विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असताना मविआचे नेते प्रचंड उन्मत्त झाले होते. सत्ता आली तर अमुक करू, तमुक करू अशा प्रकारची भाषा ठाकरे पिता-पुत्रांनी सुरू केली होती. उबाठा शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांचे एक
विधान या काळात प्रचंड गाजले. आमची सत्ता आली तर दादागिरी करणाऱ्यांना बर्फाच्या लादीवर झोपवू. लादीवर झोपवण्याची स्वप्न पाहाणारे या निवडणुकीत साफ झोपले. त्यामुळे आता कोण कोणाला लादीवर झोपवणार असा सवाल निर्माण झाला आहे. निवडणुकीचे अंतिम आकडे अजून आलेले नाहीत, परंतु उबाठा शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहे.
गांधी परिवाराला देशाचे कायदे लागू होत नाहीत. हा परिवार कायद्यापेक्षा मोठा आहे, हा जसा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांचा गैरसमज आहे, तसा तो महाराष्ट्रात ठाकरेंचाही आहे. आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. निवडणुकीच्या काळात त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरे तडतडत होते. सामान तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेणे, त्यांचे व्हीडियो शूट करणे, त्यांची नावे विचारणे, त्यांना दमात घेणे असा सगळा आचरटपणा त्यांनी केला. याच काळात त्यांचे युवराज इतरांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची धमकी देत होते.
आमचे सरकार आले तर… अमुक करू, तमुक करू असे ठाकरे पोलिसांना धमकावत होते. निवडणुकीत राजकीय पारा वाढलेला असतो, म्हणून अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली का? तर नाही. मविआची सत्ता गेल्यानंतर, बुडाखालून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सरकल्यानंतर हे सुरू झाले होते. विधानसभा निवडणुकीत कडेलोट होईपर्यंत सुरू राहिले. गेली अडीच वर्षे हेच सुरू होते. आपल्या हाताखाली काम करणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोच कसा? हा जळफळाट त्या मागे होता. त्यातून सतत मुख्यमंत्र्यांचा मिंधे म्हणून उल्लेख झाला. मर्दाची अवलाद असलास तर… ? अशा प्रकारची भाषा वापरली गेली. त्यांच्या नातवाचा भरसभेत कार्टा असा उल्लेख करण्यात आला. जनतेतून विजयी झालेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले.
ज्यांनी हा माज दाखवला त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे. वारसा हा विचारांचा असतो हे महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध केलेले आहे. बापाचे नाव लावून मतं मिळत नाहीत. त्याच्यासाठी बापाच्या विचारांवर चालावे लागते. हिंदुदृदय
सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बनवणाऱ्या, वोट जिहादची तिरडी खांद्यावर घेणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. सदासर्वदा सहानुभूतीवर जगता येत नाही, हे उद्धव ठाकरेंना जनतेने दाखवून दिलेले आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत उजवे ठरले ते त्यांच्या कामामुळे. आज मविआचा एकूण आकडा आणि शिवसेनेच्या आमदारांचा आकडा जवळपास सारखा आहे. त्यातून एक बाब स्पष्ट झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त पक्ष आणि चिन्ह गमावले नाही. त्यांना त्यांचा मतदारही गमावला. काँग्रेससमर्थक राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला यांनी हे सत्य ठाकरेंना सुनावले होते.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!
“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”
राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!
सायबर ठगांसाठी बँक खाती पुरविणाऱ्या आमीर मणियारला अटक
कडवट हिंदुत्ववादी असलेल्या शिवसैनिकांनी, त्यांच्या हिंदत्ववादी मतदारांनी ठाकरेंना नाकारल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. शिवसेनेच्या परंपरागत मतदारांनी ठाकरेंचे मुस्लीम तुष्टीकरण नाकारले आहे. कट्टरवाद्यांच्या दाढ्या कुरवाळताना त्यांनी हिंदुत्वाची बदलेली व्याख्या नाकारली आहे. जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावर पसंतीची मोहोर उमटवली आणि उद्धव ठाकरेंच्या बोगस हिंदुत्वाला सणसणीत लाथ घातली. काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, तशी वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ
केल्यानंतर जनतेने त्यांचे दुकान बंद केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे काढणाऱ्या ठाकरे पितापुत्रांना महाराष्ट्राच्या जनतेने आता गळा काढायला भाग पाडले आहे.
महाराष्ट्रात जेव्हा मविआचे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र येऊन खाली खेचले तेव्हा उद्धव ठाकरे यांचा फक्त राजकीय पराभव झाला होता. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना निर्णायक पराभव केलेला आहे. कितीही कोलांट्या मारल्या तरी जनता शेळ्या मेंढरांसारखी मागे येईल हा ठाकरेंचा गैरसमज या निवडणुकीने संपवला. राम मंदीराच्या विरोधात केलेली वक्तव्य ठाकरेंना भोवली. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असताना बाहेर काढलेले दात त्यांच्या घशात घातले. वोट जिहादच्या, मुल्ला मौलवींच्या नादी लागलेल्या ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने साफ बुडवले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)