प्रदीर्घ लढा झाला त्या लढाईत राजधानी रायगडसह बरेच किल्ले पडले होते.
थोरल्या छत्रपतींचा स्वर्गवास झाल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात दाखल झाला. पुढे २७ वर्ष महाराष्ट्रात ठाण मांडून बसला. मुघलांशी संघर्षा दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. धर्मांतरासाठी त्यांचे हाल हाल करण्यात आले. त्यांनी मरण पत्करले परंतु स्वधर्माचा त्याग केला नाही. स्वधर्मासाठी बलिदान केले. छत्रपती राजाराम यांनी हा संघर्ष पुढे चालवला. तामिळनाडूतील जिंजीचा आश्रय घेतला आणि स्वराज्याची लढाई जारी ठेवली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रणरागिणी ताराराणी यांनी हा संघर्ष जारी ठेवला. मुघलांना सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या तलवारीने औरंगजेबाची मस्ती उतरवली. मुघली सल्तनतीचा सूर्य मावळताना पाहून औरंगजेब अल्लाला प्यारा झाला. महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला. पुढे दिल्लीच्या तख्तावरचा बादशहा कोण हे ठरवण्याइतपत शक्ती मराठ्यांच्या हाती आली. हा असा तळपता इतिहास मराठ्यांनी निर्माण केला.
हे सगळे गड-किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचे, त्यांच्या अफाट रणनीतीचे, गनिमीकाव्याचे, दूरदृष्टीचे, मावळ्यांच्या पराक्रमाचे, बलिदानाचे, त्यागाचे साक्षी आहेत. सह्याद्रीच्या पर्वतराजीत, दख्खनच्या पठारावर, पश्चिम घाटात, कोकणाच्या किनारपट्टीत विखुरलेले हे किल्ले शेकडो वर्षांनी आजही ताठ मानेने उभे आहेत. हिंदुस्तानवर आलेले इस्लामी सत्तेचे हिरवे सावट ज्यांनी प्राणांची बाजी लावून रोखले, परतवले नामशेष केले त्या मराठ्यांच्या संघर्षाचा इतिहास कित्त्येक पिढ्यांना सांगण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
शिवकालीन वास्तूकलेचे हे बेलाग, बेजोड, भक्कम नमुने म्हणजे हिंदूंच्या इतिहासाचा मोलाचा ठेवा. या गड किल्ल्यांचे मजबूत तट, बुरुज, बालेकिल्ले, पायवाटा, त्यावरील कोठारे, मंदिरे, बारमाही विहीरी, त्यांचे इतिहास, दंतकथा, पोवाडे, हे सगळं धन दुर्लक्षित होते. छत्रपतींच्या नावाने पक्षाचे दुकान चालवणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा किमान या गडकोटांवर मोठ्या प्रमाणात मजारींची अतिक्रमणे झाली. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय तर खूप दूर राहिला, त्यांचा कब्जा केला जातोय का या विचाराने शिवभक्त अस्वस्थ झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर उभ्या देशाचे दैवत आहे हे त्यांच्या कृतीतून वारंवार अधोरेखित केले. भाजपाने जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या एका कार्यक्रमासाठी मोदी रायगडावर गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बराच वेळ महाराजांच्या समाधी समोर ध्यानस्थ बसले. जणू मनोमन काही संकल्प सोडत होते. बऱ्याच वेळाने ते जेव्हा उठले तेव्हा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना विचारणा केली. मोदी तेव्हा फडणवीसांना काय म्हणाले ते अलौकीक आहे. परंतु ते फडणवीसांच्या तोंडून ऐकणेच योग्य.
मोदींची शिवरायांच्या प्रती असलेले भक्ती मौसमी नव्हती. वाराणसीमध्ये काशी कॉरीडोरचे लोकार्पण करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले. ४ डिसेंबर २०२३ रोजी मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आले होते. १९७१ मध्ये भारतीय नौदलाने कराचीवर केलेल्या हल्ल्यानिमित्त नौदल दिवस साजरा करण्यात येतो. तो सिंधुदुर्गावर साजरा करावा हे यापूर्वी कुणाला सुचले होते? मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आरमाराबाबत त्यांच्या दूरदृष्टीचे, त्यांच्या रणनीतीची प्रशंसा केली. नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींच्या राजमुद्रेचा अष्टकोन मोदींमुळेच अवतरला.
हे ही वाचा:
भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!
तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला
शीना बोरा हत्येप्रकरणी नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंट्री!
अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार
शिवाजी महाराजांच्या नावाने दुकान चालवणाऱ्या किती जणांने हे सुचलं. मविआच्या काळात शिवथाळी सुरू करण्यात
आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने महापौर बंगला लाटला. आणि शिवाजी महाराजांच्या नावाने शिवथाळी सुरू केली. त्यातही फाळके मारले. महाराष्ट्रात असेही महाभाग आहेत, ज्यांना छत्रपतींची जात सतत आठवत असते. आमच्या लेखी छत्रपती प्रभू रामचंद्राच्या कुळातले आहेत. मुघलांच्या मगरमिठीतून तीर्थस्थानांची मुक्तता करावी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. रामचंत्र नीलकंठ अमात्य यांच्या चार पिढ्यांनी भोसले घराण्याची सेवा केली होते. कोल्हापूरकर छत्रपतींच्या आज्ञेनुसार त्यांनी थोरल्या छत्रपतींच्या मृत्यूनंतर ३५ वर्षांनी ‘आज्ञापत्रे’ नावाचा अमूल्य ग्रंथ लिहिला. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या ग्रंथाबाबत म्हणतात, ‘हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषा आणि मराठी राजकीय वाड्मयाचे अपूर्व लेणे आहे’. त्याच ‘आज्ञापत्रा’त काशीविश्वेश्वराची मुक्तता हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते असा स्पष्ट उल्लेख आहे.
महाराजांचे हे स्वप्न कोण पूर्ण करते आहे? ज्यांनी महाराजांच्या नावाने दुकान मांडले त्यांची तेवढी पोच नाही. हे काम मोदी करतायत. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा पट आधी त्यांनी देशासमोर मांडला. आता ते महाराजांचे कार्य जगासमोर आणण्याचा प्रय़त्न करतायत. शिवकालीन इतिहासाचा सुगंध अवघ्या जगात दरवळावा ही मोदींची इच्छा आहे. मोदींनी केवळ अयोध्या मुक्त केलेली नाही. काशीचा विश्वनाथ, मथुरेचा कृष्ण मुक्तीचा त्यांचा पण आहे. महाराजांनाही त्यांच्या कर्तृत्वाला खुजेपणा आणणाऱ्या दुकानदारांच्या कचाट्यातून मुक्त करण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)