अब की बार, ठाणे, कोकण, एमएमआरमधून उबाठा शिवसेना तडीपार…

कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीत उबाठा शिवसेनेचा पाडाव झाला

अब की बार, ठाणे, कोकण, एमएमआरमधून उबाठा शिवसेना तडीपार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतायत. तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. पहिल्या दोन टर्मच्या तुलनेत तिसऱ्या टर्ममध्ये भाजपाला कमी जागा मिळाल्यामुळे मोदींचे नाक कापल्याचा दावा उबाठा शिवसेनेचे नेते करतायत. वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. कोकण, ठाणे आणि एमएमआर क्षेत्रात उबाठा शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. सर्वाधिक जागा लढवून सुद्धा हा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे.

जवाहरलाल नेहरुंनंतर देशात सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्याचा विक्रम करणारे नेते म्हणून नरेंद्र मोदींची इतिहास नोंद घेईल. नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा देशात विरोधी पक्षाचे अस्तित्व होते कुठे? गेल्या दहा वर्षात देशात तशी परिस्थिती नव्हती. मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशातील विरोधक एकवटला होता. जॉर्ज सोरोस सारख्या आंतराराष्ट्रीय एनजीओ माफीयाने मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी एक अब्ज डॉलर्सची तरतुद केली होती. पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. तरीही मोदी सत्तेवर आले. तिसऱ्यांदा सत्तेवर येणे इतके कठीण असते की ते इंदीरा गांधी यांनाही झेपले नाही. मोदींनी ते शक्य करून दाखवले.

भाजपाच्या ताब्यात आज गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, ही अशी अनेक राज्य आहेत जिथे भाजपाने सतत सत्ता मिळवलेली आहे, टिकवलेली आहे. हे काँग्रेसलाही जमलेले नाही. कारण वारंवार सत्तेत येण्यासाठी काम करावे लागते. महाराष्ट्रात मिळालेली सत्ता उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष टीकवता आली नाही. त्यामुळे मोदीच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाला तिसऱ्यांदा सर्वाधिक जागा मिळतात हा विक्रमच आहे. हे लक्षणीय यश आहे.

महाराष्ट्रात झालेली पडझड भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली आहे. परंतु त्यांनी दिलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीच्या जागांमध्य मोठा फरक असला तरी दोघांच्या मतांमध्ये फक्त .३० टक्क्यांचा फरक आहे. मविआला ४३.९१ टक्के मत मिळाली तर महायुतीला ४३.६० टक्के मतदान झाले. दोघांच्या मतांमध्येही दोन लाखांचा मामुली फरक आहे. मविआला दोन कोटी ५० लाख मत मिळाली तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली. मुंबईत तर महायुतीला मविआपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आहेत.

२०१९ च्या तुलनेत भाजपाच्या मतांचा टक्का फक्त दीडने कमी झालेला आहे. गेल्यावेळी भाजपाला २७.८४ टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे दोघांची ताकद सारखीच आहे. मुस्लीमांची मतं वजा केली तर हिंदू समाजाची किती मतं मिळाली हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा विधानसभा निवडणुकीत वचपा काढू असे फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडून आले!

“फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या पण टीम म्हणून एकत्र काम करत राहणार”

नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचांचा पराभव बांगलादेशींमुळे

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भाजपाविरोधी लढाईचे नेतृत्व देण्यात आले. जागा वाटपात त्यांना सर्वाधिक २१ जागा देण्यात आल्या. शरद पवारांनी लहानपणा घेत सगळ्यात कमी १० जागा लढवल्या. परंतु दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीच्या लढ्यात सर्वाधिक लाभ काँग्रेसला झाल्याचे दिसते. काँग्रेसच्या वाट्याला फक्त १७ जागा आल्या होत्या. महाराष्ट्राचा विचार करता १३ जागा मिळवणारा काँग्रेस हा राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष झाला.

