27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयमर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले...

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियाची चौकशी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा किती तीळपापड झालाय.

Google News Follow

Related

शिवाजी मंदीर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारावर घसरले. अमृता फडणवीस यांच्या व्हॉट्सअप चॅटकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला. आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल, असा इशारा दिला. त्यावर चोख प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरेंना जागा दाखवली आहे.

ठाकरेंनी आज केलेल्या वक्तव्यातून अर्थ इतकाच निघतो की ईडीचा तीर अगदी निशाण्यावर लागला आहे. अलिकडेच मुंबईत ईडीची छापेमारी झाली. त्यात युवा सेनेचा पदाधिकारी सुरज चव्हाण याच्या चेंबूरमधील घरावर धाड टाकण्यात आली होती. चव्हाण हा आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय मानला जातो. धाडीनंतर आदित्य ठाकरे लगबगीने त्याला भेटायला गेले होते.

चव्हाणने काही कंत्राटदारांशी, नेत्यांशी केलेले व्हॉट्सअप चॅट ईडीच्या हाती लागल्याची चर्चा आहे. तशा बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. चव्हाण याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी १७ तास चौकशी केलेली आहे. त्यामुळे ईडीचा तपास कोणाच्या दिशेने चालला आहे, याचे स्पष्ट संकेत मिळतायत. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियाची चौकशी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा किती तीळपापड झालाय हे आज त्यांनी केलेल्या भाषणावरून पुरेसे स्पष्ट होते. मी मर्द आहे, असे उद्धव ठाकरे दर तिसऱ्या भाषणात सांगतात. परंतु सातत्याने महिलांवर बाह्या सरसावताना दिसतात. महिलांना लक्ष्य करणे ही बहुधा त्यांची नीती आहे.

मविआ सत्तेत असताना त्यांनी वारंवार महिलांना लक्ष्य केले. डॉ.स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, कंगना राणावत, नवनीत राणा, सुनैना होले, अशा किती तरी महिलांना लक्ष्य करण्यात आले. तुरुंगात डांबण्यात आले. छळण्यात आले. सत्ता गेल्यानंतरही ठाकरेंनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. ते अजूनही महिलांना लक्ष्य करण्याचे काम करतायत. अमृता फडणवीस त्यांचे नवे टार्गेट दिसते. चव्हाण हा शिवसैनिक आहे, आपला परिवार आहे. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईन, पण परिवाराबद्दल बोलू नका. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही जर त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

आयपीएलमधून थेट कसोटी संघात प्रवेश देताना जरा विचार करा!

वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?

आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार

उद्धव ठाकरे ज्या परिवाराच्या व्हॉट्सअप चॅटवर बोलतायत, त्या चॅट फडणवीसांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिष्का आणि अमृता फडणवीस यांच्यात व्हॉटसअपवर संवाद झाला होता. अनिष्काने अटक करण्यात आलेल्या अनिल जयसिंघानीला सोडवण्यासाठी एक कोटीची ऑफर दिली होती. ही ऑफर न स्वीकारल्यास हे चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी अमृता यांनी अनिष्काच्या विरोधात धमकावणे आणि ब्लॅकमेल करण्याची तक्रार केली होती. याप्रकरणी अनिष्काला अटक सुद्धा झाली.

हे चॅट आरोपपत्राचा भाग आहेत, न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत. मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही कोणाच्या घरात घुसत नाही, घुसलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे नड्डे सैल होतील, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलेले आहे. ठाकरेंची परिस्थिती कोंडीत पकडलेल्या मांजरीसारखी झालेली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियाची ईडीकडून सलग १७ तास चौकशी झाली आहे. त्याचे व्हॉट्सअप चॅटही ईडीच्या ताब्यात आले आहेत. पालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनेक महत्वाची कागदपत्रे, पुरावे संबंधित तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

ही सगळी प्रकरणे मातोश्रीपर्यंत येणार याची ठाकरे यांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शेलक्या भाषेत फडणवीसांना त्यांच्या पत्नीवरून दम देण्याचा प्रय़त्न केला. परंतु हा विस्तवाशी खेळ ठरण्याची शक्यता आहे. बुकी अनिल जयसिंघानी हा कधी काळी शिवसेनेशी संबंधित होता. त्याच्या कन्येने अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध जो बनाव केला, तो कोणाच्या इशाऱ्यावरून केला हे तपासात उघड झालेच असेल. महाविकास आघाडीची सत्ता फडणवीसांमुळे जाऊ शकते हे माहीत असल्यामुळेच मुख्यमंत्रीपदी असताना ठाकरेंनी फडणवीसांचा कार्यक्रम करण्याचा प्रय़त्न केला होता. मविआची सत्ता असताना आपल्याविरुद्ध आपल्या परिवाराविरुद्ध षडयंत्र रचले जात होते, आपल्याला अडकवण्याचा प्रय़त्न केला गेला होता, हा गौप्यस्फोट स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्या कार्यालयात फडणवीसांना गोवण्याचा कट रचण्यात येत होता हे तर फडणवीसांनी विधानसभेत पुराव्यानिशी उघड केले आहे. परंतु त्यांच्या परिवारालाही अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा तपशील मात्र त्यांनी उघड केलेला नाही. अमृता फडणवीस यांनाही मविआच्या सत्ता काळात लक्ष्य करण्यात येत असावे याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे आता फडणवीसांच्या परिवारापर्यंत घसरलेले आहेत. तुमच्या घरात घुसलो तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे प्रति आव्हान फडणवीस यांनी दिलेले आहे.

ठाकरे आणि फडणवीस जे बोलतात त्यात जमीन आस्मानचा फरक आहे. ठाकरे वाट्टेल ते बोलतात, फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. मविआचे सरकार असताना महाराष्ट्राच्या जनतेने याचा अनुभव घेतलेला आहे. फडणवीसांचा माफीयांशी संबंध आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी कोणतेही पुरावे सादर न करता केला होता. तेव्हा दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला आहे, दिवाळी नंतर मी बॉम्ब फोडेन असे आव्हान फडणवीस यांनी मविआची सत्तेवर असताना दिले होते. पुढे काय झाले हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. यावेळी फडणवीस म्हणालेत आम्ही घरी घुसलो तर, तोंड दाखवायला जागा उरणार नाही. थोडक्यात सांगायचे तर आता हातघाईची लढाई सुरू झालेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा