27 C
Mumbai
Wednesday, May 7, 2025
घरसंपादकीयगोधडी हीच सोय, तीच समस्या...

गोधडी हीच सोय, तीच समस्या…

कडवट हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुखानंतर काँग्रेसी सेक्युलर उद्धव ठाकरे लोक स्वीकारणार नाहीत.

Google News Follow

Related

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अलिकडे विस्मरणाचा आजार जडला असावा. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असा दावा त्यांनी केला होता. सत्य लक्षात ठेवावे लागत नाही, थापा लक्षात ठेवाव्या लागतात. अनेकदा ते ईव्हीएम विसरतात. कधी म्हणतात की आम्ही बेसावध राहिलो, कधी लाडकी बहीण योजना आडवी आल्याचा साक्षात्कार त्यांना होतो. तर कधी भाजपाची बूथप्रमुख रचना त्यांना आठवते. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात भाजपाच्या बूथ रचनेबाबत बोलले. ही रचना उचलण्याचे सुतोवाच त्यांनी केले. हे सोपे नाही, कर्मकठीण आहे, परंतु समजा हे त्यांना करता आले तरी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी एवढेच पुरे नसते, त्यासाठी आणखी निष्ठेच्या इंधनाची गरज असते. ठाकरे ते इंधन कुठून आणणार? हा महत्वाचा प्रश्न आहे.

 

राजकीय पक्षाला नेता लागतो. विचारसरणी लागते. संघटन लागते. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुढे नेला असं म्हणायला वाव आहे. २०१४ मध्ये भाजपाशिवाय निवडणुका लढवून त्यांना ६३ आमदार जिंकून आणले ही काही छोटी बाब नव्हती. त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. तेव्हा ‘मी भाजपाला सोडले आहे, हिंदुत्वला नाही’ हा दावा ते करू शकत होते, जो दावा ते आज करतायत. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जी काही घरघर लागली, त्याचे कारण वैचारिक तडजोड गोधडी विचारधारा. वक्फ विधेयकाला विरोध करूनही ते हिंदुत्व सोडले नाही, असा दावा करू शकतात, परंतु त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल?

 

मुर्शीदाबादेत हिंदूंवर वरवंटा चालत असताना, त्यांच्या तोंडी निषेधाचा एक शब्द येत नाही. लोकांच्या हे लक्षात येत नाही, या गैरसमजात ते राहाणार असतील तर ती त्यांची समस्या आहे. पक्ष जगवण्यासाठी विचारसरणीचे महत्व किती? हे भाजपाला विचारून पाहा. जनता पार्टीचा प्रयोग फसल्यानंतर दिल्लीच्या फिरोजशहा कोटला येथे झालेल्या राष्ट्रीय संमेलनात ६ एप्रिल १९८० रोजी भाजपाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबईत झालेल्या पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशानात मूळचा हिंदुत्ववाद पातळ करून गांधीवादी समाजवादाचा नारा देण्यात आला. हिंदुत्वाची भगवी शाल बाजूला ठेवून सर्वधर्म समभावाचे ठिगळ लावलेली गोधडी विचारधारा स्वीकारण्यात आली.

 

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या हत्येनंतर देशभरात जो काही पक्षाचा सुपडा साफ झाला, भाजपाला फक्त २ जागा मिळाल्या. तो फक्त काँग्रेसला मिळालेल्या सहानुभूतीमुळे झालेला पराभव झाला नव्हता. रसातळाला गेल्यानंतर भाजपा नेत्यांना खडबडून जाग आली. उधारीवर घेतलेला गांधीवाद बाजूला सारून पक्षाने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी आलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षाला पुन्हा हिंदुत्वाकडे नेले. १९८९ च्या पालमपूर येथील पक्षाच्या अधिवेशनात रामजन्मभूमी आंदोलनात उडी घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. मंदिर वही बनायेंगे…ची घोषणा देण्यात आली.

 

त्याचा परिणाम असा की, १९८४ च्या निवडणुकीत फक्त २ जागा मिळालेल्या भाजपाला १९८९ च्या निवडणुकीत ८५ जागा मिळाल्या. पुढे दोन जागांवरून स्वबळावर देशाच्या सत्तेवर येण्याचा पराक्रम भाजपाने अवघ्या ३ दशकात करून दाखवला. त्याआधी वाजपेयी यांच्या पंतप्रधापदाच्या कार्यकाळात भाजपाने राममंदिर, कलम ३७० आणि समान नागरी कायदा थंड्या बस्त्यात टाकला त्याचे परिणाम ही पक्षाला भोगावे लागले. संघाच्या कडवट कार्यकर्त्यांच्या मनात हे सरकार आपले आहे, ही भावनाच निर्माण होऊ शकली नाही. त्याचा फटका २००४च्या निवडणुकीत बसला.

 

विचारसरणी किती महत्वाची असते, पक्षाच्या वाटचालीत त्याचा किती प्रभाव असतो, हे समजून घ्यायला भाजपाची वाटचाल पाहता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकारणातील संस्थानिकांचा पक्ष आहे. या पक्षाला विचारसरणीची गरज नसते. देशात मुस्लीम तुष्टीकरण हीच विचारसरणी असलेला काँग्रेस पक्ष आहे, सपा, राजद, तृणमूल या काँग्रेसच्याच आवृत्या आहेत. उबाठा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच मार्गावर आहे. त्याचेच परिणाम ठाकरे भोगतायत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार. बुथ प्रमुखांच्या धर्तीवर आपणही तयारी केली पाहिजे, असे विधान ठाकरेंनी निर्धार मेळाव्यात केले. मुळात हे घरी बसून साध्य होत नाही.

