भाजपा-शिवसेना युती तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बंद दारा आड झालेल्या चर्चेचे कारण पुढे केले. ते भाजपापासून वेगळे झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. भाजपासोबत युतीत असताना भाजपाचे केंद्रीय नेते मातोश्रीच्या दारावर जात असत. ठाकरेंचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत असत. युतीसाठी त्यांच्या दारावर गेलेला अखेरचा दिग्गज नेता म्हणजे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. आज मविआचे घटक पक्ष झालेल्या ठाकरेंना त्या दिवसांची आठवण नक्कीच येत असणार. जागावाटपासाठी दारावर येणे तर खूप दूरची गोष्ट. मित्रपक्षांचे नेते ठाकरेंच्या मागण्यांना फारसे मनावरही घेताना दिसत नाहीत.
विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्याला काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेंगा दाखवला. शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्वाचा नाही, महायुतीला सत्तेवरून हटवणे हे लक्ष्य असायला हवे. अर्थात उद्धव ठाकरे यांची एक मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाने कलम केली. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. ते ठाकरेंना मान्य नाही. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी मित्र पक्षांचे उमेदवारांची पाडापाडी होते, असे विधान करून ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी असहमती दर्शविली.
मुख्यमंत्री पद हवे आहे, परंतु कोणत्याही परीस्थितीत आपल्या पक्षाचे सर्वाधिक आमदार येणार नाहीत हे ठाकरेंना माहीती आहे, त्यामुळे त्यांना ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नाही. कितीही जागा आल्या तरी त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे. परंतु युतीमध्ये त्यांना जेवढे गांभीर्याने घेतले जात होते, तेवढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते घेताना दिसत नाहीत. ठाकरे अगदीच हतबल झालेले दिसतात. निदान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा, या मागणीकडेही काँग्रेसने साफ काणाडोळा केलेला दिसतो. २०१४ मध्ये आदीत्य ठाकरे यांनी ‘मिशन १५०’ जाहीर केले. आता मुलानेच ही घोषणा केल्यामुळे यापेक्षा कमी घ्यायचे नाही, असे उद्धव ठाकरेंनी सुद्धा ठरवून टाकले. परीणामी युती तुटली.
हे ही वाचा:
मुंबईहून हैद्राबादला जाणारं हेलीकॉप्टर पुण्यात कोसळलं, चार जण जखमी !
जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून २२ जण जखमी
पंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार
मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !
२०१९ च्या निवडणुकांच्या आधी अमित शहा मातोश्रीवर गेले. पुन्हा युती व्हावी या दृष्टीने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पक्षात त्यांचे वजन प्रचंड वाढले होते. उत्तर प्रदेशच्या २०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपाला भव्य विजय मिळवून दिलेला होता. केंद्रात भक्कम बहुमत असलेल्या भाजपाचे अमित शहा दोन नंबरचे नेते होते. तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीत बोलावले नाही. ते कमीपणा घेत मातोश्रीवर गेले. जो मान भाजपाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला, तोच मान त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनाही दिला. अमित शहा यांच्या त्याच भेटीचा दाखल ठाकरें वारंवार देतायत. बंद दारा आड झालेल्या चर्चेचे किस्से सांगतात.
आज ठाकरेंवर काय वेळ आलेली आहे ते पाहा. मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी, जागा मागण्यासाठी ठाकरेंना दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. १० जनपथचे उंबरे झिजवावे लागतात. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या दुय्यम, तिय्यम नेत्यांशी चर्चा करावी लागते. आता ना २०१४ मध्ये केलेली मिशन १५० ची भाषा शिल्लक आहे, ना जागावाटपाची बोलणा मातोश्रीमध्ये कऱण्याची शान. किमान चार भिंतीआड तरी मुख्यमंत्री जाहीर करा, असे आर्जव करावे लागते. ठाकरेंना उत्तर देण्याच्या भानगडीत ना सोनिया गांधी पडत, ना राहुल गांधी. काँग्रेसमध्ये फारसे स्थान नसलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते ठाकरेंना परस्पर उत्तर देतात.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा आता सुरू झालेली आहे. मविआचा जो फॉर्म्युला काँग्रेसवाले ठरवतायत त्यानुसार उबाठा शिवसेनेला शंभर जागाही मिळण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीचा निकष लावला तर काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे सर्वाधिक जागांवर काँग्रेसचा दावा असणार हे उघड. परंतु तूर्तास तरी सगळ्यांनी प्रत्येकी ९६ जागा लढवाव्या, मित्र पक्षाला आपापल्या कोट्यातून जागा द्याव्या असे ठरलेले आहे. ज्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाठींबा दिला त्यांनाही वाटा देण्याचे शरद पवार यांनी सुतोवाच केलेले आहे. त्यानुसार ठाकरेंच्या कोट्यातून तीन जागा डाव्या पक्षांना, शरद पवार यांच्या कोट्यातून शेतकरी कामगार पक्षाला आणि काँग्रेसच्या कोट्यातून समाजवादी पार्टीला जागा द्यावात, असे ठरलेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वाट्याला ९६ जागा आल्या तरी त्यांना प्रत्यक्ष लढवायला ९० ते ९२ जागा मिळतील. म्हणजे त्यांना शंभर जागाही मिळणार नाहीत. मविआत राहून मुख्यमंत्री पदाची आशा नाही, शब्दाला किंमत नाही, कोणीही येतोय आणि दम देतोय, अशी तूर्तास तरी परीस्थिती आहे
त्यामुळे गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळवले. तेवढे वगळता ठाकरेंनी गमावलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे. ठाकरेंनी विचारधारा गमावली, मातोश्रीची चमक गमावली, बार्गेनिंग पावर गमावली, हिंदुत्ववादी मतदार गमावला, माझ्या हिंदू मतदार बंधूनो, भगिनींनो, मातांनो म्हणण्याचा अधिकार गमावला. २५ वर्षे युतीत सडलो असे म्हणणाऱ्या ठाकरेंचे एकूण राजकारणाच गेल्या पाच वर्षात सडलेले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)