शिवसेनेचे निधड्या छातीचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे अतिकार्यक्षम, बहुपरीश्रमी, संयमी, विचारी, सुसंस्कृत मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंगळवारी दिल्ली दरबारी जातीने हजर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
‘सामना’ची तोफ सतत दिल्लीच्या दिशेने धडाडत ठेवणारे, मोदींचा बाप काढणारे उद्धव ठाकरे दिल्ली समोर झुकले, वाकले, सरपटले असा वावगा अर्थ या भेटीतून कोण काढू शकेल? काढणार नाही, काढूच शकत नाही.
उद्धवजी एकवेळ मोदींकडून पवारांकडे वळू शकतात, पवारांकडून सोनियांकडे वळू शकतात, अनेक निर्णय अनेकदा वळवू शकतात, वाकवू शकतात, थांबवू शकतात, पण वाकू शकत नाहीत. वाकणे त्यांच्या रक्तात नाही. शक्यच नाही. तिघाडीच्या ओझ्याने खांदे किंचित वाकलेले असले तरी त्यांचा कणा मात्र ताठ आहे. कारण ते फक्त मुख्यमंत्री नसून लढवय्ये, बोलघेवडे, संस्कारी, विचारी आणि संयमीही आहेत.
रोज सामन्यातून हिणकस दुगाण्या झाडून मोदींची भेट घ्यायला आणि भेटीनंतर पुन्हा खासगीत भेट घ्यायला वाघाचे काळीज, धार काढलेला खंजीर आणि प्रचंड दिलदारपणा लागतो.
हे ही वाचा:
केंद्राकडे केलेल्या ७-८ मागण्या तर राज्याशी संबंधित
ढकललं केंद्रावरचा दिल्लीत प्रयोग
गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा
लसीबाबत दुटप्पीपणा करणारे अखिलेश घेणार लस
महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, अशा भेटीत खंजीर हवाच. वारंवार ज्यांचा उल्लेख अफजलखान असा केला, त्यांना भेटायला जाताना खंजीर सोबत नेणे भाग आहे. परंतु ‘जाणत्या काकां’नी ऐनवेळी खंजीर देण्यास नकार दिला असावा किंवा संयमी आणि विचारी असल्याने उद्धवजींनी खंजीराचा मोह आवरला असावा.
उद्धवजींची भेट ठरल्यापासून धास्तावलेल्या, भेदरलेल्या मोदींनी त्यांना ‘खंजीर, वाघनखे, बिचवा नको’, अशी कोपरापासून विनंती केली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शक्यता अनंत आहेत. संजय राऊत याबाबत अधिक खुलासा करू शकतील. त्यांना अतिवृष्टी, आत्मसृष्टी आणि दूरदृष्टीचे वरदान आहे.
असो, अशा दोन्ही बाजूच्या विचारीपणातून दिल्लीत एक प्रधान सेवक आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख सल्लागार उद्धव ठाकरे यांची भेट झाली. कंपाऊंडरच्या अनुपस्थितीत झालेली एक असामान्य, ऐतिहासिक भेट. इतिहासाला कलाटणी देण्याची क्षमता असलेली भेट.
अवघ्या जगाच्या नजरा या भेटीनिमित्त दिल्लीकडे वळल्या होत्या. गेले वर्षभर मातोश्री निवासस्थानी कडीबंद अवस्थेत ऑनलाईन मुजरे आणि फक्त ऑफलाईन नजराणे स्वीकारण्याची पद्धत उद्धवजींनी अंगिकारली. वर्क फ्रॉम होम कल्चरला बळ दिले. घरी बसल्या बसल्या महाराष्ट्राचा गाडा चालवणे हे येरा गबाळ्याचे काम थोडेच. पण साहेब अष्ठावधानी, एकीकडे देशमुख, परब आदी मनसबदारांमार्फत ‘कामा’चा गाडा हाकत असताना ‘सामना’तून गनिमावर सतत भडीमार सुरू ठेवायचा. जितके जमेल तितके फेसबुक लाईव्ह करून लोकांना कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्यायचा, दिल्लीश्वरांना सतत सल्ले, इशारे देऊन त्यांना मार्गदर्शन करायचे अशा कामाच्या धबडग्यात ही भेट झाली.
कोरोनाच्या संकटात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या भावनेने ते त्यांच्या कुटुंबाकडे, जनता आपल्या कुटुंबाकडे पाहात होती. जमेल तेव्हा बिल्डर, बारवाल्यांकडेही लक्ष देत होते.
दरम्यानच्या काळात सचिन वाझेंना अटक झाली, त्यामुळे कामाचा व्याप वाढला. त्यातून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्याची आरोग्य व्यवस्था, लसीकरणाचा, शिक्षणाचा, रोजगार अशा किरकोळ विषयांचा बोजवारा उडाला. लोकांनी विनाकारण गलका करण्याचा प्रयत्न केला. परंतु संयमी, विचारी उद्धवजींचा तोल अजिबात ढळला नाही, की लक्ष विचलित झाले नाही. त्यांनी मुंबई मॉडेल, महाराष्ट्र मॉडेलनुसार कारभार सूर ठेवला. असे छोटेमोठे, किरकोळ विषय मोदींवर सोपवून पुन्हा आपल्या ‘मूळ’ कामाकडे वळण्याचा इरादा या भेटीमागे असावा.
निद्रानाशाचा विकार असलेले मोदी भल्या पहाटे उठून उशीरा रात्रीपर्यंत काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे याची अचूक जाणीव उद्धवजींना होती.
त्यामुळे कामाच्या व्यापातून निर्माण केलेले काही गुंते मोदींवर सोपवण्याचा विचार करून विचारी आणि संस्कारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुशल राजकारणाची झलक जगाला दाखवली.
मार्गदर्शक शरद पवारांनी गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्वसमावेशक राजकारणाचे दर्शन घडवले, तर आम्ही सुद्धा पंतप्रधानांची भेट घेऊन सर्वव्यापी राजकारण करू शकतो हे उद्धवजींनी दाखवले आहे. गुंते मोदींवर सोडून ताठ कण्याने उद्धवजी आता घरी डेरेदाखल होतील.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
या भेटी चे चित्रीकरण झाले आहे का याची खात्री करून घ्यावी अन्यथा अडीच वर्षे “शेनेचा” पंतप्रधान हे खाजगी बैठकीत मान्य केले होते असे हेडलाईन “सामना” ला येईल.