हे ही वाचा:

कोळसा आयातदारांसाठी नोंदणी शुल्कबद्दल चांगला निर्णय

‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’

अरोरा यांचा काँग्रेस आणि सुखबीर बादल यांच्यावर हल्ला

रॉबर्ट वाड्रा हे भू-माफिया, शेतकऱ्यांना लुटण्याची त्यांनी शपथ घेतलीय!

 

पत्रकारांसमोर बडबड करूनही होत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो. ही तयारी पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. जिल्ह्याजिल्ह्यात नेत्यांमध्ये सुरू असलेली हाणामारी संपत नाही. तिथे तुम्ही बुथ प्रमुखांपर्यंत रचना काय उभी करणार? अमित शहा यांच्यावर जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती, तेव्हा त्यांनी बूथप्रमुख हा विषय लावून धरला. एकेका जिल्ह्यात अमित शहा यांचा प्रवास असायचा तेव्हा ते किमान आठशे ते हजार कार्यकर्त्यांना भेटायचे. पक्ष वाढवण्यासाठी काय करता येईल? त्यात अडसर कोणते? या दोनच प्रश्नांवर कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येत असे. दोन पाच मिनिटाची भेट, परंतु या भेटीत जे काही फिडबॅक मिळाले, त्यावर अमित शहा यांनी मजबूत पक्ष बांधणी केली. पन्नाप्रमुख हा त्याचा पुढचा टप्पा. उबाठा शिवसेनेकडे इतके कष्ट घेणारा नेता आहे का? सध्या तरी तिथे सगळ्या बोलभांडांचा बोलबाला आहे. भाजपाला शिव्या घालून सत्ता येईल, या गैरसमजात पक्षप्रमुखांपासून सगळेच वावरतायत.

 

बरं समजा, कष्ट घेऊन बुथ प्रमुख बनवण्यात तुम्हाला यश आले. तरीही मामला संपत नाही. पक्ष तेव्हा हरतो जेव्हा प्रत्येक चाळीतला, वस्तीतला कार्यकर्ता मतदानाच्या दिवशी घराघरात जायचा आळस करतो, किंवा त्याच्याकडे हे कष्ट घेण्याच्या प्रेरणेचा अभाव असतो. घरा घरात मतदाराला बाहेर काढायला कार्यकर्ता गेला, तरी मतदारालाही मतदान केंद्रापर्यंत जायलाही प्रेरणा लागते. ही प्रेरणा विचारांची असते. विचारसरणीची असते. मी जर मतदानाला गेलो नाही, तर राम मंदिर बनणार नाही, कमल ३७० हटणार नाही, समान नागरी कायदा होणार नाही, असे मतदाराला वाटणे हीच प्रेरणा आहे. मी मतदानाला गेलो नाही, तर वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध कोण करणार, ही उबाठा शिवसेनेच्या मतदारांची प्रेरणा असू शकते काय ? हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त मतदाराची तर नक्कीच नाही. भाजपाला हरवण्यासाठी संघाच्या स्वयंसवेकांना भाजपाच्या विरोधात काम करण्याची गरज नसते, ना निवडणुकीच्या दिवशी विरोधात मतदान करण्याची, ते घरी बसले तरी पुरेसे ठरते. २००४ ची लोकसभा असो वा २०२४ची भाजपाची घसरण झाली, त्याचे कारण हेच होते.

 

वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून, प.बंगालमध्ये हिंदूंवर वरवंटा चालत असताना मीठाची गुळणी करून, ना तुमच्या मतदाराला प्रेरणा मिळणार, ना तुमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांला. १९८४ मध्ये झालेली दुर्दशा संपवून पक्ष केंद्रातील सत्तेत आणण्यात भाजपाला यश आले कारण भाजपाने चुका सुधारल्या. फिरोजशहा कोटला येथे पक्षाच्या स्थापनेच्या कार्यक्रमात बॅनरवर पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्यासोबत महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण यांचे फोटो होते. ही वैचारिक सरमिसळ पक्षाला प्रेरणा देऊ शकत नाही. चूक लक्षात आल्यानंतर भाजपाने चुका सुधारल्या. उद्धव ठाकरे बुथप्रमुख व्यवस्थेबाबत भाजपाची नक्कल करायला जातायत. नक्कल करायलाही अक्कल लागते. ही अक्कल त्यांच्याकडे आहे, असे गृहीत धरले तरी जोपर्यंत त्याला वैचारिक निष्ठेची जोड मिळत नाही, तोपर्यंत त्यांना यश मिळणार नाही. वैचारिक वाटचालीबाबत पक्ष आणि नेता अधिक कडवट झालेला मतदार आणि कार्यकर्त्यांनाही आवडत असतो. वाजपेयी यांच्यानंतर आडवाणी, आडवाणी यांच्यानंतर मोदी आणि मोदींनंतर बहुधा योगी अशी भाजपाची वाटचाल आहे. कडवट हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुखानंतर काँग्रेसी सेक्युलर उद्धव ठाकरे लोक स्वीकारणार नाहीत. मी हिंदुत्व सोडलेले नाही, भाजपाला सोडले आहे, असा कितीही खुलासा केला तरीही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा