राजापूरात काल गुरूवारी रिफायनरी समर्थक आणि विरोधकांची एकत्रित सभा झाली. रिफायनरी बारसूतच तर होणार, हे चित्र या सभेमुळे स्पष्ट झालेले आहे. राज्याच्या विकासात अडथळा बनलेल्या शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रथाचे चाक बारसूत निश्चितपणे रुतणार आणि हा विषय ताणण्याचा प्रयत्न केला तर शिउबाठाचे उरलेसुरले अस्तित्वही धोक्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेघ.
मुख्यमंत्रीपदी असताना तब्बल अडीच वर्षे घरी बसलेल्या उद्धव ठाकरेंना कोकणातील बेरोजगार तरुणांच्या वेदना लक्षात येण्याचे काहीच कारण नाही. परंतु कोकणातील तरुणाच्या मनात ही वेदना ठसठसते आहे. कोकणातील तरुण सुशिक्षित आहे, परंतु जिथे घर आहे, तिथे संधी नाही. त्यामुळे घरादारापासून दूर जाणे या तरुणाचे भाग्य बनले आहे. बाहेर जाऊनही चांगली नोकरी, भरपूर पगार मिळतो अशी परिस्थिती नाही. जे मिळेल ते काम करून चार पैसे कमवावे लागतायत. हे चित्र बदलण्याची क्षमता रिफायनरीमध्ये आहे.
काल राजापूर शहरात रिफायनरी समर्थक आणि विरोधकांची सभा झाली. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही सभा झाला. सभेला एक हजारावर लोक उपस्थित होते. या सभेत रिफायनरी समर्थकांचा भरणा मोठा होता. बारसू राजापूर, लांजा, साखरपा मतदार संघात येते. या मतदार संघाचे आमदार राजन साळवी आहेत. त्यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
‘बेरोजगारीच्या मुद्यावर आपले बारसूतील रिफायनरीला समर्थन आहे’, असा ट्वीट साळवी यांनी केला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे. बारसूत काही प्रमाणात लोक रिफायनरीचा विरोध करीत असले तरी बहुसंख्य लोकांना रिफायनरी हवी आहे. कोणताही राजकारणी लोकांच्या विरोधात जाऊन एखाद्या गोष्टीचे समर्थन करू शकत नाही. साळवींनी रिफायनरीचे केलेले समर्थन ही कॅलक्यूलेटेड रिस्क आहे. त्यांना जनमताचा अंदाज आलेला आहे.
कोकणात आता रिफायनरीचा विरोध करणारे शिउबाठाचे दोन्ही नेते आमदार अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांची मुळं मुंबईत आहेत. ते कोकणातील एनआरआय आहेत. साळवींचे तसे नाही. साळवी यांची मूळं कोकणातच आहेत.
बारसूमध्ये काल जी सभा झाली, त्या सभेत रिफायनरीचा विरोध करणारे काही ग्रामस्थ आणि तथाकथित पर्यावरणवादी संघटना निश्चितपणे होत्या, परंतु त्यांचा टक्का खूपच कमी आहे. रिफायनरीचा विरोध करण्यासाठी गरज पडल्यास सगळा पक्ष बारसुवासियांसोबत रस्त्यावर उतरवू अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे. बाहेरची कुमक आल्याशिवाय रिफायनरीला असलेल्या विरोधाची धग जाणवणार नाही. कारण अवघी मूठभर लोक रिफायनरीचा विरोध करतायत, ही मंडळी समजावण्याच्या पलिकडची आहेत.
उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूने उभे राहून विरोधाचा कंड शमवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. शिंदे-फडणवीस सरकारला अवलक्षण करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत:चे नाक कापून घ्यायलाही तयार आहेत. परंतु एवढे करूनही रिफायनरीचे काम थांबेल याची शक्यता नाही.
बारसूतील रिफायनरीचा मुद्दा महाविकास आघाडीच्या मूळावर येण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे बारसूत जाण्याची तयारी करीत आहेत. तिथे जाऊन ते पेटवापेटवी करणार हे स्पष्ट आहे. बारसूमध्ये रिफायनरी होऊ शकते, अशी सूचना त्यांनी केली होती. परंतु तरीही ते या प्रकल्पाच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा निलाजरेपणा करतायत.
शरद पवार या मुद्द्यावर आक्रस्ताळेपणा करतील अशी अजिबात शक्यता नाही. त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांशी या मुद्द्यावर चर्चा केली आहे. अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या विरोधात नाही, फक्त सरकारने स्थानिक जनतेची समजूत काढून मार्ग काढावा अशी सूचना केली आहे. अजितदादा फक्त एवढे बोलून थांबलेले नाही, समृद्धी महामार्गाला सुद्धा सुरूवातीला असाच विरोध झाला होता. परंतु सरकारने जनतेला घसघशीत नुकसान भरपाई दिली, त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, असे उदाहरणही दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणे आगीत तेल ओतणारा नाही. काँग्रेस नेत्यांनी या मुद्यावर अजून तोंड उघडलेले नाही. ते अजून काठावर बसून मजा बघतायत. कारण कोकणात काँग्रेसचे फारसे अस्तित्वच नाही.
शिउबाठाने जी भूमिका बारसू प्रकरणी घेतली आहे, तशीच भूमिका त्यांनी आरेतील मेट्रो कारशेड प्रकरणी घेतली होती. ‘आरे बचाव’वाल्यांना पुढे करून आरेत कारशेड होऊ देणार नाही, अशी भाषा मविआचे सरकार गेल्यानंतरही ठाकरे पिता-पुत्र करत होते. परंतु सरकारने एकदा ठरवले की कोणताही विरोध टिकू शकत नाही.
हे ही वाचा:
महाराष्ट्रदिनी माविआची असेल शेवटची वज्रमूठ
चित्ते मृत्यू प्रकरणी दक्षिण आफ्रिकेकडून मोदींची पाठराखण
गुंड अतीक अहमदच्या घराच्या जागेवर ७६ कुटुंबांसाठी घरे!
रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !
‘आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यांना आयत्या पिठावर रेघोट्याही मारता येत नाहीत’, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या दोघांचा उद्धार केला होता. हे दोघेही रस्त्यावर उतरतील, अंगावर केस घेण्याची, तुरुंगात जायची तयारी दाखवून संघर्ष करतील अशी शक्यता शून्य आहे. मुखपत्रातून बोंब ठोकणे, सभांमध्ये गरळ ओकणे आणि चॅनलवाल्यांच्या बूमसमोर शड्डू ठोकणे याच्या पलिकडे या दोघांची पोच नाही. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची तर अजिबातच नाही. आणि समोर देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवाय ठाकरेंचे आमदार असलेले राजन साळवी सुद्धा सरकारच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेताना दिसतायत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे चाक बारसूच्या जमिनीत रुतणार हे नक्की. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना मविआच्या रथातून ढकलून देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बारसू हा ठाकरेंसाठी चक्रव्यूह ठरणार आहे. त्यातून बाहेर येणे त्यांना शक्य होईल, असे चित्र तूर्तास तरी दिसत नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)