उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

वस्तुस्थिती उघड झाली असताना नीतीमत्तेच्या गप्पा मारून स्वत:चे हसे का करून घ्यावे?

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ताजे विधान हास्यास्पद आहे. ‘भाजपासोबत पॅच-अप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतीमत्तेत बसत नव्हते’, असे भन्नाट विनोदी विधान त्यांनी केले आहे. गेली अडीच तीन वर्षे ठाकरे यांनी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यामुळे वाण नाही पण गुण लागलाय. ठाकरे स्वस्तातले पवार झाले आहेत.

 

हिंदी सिनेमात तुलना करण्याचा ट्रेंड जुना आहे. मिथुन चक्रवर्तीला गरीबांचा अमिताभ म्हणायचे, गोविंदाला गरीबांचा मिथुन. याच धर्तीवर महाराष्ट्राच्या राजकारणात तुलना करायची झाली तर उद्धव ठाकरे यांना गरीबांचे शरद पवार किंवा स्वस्तातले शरद पवार म्हणता येईल.

 

शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. भाजपासोबत गेलो नाही कारण नीतीमत्तेत बसत नव्हते. कारण स्वाभिमान महत्वाचा होता. दरारा राखणे महत्वाचे होते, असे ते म्हणाले. ही सगळी विधाने पवार शैलीत केलेली आहेत. पवार शैली म्हणजे थापा आणि कोलांट्या. ठाकरे आडनावाची व्यक्ती कधी ही शैली स्वीकारेल अशी शक्यता १० वर्षांपूर्वी कुणाला वाटत नव्हती. ज्याचा विचार स्वप्नातही केला नव्हता ते प्रत्यक्षात आलेले दिसते.

 

१९९९ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना तेही स्वाभिमानाची भाषा करत होते. नीतीमत्तेची भाषा करत होते. ज्या वर्षी त्यांनी पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी स्वाभिमान गुंडाळला, लोळण फुगडी खेळत, नीतीमत्ता खुंटीला लटकवत ते काँग्रेससोबत सत्तेत सामील झाले. एवढाच पवार आणि ठाकरे यांच्यातला फरक आहे. पवारांना स्वाभिमान सोडून सत्ता मिळाली. ठाकरेंना सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

हे ही वाचा:

काय कारण? भारतीय कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेत तिरंग्याखाली लढता येणार नाही!

चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

लँडिग ३० लाख लोकांनी पाहिले तर ट्विटरवर २ कोटी व्ह्यूज !

 

एकनाथ शिंदे पक्षातून फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पॅच-अपसाठीच देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फडणवीसांनी भाजपा नेतृत्वाकडे बोट दाखवले. भाजपा नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना काखा दाखवल्या. हा गौप्यस्फोट खुद्द फडणवीसांनी केला होता. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांचा बदला घेतला असे फडणवीसांनी उघडपणे सांगितले. त्यामुळे ठाकरेंच्या तोंडावर भाजपाने वाटाघाटींचा दरवाजा बंद केला ही वस्तुस्थिती उघड झाली असताना नीतीमत्तेच्या गप्पा मारून स्वत:चे हसे का करून घ्यावे?

 

कोलांट्या मारणे पवारांना शोभते. त्यात त्यांनी गुरुत्व प्राप्त केले आहे. बरंच काही सांगितल्यानंतर काहीही अर्थ निघणार नाही अशी विधाने करणे हा तर त्यांचा हातखंडा. स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातून पक्षातून बाहेर पडणारे शरद पवार, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून त्यांच्यासोबत हातमिळवणी करू शकतात. परंतु पवारांनी राजकारणात जे काही मिळवलं ते फक्त थापा आणि कोलांट्यांच्या जोरावर मिळवलं असा ठाकरेंचा गैरसमज झालेला दिसतोय. पवारांची मेहनत मोठी आहे, जनसंपर्क आहे, बुद्धिमत्ता आहे, धूर्तपणा आहे, राजकारणाची उत्तम जाण आहे, महाराष्ट्राचा भूगोल त्यांना तोंडपाठ आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पवार खुनशी नाहीत, दीर्घद्वेषीही नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार बनण्याचा प्रयत्नही करू नये. एका पीसाने मोर बनता येत नाही.

