बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. भारतात बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार बनून बसले आहेत. रोहिंग्या बांगलादेशींना हुसकावले नाही तर इथे सुद्धा ते संख्या वाढवून डोक्याला ताप करणार ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळे
भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नितेश राणे यांनी बांगलादेशी घुसखोरांचा विषय उचलून धरला आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे खरे तर यावरून राजकारण होऊ
नये, मात्र तशी सुतराम शक्यता नाही. मतपेढीचे राजकारण करणारे पक्ष यात कोलदांडा घालणार हे निश्चित. सध्या दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची याबाबत काय भूमिका आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने बांगलादेशींची धरपकड सुरू आहे. निवडणुकीच्या काळात मालेगावात हजार कोटीचा घोटाळा झाला होता. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. त्याचीच पुढची कडी त्यांनी समोर आणली असून मालेगावात एक हजार ११० बांगलादेशी आणि रोहींग्यांना जन्माचे बनावट दाखले दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. महापालिकेचे अधिकारी, राजकीय नेते यांच्या मदतीशिवाय हे शक्य होऊच शकत नाही. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इथेही बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपा नेते हरदिप सिंह पुरी यांनी आम आदमी पार्टीवर मोठा आरोप केला आहे. आपच्या नेत्यांनी रोहिंग्यांना दिल्लीत स्थायिक होण्यास मदत केली. त्यांना मोफत शिधा, पाणी आणि वीज दिल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावरून आप आणि भाजपामध्ये जोरदार हाणामारी सुरू आहेत.
मालेगाव आणि दिल्लीतील जी काही तथ्य समोर आलेली आहेत, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना इथे रुजवण्यासाठी, मतदार यादीत त्यांच्या घुसखोरीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. मुस्लीम मतांचे लाभार्थी असलेले राजकीय पक्ष रोहींग्या आणि बांगलादेशींना भारतात आश्रयदाते बनले आहेत. मुंबईत अशा अनेक वस्त्या आहेत जिथे तुम्हाला चार-पाच मजली झोपड्या दिसतील. एका घरात १५ ते २० लोक राहतात. या अशा वस्त्या आहेत जिथे
कोण राहते, काय करते त्याचा थांगपत्ता लागणे कठीण असते. कारण इथे प्रशासनाला शिरकाव करण्यास मज्जाव असतो.
बांगलादेशींना महाराष्ट्र सोयीचा वाटतो कारण इथे त्यांना रोटी-कपडा, मकान सगळे काही उपलब्ध आहे. अनधिकृत झोपड्यांत निवारा मिळाला. बोगस कागदपत्रांच्या आधारे रेशन कार्ड मिळाल्यानंतर पोटा पाण्याचा प्रश्नही सुटला. मतदार यादीत शिरकाव झाल्यानंतर मताची किंमतही वसूल करता येते. त्यांना इथून हुसकावणे सोपे नाही. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यांना इथे येण्यापासून रोखायचे असेल तर या घुसखोरांना मतदार बनवणारी जी यंत्रणा इथे कार्यरत आहे, ती मोडून काढावी लागेल. त्यांना जन्माचा दाखला, आधार कार्ड बनवून देणारे, या बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांची मतदार यादीत एण्ट्री देणाऱ्या लोकांना बेड्या ठोकल्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही. भाजपाने या घुसखोरीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. मविआतील घटक पक्ष मात्र हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतायत.
मुंबईत जी काही मुस्लीम पॉकेट्स आहे त्यांचा विस्तार होतोय. मालवणीचे उदाहरण देता येईल इथे कैक वस्त्या अशा आहेत जिथे मुस्लिमांचा टक्का वाढत चालला आहे. हिंदू हळुहळु इथून पळ काढतायत. मुस्लिमांचा हा टक्का कसा वाढतोय, हा जसा चिंतेचा विषय आहे, तसा अभ्यासाचाही विषय आहे. शिवाजी नगर, बैगनवाडी, अणुशक्ती नगर, मानखुर्द अशा वस्त्यांमध्ये हेच घडते आहे. सपा, काँग्रेसचे नेते या वस्त्या वाढवण्यासाठी उघडपणे मदत करतायत. मुस्लिमांचे मसीहा बनलेले उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा या विषयावर तोंड उघडणे सोयीचे नाही. मुंबईत त्यांचे जे १० आमदार जिंकून आले आहेत, ती केवळ मुस्लीम मतांची कृपा आहे. महाराष्ट्रात विजयी झालेले अन्य १० आमदारही त्याच कारणामुळे विजयी झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत एका बाजूला हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन घरोघरी जा असे कार्यकर्त्यांना
सांगायतचे आणि बंद दारा आड मुल्ला मौलवींच्या भेटी घेऊन खलबते करायची असा दुहेरी डाव उबाठा शिवसेनेकडून टाकला जाईल हे उघड आहे.
सत्ताधारी महायुती जोपर्यंत बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात व्यापक कारवाई करत नाही, तोपर्यंत त्यांचे राजकीय आश्रयदाते बिळात बसून राहतील. एकदा का ठोकाठोकी सुरू झाली की, मात्र ही मंडळी मानवाधिकाराच्या नावाखाली
त्यांची पाठराखण करायला बाहेर येतील. तेव्हा फक्त बुलडोजर चालवण्याची तयारी सरकारने दाखवली पाहिजे. म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की या फक्त बाता नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)