अवघा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरा करतो आहे. हा सोहळा २ जून रोजी तिथीनुसार आणि आज ६ जूनला तारखेनुसार साजरा होतो झाला. देशभरातील जनता या सोहळ्यानिमित्त छत्रपतींच्या ऋणाचे स्मरण करते आहे. परंतु ज्यांनी छत्रपतींच्या नावाने गेली पाच दशकं पक्षाचे दुकान चालवले त्या पक्षाचे पक्षप्रमुख मात्र या उत्सवात कुठेही सामील नाही. हा राष्ट्रीय सोहळा बाजूला सारून ते विदेशात थंड हवेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हा दुसरे-तिसरे काही नसून निव्वळ कृतघ्नपणा आहे.
छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रावर ऋण आहे. हे ऋण कविराज भूषण, महाराजांचे राजकवी कवी परमानंद आणि अनेक बखरकारांनी त्यांच्या त्यांच्या शब्दात सांगितले आहे. हे ऋण नेमके काय? प्रख्यात लेखक विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर नांदेड येथे तीन भागांची व्याख्यानमाला झाली होती. त्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी ‘श्रीमानयोगी’कार रणजीत देसाई होते. कुरुंदकरांनी ‘श्रीमानयोगी’साठी प्रदीर्घ प्रस्तावना लिहीलेली आहे. ही प्रस्तावना पुस्तकाइतकीच गाजली होती. आज हे दोघेही दिग्गज शिवप्रेमी हयात नाहीत.
नांदेडच्या त्या व्याख्यानमालेत कुरुंदकर म्हणतात, “उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, ही उक्ती प्रत्यक्षात तेव्हाच येऊ शकते जेव्हा गंगेच्या दोन्ही तीरावर हिंदूंचे राज्य आहे. जर हिंदूंचे राज्य नसेल तर हे पाणी फक्त आत्महत्या करण्यासाठी उपयोगी पडू शकेल.” कुरुंदकर ज्या काळाचा उल्लेख करतात त्या काळात गंगेचे दोन्ही काठ मुघलसत्तेच्या टाचेखाली होते. औरंगजेबाने काशीविश्वेश्वराचे मंदीर फोडले होते. हिंदूंना जिवंत राहण्यासाठी, त्यांच्या धार्मिक प्रथा जपण्यासाठी जिझिया कर द्यावा लागत होता. तरीही हिंदूंचे जीवित, हिंदू स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती. गंगेचे ते काठ ते मुक्त करण्याच्या प्रक्रियेची सुरूवात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाने झाली. त्यामुळे प्रत्येक हिंदूवर छत्रपतींचे ऋण आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या सोहळ्यानिमित्त छत्रपतींच्या स्मृतींना वाकून मुजरा करत प्रत्येक शिवभक्त आपली कृतज्ञता व्यक्त करतो आहे.
२ जूनला जेव्हा तिथीनुसार शिवराज्याभिषेक होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष संदेश जारी केला. शिवराज्याभिषेक ही इतिहासाला कलाटणी देणारी अदभूत घटना होती, असे आवर्जून सांगितले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने रायगडावर शिवराज्याशिभिषेक साजरा केला. शिवसेनेने शिवाजी महाराजांचे नाव जेवढे वापरले तेवढे कदाचित त्यांच्या वंशजांनीही वापरले नसेल. छत्रपतींचा भगवा झेंडाही शिवसेनेने आपल्या राजकारणाचा भाग बनवला. एकेकाळी शिवसैनिक छत्रपतींच्या नावाने इतके भारलेले असायचे कि शाखांचा दर्शनी भाग एखाद्या किल्ल्यासारखा बनवलेला असायचा. भगव्याचे राजकारण करून शिवसेनेने सत्तेपर्यंत मजल मारली. परंतु या ऋणातून जेव्हा उतराई होण्याची वेळ आली तेव्हा शिवरायांच्या स्मृती जागवण्यासाठी शिवसेनेने काय केले? तर शिववडा आणि शिवथाळी. असे म्हणतात ‘जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत देखी तिन तैसी’. हेच मराठीत ‘भाव तसा देव’ या शब्दात सांगितलेले आहे. शिवसेनेचा भाव बहुधा वडा आणि थाळी पुढे गेला नाही.
महाराष्ट्रात छत्रपतींच्या नावाने काही भव्य दिव्य करण्याची मानसिकता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत मुंबईच्या सहार विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण झाले. तेव्हा बाळासाहेब वाजपेयींना म्हणाले होते, ‘तुम्ही या विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले, आता मला तुमच्याकडून काहीही नको’.
‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. बाळासाहेबांमुळे माझ्या नावाला किंमत आहे’, असे उद्धव ठाकरे उठता बसता सांगत असतात. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे तेच उद्धव ठाकरे शिवराज्याभिषेक दिनासारखा राष्ट्रीय सोहळा सोडून विदेशात आराम करण्यासाठी गेले. ट्वीटरवर फुकटात एखादा ट्वीट करून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींचे ऋण व्यक्त करण्याची इच्छाही त्यांना झाली नाही. उद्धव ठाकरे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष विसरले की, आठवणीत असून या सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी तीव्र इच्छा झाली? कारण एकदा छत्रपती समोर मान झुकवली तर कदाचित महाराष्ट्रात औंरंगजेबाचे चित्र नाचवणाऱ्या देशद्रोह्यांचे टोळके आपल्यासोबत राहणार नाहीत, असा त्यांचा समज झाला असावा.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर मजारींचा सुळसुळाट झाला. ऐतिहासिक स्मृतीस्थळांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. कुलाबा, शिवडी, रायगड, पन्हाळा, लोहगड आदी किल्ल्यांवर मजारी झाल्या. या कबरींबाबत प्रचंड ओरडा झाली परंतु कारवाई झाली नाही. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस सरकारने दाखवले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी साधे कौतुकही केले नाही.
हे ही वाचा:
… म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या दंडावर काळ्या फिती
१६ हजाराहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
द केरळ स्टोरीनंतर आता ‘७२ हूरें’ चित्रपटावरून वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायम शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांची टक्केवारी सांगत असतात. परंतु किती मुस्लीम वस्त्यांमध्ये शिवजयंती साजरी केली जाते याची आकडेवारी मात्र त्यांच्याकडे नाही. मुस्लीम उरुसामध्ये औरंगजेब आणि टिपूच्या प्रतिमा नाचवल्या जातात. एकाही उरूसात छत्रपतींची प्रतिमा नाचवल्याचे कुणी पाहिले आहे का? राहुल गांधीनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन केले नाही. ना तिथीनुसार ना तारखेनुसार. कारण नेहरु-गांधी-मायनो परिवाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे वावडे आहे.
शिउबाठाचे पक्षप्रमुख राहुल गांधींसोबत पक्षाची सोयरीक टिकवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. फार शिवाजी शिवाजी केले तर कदाचित राहुल गांधी नाराज होतील, म्हणून बहुधा परदेशात सुटीवर जाऊन ठाकरेंनी स्वत:ची सुटका केली असावी. कारण मुंबईत राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला त्यांना अभिवादन केले नाही तर एकवेळ चालू शकते. परंतु शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी त्यांना अभिवादन नाही केले तर शिवप्रेमी त्यांना माफ करणार नाहीत, हे माहीत असल्यामुळे ते बाहेर पडले. शिउबाठाच्या भगव्याचा रंग हळूहळ फिका पडतोय हे नक्की. उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याच्या दिमाखात काहीही उणे झाले नाही, परंतु पक्षप्रमुखांची थाळी-वडा मानसिकता मात्र लोकांच्या लक्षात आली.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)