ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी आज उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर धडक दिली. तेव्हा मराठा आरक्षणाबाबत त्यांनी एक विधान केले. विधान कसले ब्रह्मास्त्रच ते. मविआच्या काळात मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी वारंवार या ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवले. लोकसभेतूनच या मुद्द्यावर तोडगा काढा असे सांगत हा मुद्दा थेट केंद्राकडे टोलावला.

मराठा आंदोलकांना ठाकरेंची भेट हवी होती. परंतु ती न झाल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. ठाकरे मराठा विरोधी असल्याचा दावा त्यांनी केला. हे आंदोलक भाजपाने पाठवलेले आहेत, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला, तर या आंदोलकांचा आपल्याशी काही संबंध नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खरेतर हे सांगण्याची गरजही नव्हती, कारण जरांगे यांना मविआच्या नेत्यांच्या वाकड्यात जायचे नाही, फक्त महायुतीला कोंडीत पकडायचे ही त्यांची भूमिका आहे आणि हे एव्हाना उघडही झालेले आहे. जरांगेंची इच्छा नसली तरी मराठा समाजाला आता मविआच्या नेत्यांकडून जाब हवा आहे.

मराठा आंदोलक आज मातोश्रीबाहेर जमा झाले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु बराच वेळ त्यांना रखडवल्यानंतर ठाकरे त्यांना भेटले. त्याआधी, आंदोलकांना दानवे सामोरे गेले. ‘अशी भेट मिळत नाही, तुम्ही वेळ घेऊन यायला हवे होते’, असे त्यांनी सुनावले. ‘तुम्हाला कोणी पाठवले हे आम्हाला ठाऊक आहे’, असेही ते म्हणाले.

मातोश्री समोर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हे भाजपा समर्थक असल्याचा दावा दानवे यांनी केला. हा दावा प्रश्न निर्माण करणारा आहे. केरे पाटील भाजपा समर्थक आहेत, असे गृहीत धरले तरी त्यांना मराठा समाजाच्या हितासाठी ठाकरेंना सवाल करण्याचा अधिकार नाही का? तसे असेल तर ठाकरेंनी किमान जरांगेंच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, कारण ते शरद पवार समर्थक आहेत. त्यांनी पवारांचे जाहीरपणे कौतूकही केले आहे. पवारांचा तुतारीवाला माणूस हाच आहे, असा अनेकांचा दावा आहे. त्यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरेंना प्रश्न केलेला आहे. परंतु अद्यापि त्याचे स्पष्ट उत्तर ठाकरेंनी दिलेले नाही. ना प्रत्येक विषयावर मत मांडण्याची अफाट क्षमता असलेल्या संजय राऊतांनी.

मातोश्रीवर मराठ्यांनी राडा केल्यानंतर ठाकरे यांनी चेंडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे टोलावला. म्हणे मोदींनी लोकसभेत निर्णय घ्यावा. दिल्लीकडे बोट दाखवण्याची परंपरा सुरू ठेवली. अहो मोदी निर्णय घेतीलच, पण तुम्ही तर तोंड उघडा. बोला ना ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. पक्ष फुटल्यानंतर आणि सत्ता गमावल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर समाजवाद्यांपासून साम्यवाद्यांपर्यंत सगळ्यांना भेटत आहेत. पूर्वी सर्वसामान्यांसाठी उघडे असलेले मातोश्रीचे दरवाजे त्यांनी सताड उघडले नसले तरी किलकिले तरी केलेले आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये १४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !

मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !

विकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते…

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

दानवे म्हणाले की, ‘आमची आरक्षणाबाबती भूमिक स्पष्ट आहे. याबाबत विधी मंडळात याबाबत एकमताने ठराव मंजूर झालेला आहे. आरक्षणाबाबत सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठींबा असेल.’ याचा अर्थ काय? ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका सरकारने आधीच घेतली आहे. उबाठा शिवसेनेचा या भूमिकेला पाठींबा आहे, असे मानायचे काय? दानवे यांनी तर तसेच सुचवले आहे. केरे पाटील यांनी आज मातोश्री समोर आंदोलन केल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रियाही आलेली आहे. आमचे कोठेही आंदोलन सुरू नसून, मातोश्रीबाहेर झालेल्या आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नाही. या आंदोलकांना प्रवीण दरेकरांनी पाठवले असेल असे ते म्हणाले.

इथे गंमत अशी आहे. दानवे आडून आडून सांगतायत की भाजपाच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे. परंतु ते स्पष्ट शब्दात हे सांगायला तयार नाहीत की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. दुसऱ्या बाजूला सरकारच्या भूमिकेला पाठींबा देण्याचे जाहीर केल्यानंतर जरांगे त्यांच्याबाबत अवाक्षरही काढत नाहीत. जरांगे उबाठा शिवसेना किंवा मविआच्या घटक पक्षांना एक तर त्या भाषेत जाब विचारत नाहीत जी भाषा ते भाजपासाठी वापरतायत. मविआतील घटक पक्षांनी जरांगेंची भूमिका मान्य नाही हे आडून आडून स्पष्ट केल्यानंतरही जरांगे आकांडतांडव करीत नाही. जे त्यांनी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आदींच्या विरोधात केले होते.

मविआ आणि जरांगेंमधील ही लुटूपुटूची लढाई लक्षात आल्यामुळे आता मराठा समाज सरसावला आहे. जे जाब विचारतायत त्यांच्याशी आपला संबंध नाही, असे जरांगे म्हणाले म्हणून केरे पाटील यांच्यासारख्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे महत्व कमी होत नाही. जरांगेना फक्त सरकारच्या डोक्यावर खापर फोडण्यात रस आहे, परंतु मराठा समाजाला मात्र राजकारण नको असून फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळेच जरांगेना आवडो वा न आवडो मराठा समाज आता मविआतील घटक पक्षांना सुद्धा सांगतो आहे की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करायला हवी. नरो वा कुंजरो वा करून आता भागणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version