 

काँग्रेसची भलामण करणे आणि राहुल गांधींची तळी उचलणे हीच आता ज्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता बनली आहे, त्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टी कशाला कराव्यात. मुघलांच्या दरबारी असलेल्या पाच हजारी सरदारां इतकी किंमत तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला १० जनपथवर आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सोनिया आणि राहुल यांच्या मनात निव्वळ द्वेष आहे. हे ठाऊक असूनही उद्धव ठाकरे त्यांना खांद्यावर घेऊन नाचतायत.

 

 

लडाखमध्य राहुल यांनी मोटार सायकल चालवली त्याचे उद्धव यांनी कोण कौतूक केले. हे म्हणजे एखादा डॉक्टर उत्तम कुस्ती खेळतो म्हणून कौतुक केल्यासारखं आहे. कौतुक करायला हरकत नाही, परंतु त्याला रोगनिदान येत नसेल, त्याच्या हात गेलेला प्रत्येक रुग्ण परलोकवासी होत असेल तरीही त्याच्या कुस्तीच्या शौकाचे कौतुक करता येईल काय? त्याने खरेतर डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ कुस्तीपटू म्हणून करीयर करावे. राहुल गांधीनाही तोच सल्ला आहे. उद्धव ठाकरे हेही ड्रायव्हिंग उत्तम करतात, फोटोग्राफीही करतात. राजकारणापेक्षा त्यांना या गोष्टी बऱ्या जमतात. असो, सांगण्याचा मुद्दा हा की उद्धव ठाकरे यांच्या नीतीमत्तेचा आणि स्वाभिमानाचा बाजार उठलेला आहे. त्याचा अवघ्या जगात बभ्रा झालेला आहे.
उद्धव ठाकरे भाजपासोबत पॅच-अप करणार नाही, कारण महाराष्ट्रात भाजपाचे बळ वाढल्याची त्यांना प्रचंड पोटदुखी आहे. भाजपा द्वेषामुळे त्यांना पछाडलेले आहे.

 

राहिला मुद्दा दराऱ्याचा. दरारा कशाला म्हणतात हे समजण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा व्यवहार आठवून पाहावा. बाळासाहेब आणि दरारा हे समानार्थी शब्द होते. त्यांच्या काळात मातोश्रीवर दरबार भरत असे आणि सिनेमा-राजकारण क्षेत्रातील दिग्गज त्यांच्या दरबारात हजेरी लावत असत. त्यावेळी गॅलरीत बाय बाय करून रवाना करण्याची पद्धत सुरू झालेली नव्हती. भाजपा-शिवसेना युतीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा तमाम नेत्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली आहे.

 

आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी काँग्रेसची युती आहे. त्यांना भेटायला राहुल गांधी एकदा तरी मातोश्रीवर आले काय? सोनिया गांधी तर फार दूरचा मामला आहे. यांनाच आदित्य यांच्यासोबत तडफडत दिल्लीत जाऊन त्यांना भेटावे लागले. वाकावे लागते. बंगळूरुमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी उद्धव यांची भेट झाली तेव्हा ठाकरे किती भारावले होते. चंद्रावर पाऊल ठेवल्यासारखा त्यांना आनंद झाला होता. लोक शिवसेनाप्रमुखांना पाहून भारावायचे, उद्धव ठाकरे गांधी मायलेकांना पाहून भारावतात. हा उद्धव यांचा दरारा आहे.

 

 

ज्या लोकांसमोर उद्धव ठाकरे नीतीमत्ता, स्वाभिमान आणि दराऱ्याची भाषा करत होते, त्यांना ते ऐकणे भाग आहे. किमान त्यांच्यासोबत असेपर्यंत तरी परंतु त्यातले किती त्यांच्यासोबत राहतील हे सांगणे मात्र कठीण आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version