अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

आपण आता मुख्यमंत्री नाही, फक्त विधान परिषदेचे आमदार आहोत, ही बाब बहुधा उद्धव ठाकरे विसरले

अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

ट्वीटरने सगळ्यांना आज एका रांगेत उभे केले. नेत्याची सेलिब्रिटींची ब्लू टीक आज एका झटक्यात हटवली. ही ब्लू टीक म्हणजे नेते, सेलिब्रिटींसाठी प्रतिष्ठेची खूण बनली होती. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पदाची ब्लू टीक होती. परंतु आता ती हटली आहे, याचा त्यांना अनेकदा विसर पडतो. उद्धव ठाकरे यांनी काल गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाला भेट दिली, तेव्हा ही बाब ठसठशीतपणे समोर आली.

हेरीटेज दर्जा असलेल्या महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे स्मारक बनवण्यासाठी महापौर बंगल्याकडे बोट दाखवण्यापलिकडे या संपूर्ण प्रकल्पात उद्धव ठाकरे यांचे योगदान शून्य. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत या बंगल्यात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक बनवण्याचा निर्णय झाला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या कामाला गती आली.

उद्धव ठाकरे यांचे काल इथे आगमन झाले. आल्या आल्या ‘श्रीनिवासन कुठे आहेत?’ असा सवाल त्यांनी केला. एसव्हीआर श्रीनिवास हे एमएमआरडीएचे आयुक्त असून उद्धव ठाकरेंचे महापौर बंगल्यात आगमन झाले तेव्हा ते मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका महत्वाच्या बैठकीत होते.   एमएमआरडीएचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जेव्हा बोलावतील तेव्हा तिथे उपस्थित राहाणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. परंतु श्रीनिवासन महापौर बंगल्यावर उपस्थित नसल्यामुळे ठाकरेंचा तीळपापड झाला. त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी श्रीनिवासन यांना फोन केला. उद्धव ठाकरे आल्याची कल्पना दिली. काही वेळानंतर धावत पळत श्रीनिवासन तिथे हजर झाले. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी सवयीप्रमाणे त्यांच्यावर टोमणास्त्र चालवले. ‘या श्रीनिवासन, तुमचे स्वागत असो…’ असे कुत्सित, मानभावी उद्गार काढले.

श्रीनिवासन यांच्याशी बोलूनच आपण इथे आलो आहोत’, असा दावा ठाकरे यांनी मीडियासमोर केला. हे खरंही असेल. परंतु जेव्हा मुख्यमंत्री बोलावतात, तेव्हा सगळी कामे बाजूला ठेवून अधिकाऱ्याला तिथे जावे लागते, हे ठाकरेंना ठाऊक असायला हवे. तेही अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. मुख्यमंत्री पदाशी संबंधित काही शिष्टाचार असतात. श्रीनिवासन त्याचेच पालन करीत होते. माजी मुख्यमंत्र्यापेक्षा विद्यमान मुख्यमंत्र्याला त्यांनी झुकते माप देणे हे स्वाभाविक सुद्धा होते. शिष्टाचाराला धरून सुद्धा.

आणि पुन्हा स्मारकाची पाहणी करताना एमएमआरडीएचे प्रमुखच तिथे असायला हवे हा आग्रह कशाला? एमएमआरडीएचे अन्य अधिकारी तिथे उपस्थित होते. त्यांच्याकडून कामाची प्रगती कशी सुरू आहे, याबाबत माहिती घेता येऊ शकली असती. परंतु आपण आलो असल्यामुळे सगळ्यांनी रांगेत उभे राहून स्वागत करायचे, अशी ठाकरेंची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी मानसिक त्रास करून घेतला.   मुख्यमंत्री पदाची शान वेगळी असते. मुख्यमंत्री एखाद्या ठिकाणी दौरा करणार असले तर संबंधित विभागाचे सगळे वरिष्ठ अधिकारी तिथे झाडून उपस्थित राहाणे हा शिष्टाचारच आहे. माजी मुख्यमंत्र्याला हा शिष्टाचार लागू होत नाही. आपण आता मुख्यमंत्री नाही, फक्त विधान परिषदेचे आमदार आहोत, ही बाब बहुधा उद्धव ठाकरे स्मारकाला दिलेल्या भेटी दरम्यान विसरले.

हे ही वाचा:

सोने चकाकते आहे, खरेदीलाही लकाकी येणार का?

जम्बो कोविड सेंटरप्रकरणी सुजित पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

शिर्डी संस्थानच्या नाण्यांचा ढीग ठरला, बँकांसाठी समस्येचा डोंगर!

कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री घरी बसले होते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावून फिरत होते. बैठका घेत होते, अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे कौतूक होत होते. हे सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाले नाही. सरकारने अधिकृत जीआर काढून विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, अशी तंबी दिली. हा तर कद्रूपणाचा कडेलोट होता. त्याच सरकारचे मुख्यमंत्री आणि सध्या एक साधे आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या स्मारक भेटीत एमएमआरडीएचे अध्यक्ष आपल्या स्वागताला हवे अशी अपेक्षाच का करावी?

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांची तेव्हाच्या औरंगाबादमध्ये म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली होती. त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विनोदी विधान केले होते.  ‘औरंगाबादच्या नामांतराची गरज काय, मी म्हणतोय ना संभाजी नगर…’. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना सणसणीत उत्तर देताना सवाल केला होता, अरे तु कोण? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?   उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी हा प्रश्न केला तेव्हा ते मुख्यमंत्री तरी होते. आता तर ते फक्त आमदार आहेत. राज ठाकरेंचा हा प्रश्न त्यांनी लक्षात ठेवला तरी भविष्यात अधिकारी आला नाही, म्हणून त्रागा करण्याची गरज त्यांना भासणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version