गेल्या निवडणुकीत फक्त १ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला हा मटका लागला आहे. काँग्रेसच्या या पुनरुत्थानाचे संपूर्ण श्रेय उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला जाते. त्या पाठोपाठ भाजपाला दोन आकडी खासदार संख्या मिळवण्यात यश आले. भाजपाचे या निवडणुकीत मोठे नुकसान झाले असले तरी दुसऱ्या क्रमांकाच्या जागा भाजपाला मिळाल्या आहेत.

शरद पवारांनीही दहा जागा लढवून आठ जागा मिळवल्या. परंतु उबाठा शिवसेनेने २१ जागा लढवून त्यापैकी १२ जागांवर पराभवाची चव चाखली.
एवढ्या उठाठेवी करून उबाठा शिवसेनेला काय मिळाले तर फक्त ९ जागा मिळाल्या. त्यांच्या जागा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या जागा यात फक्त दोन जागांचा फरक आहे. एमएमआर क्षेत्रात भाजपा-शिवसेनेला ठाणे, कल्याण आणि पालघर अशा तिन्ही ठिकाणी यश मिळाले. तिन्ही ठिकाणी उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांचा पाडाव झाला.

ठाण्यात येऊन लढण्याची भाषा आदित्य ठाकरे करत होते. ते बाल बाल बचावले. नरेश मस्के यांनी राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केलेला आहे. अर्थात यात भाजपाच्या संजीव नाईक, संजय केळकर, मंदा म्हात्रे, भाजपाच्या अपक्ष गीता जैन यांचा मोठा वाटा आहे.

कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीत उबाठा शिवसेनेचा पाडाव झाला. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी जागा राखली. तर सिंधुदुर्ग रत्नागिरीत भाजपाचे नारायण राणे यांनी ही जागा खेचून आणली. विनायक राऊत या ठाकरेंच्या खंद्या समर्थकाचा पराभव झाला.

ठाणे, कोकण आणि एमएमआर क्षेत्र हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. हे बालेकिल्ले उद्ध्वस्त झालेले आहेत. ठाकरेंच्या पक्षाला सहानुभूती असती तर इथे त्यांच्या वाट्याला पराभव आला नसता.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगरची जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सांदीपान भुमरे यांनी एमआयएमकडून खेचून आणली आहे. औरंग्याच्या कबरीवर सजदा करणाऱ्या इम्तियाज जलील यांचा पाडाव करून भुमरे यांनी ही जागा खेचून आणली. भुमरे यांचे कौतूक आहे. पराभूत झालेले चंद्रकांत खैरे अंतर्गत दगाबाजीकडे बोट दाखवतायत. पक्ष प्रमुखांकडे जाऊन कैफीयत मांडणार असे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यांचा अंगुली निर्देश स्पष्टपणे अंबादास दानवे यांच्याकडे आहे.

जलील यांच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लीम खासदाराचाही पराभव झालेला आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जे काही दिवे लावले त्यात मुस्लीम मतांचा मोठा हात भार लागला आहे. ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या जागा मोठ्या बहुमताने जिंकल्या अशातलाही भाग नाही. वरळीत अरविंद सावंत यांना पाच हजाराचा मामुली लीड मिळाला अशी माहिती नितेश राणे यांनी उघड केलेली आहे.
भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेवर आणून नरेंद्र मोदींनी विक्रम केलेला आहे. नेहरुंनंतर तिसरी टर्म इंदिरा गांधींनाही लाभलेली नव्हती. चंद्राबाबू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केलेला आहे. नीतीश कुमार जर इंडी आघाडीच्या गोटात गेले तरही भाजपा बहुमताचा आकडा गाठू शकतो. या दोघांशिवायही भाजपाला काठावरचे बहुमत मिळू शकते. त्यामुळे मोदींचे नाक कापले याच्या भ्रमात राहू नका. मोदी आहेत ते, जिथे जातात तिथे मजबूती आणतात. गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून गेले तेव्हा तिथे काय परिस्थिती होती ते आठवा. मोदी मजबूतीने सत्ताही राबवतील आणि देशालाही मजबूती देतील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version