उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ‘एक दिवस तरी मुख्यमंत्री करा’ असे आर्जव विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेले आहे. ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का मिळावे, याबाबत दानवे जबरदस्त तर्क देतात. ते सांगतात की, मंत्रीपदे तर आम्हाला भाजपाशी युतीतही मिळत होती. दानवे यांचे विधान इथे संपते. काँग्रेस-राष्ट्रवादीशप सोबत येऊनही फक्त मंत्रीपदे मिळत असतील, तर तुमच्या सोबत येऊन फायदा काय? हा भाव मात्र दानवे व्यक्त करीत नाहीत. इथे त्यांनी ठाकरेंची पोलखोल केलेली आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन वगैरे सगळे झूठ होते. फक्त बोलबच्चन होते. मुख्यमंत्रीपदासाठीच ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पदर धरला. मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर मविआसोबत कशाला राहायचे हाच दानवे यांच्या विधानातील गर्भित अर्थ.
मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही, मला सत्तेचा मोह नाही. असे ठाकरे कितीही बोलले तर त्यावर शेंबड्या पोराचाही विश्वास बसणार नाही. त्यांचे शिलेदार मात्र मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आहेत. त्यांना काहीही करून मुख्यमंत्रीपदावर ठाकरेंनाच विराजमान करायचे आहे. मित्रपक्ष या रडारडीकडे लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे आता ही मंडळी अक्षरश: घायकुतीला आलेली आहेत. त्यातूनच एक दिवसासाठी तरी मुख्यमंत्री करा, अशा विनवण्या केल्या जात आहेत.
शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. या शब्दात दानवे आपली खदखद व्यक्त करतात. मंत्रीपदं मिळणे हे त्यांना पुरेसे वाटत नाही. ती तर भाजपावालेही देत होते, असे दानवे म्हणतात तेव्हा उबाठा शिवसेनेचे खरे अंतरंग उघड होतात. २५ वर्षे युतीत सडलो…, बंद दारा आड झालेली चर्चा… ही निव्वळ बतावणी होती. खरे कारण एकच होते, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद.
हे ही वाचा:
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंना सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर!
दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात!
दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!
भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन
मुख्यमंत्री होण्याचे उद्धव यांचे स्वप्न जुने आहे. अगदी भाजपा-शिवसेनेचे पहिले सरकार आल्यापासूनचे. म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यापासूनचे. २०१९ मध्ये भाजपाला धक्का देऊन कसेबसे हे स्वप्न पूर्ण झाले. परंतु फक्त अडीच वर्षांसाठी मिळालेल्या मंत्रीपदामुळे ठाकरेंची तहान भागलेली नाही. त्यांना आणखी एक दिवस तरी मुख्यमंत्री करायला हवे, अशी इच्छा त्यांच्या पक्षाचे नेते व्यक्त करतात तेव्हा त्यांची या पदासाठी असलेली तळमळ स्पष्ट होते.
नायक सिनेमामध्ये अनिल कपूर हा एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. परंतु स्वत:च्या इच्छेने नव्हे. विद्यमान मुख्यमंत्र्याने त्याला चॅलेंज दिलेले असते की एक दिवस मुख्यमंत्री बनून बघ, किती खडतर वाटचाल असते हे तुझ्या लक्षात येईल. सिनेमात नायकाची इच्छा नसते. इथे उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. काँग्रेस नेते आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला अगदीच उदासीन आहेत. दानवे ज्या प्रकारे एक दिवस तरी मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी करतायत. त्यातून फक्त उबाठा शिवसेनेचा उतावीळपणा व्यक्त होतो आहे.
आपण अनेकदा अशा गोष्टी मीडियात पाहातो की, एखाद्या लहान मुलाला दुर्धर आजार असतो, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एक दिवसाचा पोलिस कमिशनर, एक दिवसाचा मुख्यमंत्री करतात. त्यात एक दयेचा, करुणेचा भाव असतो. हळहळ असते. दानवेंची मागणी यापेक्षा वेगळी वाटत नाही.
अर्थ स्पष्ट आहे, कणा, बाणा, झुकत नाही, वाकत नाही, अशी डायलॉगबाजी भाषणापुरती मर्यादित आहे. उबाठा शिवसेनेत संख्या बळाच्या ताकदीवर सत्ता खेचण्याचे बळ उरलेले नाही. चॅनलवाल्यांचा बूम समोर आला की फक्त मिशांना पिळ द्यायचा. बड्या बड्या बाता करायच्या. पडद्यामागे मात्र, एक दिवसाचे तरी मुख्यमंत्रीपद द्या हो, असे आर्जव करायचे. मुख्यमंत्रीपदासाठी संख्या बळ हा निकष उबाठा शिवसेनेच्या नेत्यांना मंजूर नाही. कारण तो त्यांच्या सोयीचा नाही. आम्हाला वाटते म्हणून, आम्हाला हवे आहे म्हणून…. हाच निकष आहे.
आम्हाला वाटते म्हणून उदधव ठाकरे ब्येस्ट मुख्यमंत्री, जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, विचारी संयमी मुख्यमंत्री… असा सगळा मामला आहे. कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरची समस्या सोडवून दाखवतो. ही मागणी ते समोर बसलेल्या जनसागराकडे करायचे. कारण त्यांना हे तारतम्य होते की सत्तेवर बसवणे आणि खाली खेचणे हे फक्त जनतेच्या हाती असते. त्यांनी भिकेचा कटोरा कधी मित्रपक्षासमोर पसरला नाही. ते भाजपाला कधी म्हणाले नाहीत की, मला एक दिवस तरी पंतप्रधान करा. मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा, मी काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो, हा दृष्टीकोन कुठे आणि ठाकरेंना एक दिवस तरी मुख्यमंत्री करा, ही लाचारी कुठे? उबाठा शिवसेनेतील उरल्या सुरल्या कडवत सैनिकांना आणखी काय काय पाहावे लागणार हे सर्वशक्तिमान ईश्वरालाच ठाऊक. आज सर्वपित्री अमावस्या. पितृंचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी दिवंगत शिवसेनाप्रमुखांच्या तळपत्या विचारांचे स्मरण जरी केले असते तरी ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांना एक दिवसांचे मुख्यमंत्रीपद मागण्याची दुर्बुद्धी सुचली नसती.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)