लोकसभेत केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याची सुरसुरी मविआला आलेली आहे. सत्तेपर्यंत नेणारा एकगठ्ठा मुस्लीम मतांचा अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा इच्छुक आहेत. परंतु ही मतं एकगठ्ठा राहतील, याबाबत साशंकता आहे. मविआचे नेते ठाकरेंना फार भाव देईनासे झाल्यामुळे उबाठा शिवसेनेचे नेते नव्या वाटांची चाचपणी करीत आहेत. एमआयएमशी बंद दाराआड चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांनी तसे संकेत दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत सगळे सर्व्हे तोंडावर आपटले तरीही विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेची नवी लाट येते आहे. कोण सत्तेवर येणार याबाबत सर्व्हेचे अंदाज वेगवेगळे असले तरी उबाठा शिवसेना आगामी निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा कडेलोट होणार, याबाबत सगळ्या सर्व्हेचे एक मत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उबाठा शिवसेना हा राज्यातील सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची चिंता यामुळे प्रचंड वाढली आहे. मविआची सत्ता येण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी अवस्था होती त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांना नजरेसमोर दिसते आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी त्यांना मुस्लीम मतांचे टॉनिक हमखास हवे आहे. मुस्लिम मतांसाठी फक्त मविआवर अवलंबून राहायला नको, म्हणून पक्षाचे नेते नवी सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मुस्लीम मतं मिळवून देईल अशा कोणालाही खांद्यावर बसवण्याची ठाकरे यांची तयारी आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुस्लिमांना तिकिटे द्यायला आमच्या पक्षाची कोणतीही हरकत नसेल असे स्पष्ट केले आहे. मेरीटवर मुस्लिमांना उमेदवारी दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. मेरीट हा शब्द परवलीचा झाला आहे. तिकीटासाठी नेमके मेरीट काय असावे लागते, याची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. पक्ष प्रमुख ज्या दगडाला शेंदूर फासतील तोच मेरीटवाला असे मानण्यात येते. ठाकरेंचे बदललेले राजकारण पाहून वेगळ्या शब्दात हेच सांगायचे तर ते ज्या चौथऱ्यावर चादर चढवतील, तीच मजार आहे, असे म्हणून लोक तिथे माथा रगडणार. अर्थात पक्षप्रमुख म्हणतील तिच मेरीटची व्याख्या असणार आहे. दानवेंनाही हे ठाऊक आहे.
‘एमआयएमशी युती करणार नाही, कारण या पक्षाची विचारसरणी विध्वंसक आहे’, हा त्यांचा दावा मात्र पोकळ ठरण्याची शक्यता आहे. ‘दानवे हे छोटे नेते आहेत. त्यांना काहीच माहीती नसते’, उबाठा शिवसेनेच्या बड्या नेत्यासोबत माझी चर्चा झाली असल्याची माहिती इम्तियाज जलील उघड केलेली आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मविआच्या दारावर उभे होते. आम्हालाही तुमच्यात घ्या, अशी विनवणी करत होते. परंतु मविआतील तिन्ही घटक पक्षांनी नकार घंटा वाजली. त्यांना मविआमध्ये एण्ट्री मिळाली नाही. आता गरज वंचित-एमआयएमला कमी आणि मविआच्या नेत्यांना जास्त आहे. कारण हे पक्ष तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करीत आहेत.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सोबत आले तरी राज्यातील समीकरण बदलू शकेल. मुस्लीम मतांमध्ये विभाजन करण्याची ताकद या आघाडीत आहे. मविआच्या पाठीशी मुस्लीम तेवढ्या ताकदीने उभा राहणार नाही, कारण मुस्लिमांनी मविआकडे केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या पलिकडच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत २० टक्के जागा मुस्लीमांना देणे शक्य नाही. ५ टक्के मिळतील अशीही शक्यता नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार काही प्रमाणात एमआयएमकडे झुकू शकतो. म्हणून आघाडी झाली नाही तर किमान अंडरस्टँडींग करण्यासाठी ठाकरे यांचा पक्ष प्रयत्न करीत असल्याच्या शक्यतेला वाव आहे.
हे ही वाचा:
इस्लामच्या नावे चालत होते चैरिटी होम्स, देत होते बलात्काराची ट्रेनिंग, ४०० मुलांचा बचाव !
चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…
चंदीगडमध्ये माजी पोलिसांच्या घरी ग्रेनेड स्फोट, १ अटक, २ संशयित फरार !
जम्मू- काश्मीर: कुपवाडातील जंगलामधून लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा
एमआयएससोबत उघड किंवा छुप्या अंडरस्टॅंडीगचा बभ्रा झाला तर उबाठा शिवसेनेला फारसा फरक पडेल असे वाटत नाही. कारण अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी सपाचे नेते अबु आजमी यांचे मातोश्रीवर जोरदार स्वागत केले. त्यामुळे कधी काळी मुंबई बॉम्बस्फोटांच्या संदर्भात ज्यांची चर्चा होती, असे अबु आजमी जर ठाकरेंना चालत असतील, वंदे मातरमला विधानसभेत विरोध करणारा हा नेता चालत असेल तर जलील यांनी काय घोडं मारलं आहे? फार चर्चा झालीच तर भाजपाने कशी मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली होती, असा निलाजरा सवाल करायचा आणि काखा वर करायच्या. इतकं सोपं झालं आहे सगळे. हेही पुरत नसेल तर भाजपावाले कसे बीफ खातात, ते चालते का? अशा बिनबुडाच्या पूड्या सोडून द्यायच्या.
वाट्टेल ते बोलायचे, नंतर लोक खुलासा करत बसतात. परंतु चार दिवस तर विषय चघळला जातो. शंभरातील दहा लोक तरी विश्वास ठेवतात, असे हे अदभूत तंत्र यांनी विकसित केलेले आहे. संजय राऊत याचे जन्मदाते. त्यांनी ठाकरेंसाठी सर्व काही सोपं करून ठेवलेले आहे. हा माणूस कशाचाही विरोध करू शकतो, कशाचेही समर्थन करू शकतो. खरे बोललेच पाहिजे, असा काही यांचा नियम नाही. फार ताणले गेले तर चार शिव्या हासडायच्या किंवा थुंकून मोकळे व्हायचे. त्यामुळे थुंकणेही वर्ज्य नाही आणि थुंकी चाटणेही वर्ज्य नाही. एमआयएमसोबत उघड किंवा छुपी आघाडी हा काही फार पेचात पकडणारा मामला नाही. जलील जे काही म्हणाले ते खोटे असण्याची शक्यता कमी आहे. जलील आणि ज्वलंत यांची हातमिळवणी अशक्य नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)