ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल गुरूवारी लागला. शुक्रवारी उद्धव ठाकरे शुक्रवारी शनी शिंगणापूरला गेले. शनी देवावर तेलाचा अभिषेक करून त्यांनी चांगला कमरेत वाकून नमस्कार केला. मविआची सत्ता असताना सेक्युलर मित्रांना खूष करण्यासाठी ‘आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही’, अशी डायलॉगबाजी उद्धव ठाकरेंनी अनेकदा केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कल्पनेचे इमले खाली आणल्यानंतर त्यांना शेंडी-जानव्याच्या उपस्थितीत शनी देवाला शरण जावे लागेल.

संकटाचे ढग दाटू लागले की लोकांना देव आठवतो. अगदी नास्तिक माणसंही देव देव करू लागतात. एक किस्सा आठवतो. डाव्या विचारसरणीशी एकनिष्ठ असलेल्या एका लेखकाचा कोकणात कार्यक्रम होता. कार्यक्रम स्थळाजवळ मंदीर होते. लेखक महोदय मान्यवरांसोबत तिथे आले. कार्यक्रम सुरू होण्यापूवी लोक मंदिरात दर्शनाला गेले. त्यांच्यासोबत लेखक महोदयही मंदीरात शिरले. इतरांसोबत त्यांनीही देवाला नमस्कार केला. आयोजकांपैकी एकाला आश्चर्य वाटले. त्यांनी लेखकाला विचारले, ‘अरे तुम्ही तर नास्तिक आहात ना? तुम्ही देव मानत नाही’, मग देवाला नमस्कार कसा केलात?
लेखक महोदय हसले, म्हणाले, ‘मी देव मानत नाही, पण असलाच तर प्रॉब्लेम नको.’ प्रॉब्लेम टाळण्यासाठीच अनेकांना देव हवा असतो. सध्या अडचणींच्या ढिगाऱ्या खाली सापडलेले उद्धव ठाकरेही त्याला अपवाद नाहीत.

‘मी शेंडी जानव्याचे हिंदुत्व मानत नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी कितीही नाक वर करून सांगितले तरी त्यांच्या समर्थकांचा मात्र शेंडी जानव्यावर ठाम विश्वास दिसतो. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला आधी छत्रपती संभाजी नगरमध्ये होम हवन करून घेतले. निकाल लागल्यानंतर त्या होम हवनाचा काही फायदा झाला नाही हे स्पष्ट झाले. परंतु खैरेंनी शेंडी-जानव्याबाबत व्यक्त केलेली निष्ठा कशी विसरता येईल? ‘निकाल तुमच्याच बाजूने लागणार. तुम्ही मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होणार’, याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी इतकी खात्री पटवली होती, की ठाकरे गुढग्याला बाशिंग बांधून तयारच होते. पण शिंदे-फडणवीसांचे सरकार काही हलले नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे परिणाम दूरगामी आहेत. ठाकरेंचे पुन्हा मुख्यमंत्री पदी येण्याचे स्वप्न भंगले. दूरदूर पर्यंत सत्ता आता दृष्टीपथात नाही. हाती असलेलेही जाईल अशी शक्यता आहे. ही जाणीव हतबल करणारी आहे. ही वेळ आली तेव्हा ठाकरेंनाही देव आठवला.

प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे आजोबा. भाजपासोबत असताना उद्धव ठाकरेंना फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट हिंदुत्ववादी विचार आठवत असत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सोयरीक केल्यानंतर त्यांना आपले हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रबोधनकार सोयीचे वाटू लागले. भाजपाचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर वारंवार टीकास्त्र सोडले.

शेंडी जानव्याचे हिंदुत्वाला विरोध म्हणजे नेमके काय? तर कर्मकांडांना विरोध. या कर्मकांडामध्ये यज्ञ, होम-हवन, तंत्र हे सगळेच आले. शिंगणापूरचे शनी मंदीर अत्यंत जागृत आहे. देशभरातून लाखो लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात. ठाकरे इथे आले होते. ते शनी देवाला नमस्कार करीत असताना त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनीवर तेल चढवत होते. याला पुरोगामी भाषेत कर्मकांड म्हणतात. पुरोगाम्याच्या तत्वात अन्नाची अशी नासाडी बसत नाही. पुरोगामी मतानुसार शिवलिंगावर दूध चढवून जसे दूध वाया जाते तसे शनी महाराजांच्या चौथऱ्यावर तेल चढवून तेलही वाया जाते. हे कर्मकांड म्हणजे शेंडी जानव्याचे हिंदुत्व. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानंतर आणि संभाजी ब्रिगेड-वंचित आघाडीशी युती केल्यानंतर शेंडी-जानव्यावर टीका करणे ठाकरेंच्या नव सेक्युलर बाण्याला अनुकूलही होते. हा बाणा गुंडाळून आणि ते शब्द गिळून उद्धव ठाकरे शनी शिंगणापूरचे दर्शन घेते झाले.

हे ही वाचा:

देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड

”द केरळ स्टोरी” पोहोचला १०० कोटींच्या जवळ

स्तूपांचे शहर ‘सांची’त आता भरपूर सौर ऊर्जा

बहिणीच्या लग्नाला आली प्रियांका चोप्रा!

सर्वोच्च न्यायालयाने सत्तेवर परतीच्या वाटा बंद केल्यानंतर त्यांच्यावर शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाला लोंटागण घालण्याची वेळ आली. निकालानंतर शनी मंदिरात का गेले असावे? शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वानुसार कारण ठाकरेंच्या कुंडलीत आहे. ज्योतिष शास्त्राच्या जाणकारांनुसार कन्या लग्न आणि सिंह रास असलेल्या ठाकरेंच्या कुंडलीत शनी बिघडलेला आहे. हा बिघडलेला शनी दुरुस्त केल्याशिवाय मागे लागलेली पीडा टळणार नाही, असा सल्ला काही ज्योतिषांनी दिला असावा.
ठाकरे जर मुख्यमंत्री असते, महाराष्ट्रात जर मविआची सत्ता अजून कायम असती तर ठाकरे शनी मंदिरात तेल चढवायला गेले असते का? शंभर टक्के गेले नसते

एखादी वैचारिक भूमिका घेणे आणि आय़ुष्यभर त्या भूमिकेसाठी जगणे हे थोरामोठ्यांचे लक्षण आहे. सोयीचे राजकारण करणारे कायम बोटावरील थुंकी प्रमाणे भूमिका बदलत असतात. परंतु सत्तेसाठी भूमिका बदलणाऱ्यांना सत्ता गेल्यावर असे सरपटावे लागते. शनीचे दर्शन घेणाऱ्या ठाकरेंना बहुधा शनीचा एक गुण माहीत नसावा. शनी ही न्यायाची देवता आहे. शनी कर्म प्रधान आहे. शनीचे फळ कर्मानुसार मिळते. शनी हा सचोटीचा पाठीराखा आहे. त्याला फसवणूक, दगाबाजी अजिबात खपत नाही. शनीला शरण गेल्यानंतर ठाकरेंच्या मागे लागलेली पीडा संपतेय की नाही, हे येत्या काळात कळेलच. कठीण समय येता, ठाकरेंना शनी कामासं येतो की नाही, याकडे शेंडी-जानवेवाल्यांसह अनेकांचे लक्ष आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version