ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

ठाकरे विरोध कशासाठी करतात हेही काही गुपित राहिलेले नाही.

ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसचा विजय होणार असे छातीठोकपणे सांगणारे युवराज आदित्य ठाकरे सध्या गायब आहेत. त्यांचे घरंदाज पिताश्री उद्धव ठाकरे शिवालय या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रकटले. अदाणी समुहाने हाती घेतलेल्या धारावी विकास प्रकल्पाला विरोध करून ते नव्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोरसमध्ये सामील झाले आहेत. १६ डिसेंबर रोजी ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावीपासून अदाणी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ही विरोध आहे की अदाणी, परत या अशी ठाकरेंनी दिलेली हाळी आहे?

मविआ सरकारचा कडेलोट झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, पाण्यातल्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तीच वेळ आलेली दिसते. पाण्यातल्या या माशावर सध्या अश्रू ढाळण्याचे इतके प्रसंग येतायत की त्या अश्रूंचे एक स्वतंत्र तळे निर्माण होऊ शकेल.

चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे भाकीत खोटे ठरले. सामनाच्या अग्रलेखातून केलेले राहुल गांधींचे चरण चाटण वाया गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली चिखलफेक वाया गेली. जिंकल्यावर काँग्रेसच्या विजय यात्रेत नाचण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले. आता इतके काही झाल्यानंतर ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत अदाणींच्या विरोधात काही करपट ढेकर काढले तर ते स्वाभाविक म्हटले पाहिजे.

 

२५ वर्षे ठाकरेंची मुंबई महापालिकेत सत्ता होती. सुरुवातीच्या काळात मुंबईत फक्त एक धारावी होती. ठाकरे कृपेने मुंबईत आता अनेक छोट्यामोठ्या धारावी उभ्या राहिलेल्या आहेत. हातात चवल्या पावल्या टेकवा आणि कुठेही झोपड्या उभ्या करा हे यांचे धोरण होते. वडापाव आणि वसुलीच्या पलिकडे अर्थकारणाची समज नसल्यामुळे धारावीच्या विकासाचे शिवधनुष्य उचलण्याचा विचारही ज्यांना सुचला नाही ते आता अदाणींच्या विरोधात छाती काढून उभे आहेत.

 

सत्तेवर असताना ज्यांनी वाढवण बंदर, मेट्रो कारशेड, रत्नागिरी रिफायनरी, जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला यशस्वी विरोध केला ते सत्ता गेल्यानंतर नवीन लक्ष्याच्या शोधात आहेत. सध्या त्यांनी धारावीवर लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पक्ष चालवण्यासाठी असे काही उपद्व्याप करणे गरजेचेही आहे. अदाणींवर आक्षेप घेऊन उपयोग कितपत होईल हा मात्र संशोधनाचा विषय आहे. जिथे हिंडेनबर्गची डाळ शिजली नाही तिथे ठाकरे हा फार छोटा विषय आहे.

 

कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल प्रा.लि. ही कंपनी श्रीलंकेत शिपिंग कंटेनर टर्मिनलची निर्मिती करते आहे. अमेरिकेतल्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने या प्रकल्पात ५५.३ कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय जेव्हा घेतला. तेव्हा हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मने या निर्णयावर आक्षेप घेतला. सखोल चौकशी केल्यानंतर हे आक्षेप धाब्यावर बसून अमेरिकेने गुंतवणुकीच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

इस्त्रायलने त्यांच्या हायफा बंदरासंदर्भात अदाणी पोर्टशी करार केलेला आहे. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आणि इस्त्रायलसारखा खमका देश जिथे अदाणींचे पायघड्या घालून स्वागत करतो, मध्यपूर्वेसह जगातील अनेक विकसित देशांत जिथे अदाणींसाठी पायघड्या पसरायला तयार आहेत, तिथे ठाकरेंचा विरोध कोण मोजणार? ठाकरे विरोध कशासाठी करतात हेही काही गुपित राहिलेले नाही.

राज्याच्या विकासासाठी मोठे प्रकल्प राबवावे लागतात. ते राबबवण्याची क्षमता अदाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, गोदरेज अशा मोजक्या उद्योगपतींमध्येच आहे. काँग्रेसच्या सहा दशकांच्या कार्यकाळात जो मूठभर विकास झाला त्यात उद्योग जगतात एवढेच माणिकमोती निर्माण होऊ शकले. अदाणींचा विरोध केला तर राहुल गांधी खूष होतील हे ठाकरेंना ठाऊक आहे. काँग्रेस पक्षाची सूत्र सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्या हाती आहेत. परंतु राहुल गांधी अदाणींच्या विरोधात कंठशोष करत असताना राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गहलोक हे अदाणींना राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण देत होते, याचा ठाकरेंना विसर पडलेला दिसतो. इंडी आघाडीतील कित्येक नेते अदाणींच्या गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत.

ठाकरेंचे मार्गदर्शक आणि राज्यातील उरल्यासुरल्या मविआचे आधारस्तंभ शरद पवार यांचाही अदाणींना विरोध नाही. पत्रकारांनी ही बाब ठाकरेंच्या समोर ठेवल्यानंतर मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. म्हणजे अदाणींनी शरद पवारांचे समाधान केले असेल तर आपले पण समाधान व्हायला हवे, यासाठी ठाकरेंचा आटापिटा सुरू आहे. धारावीचा विकास सरकारने म्हाडामार्फत करावा, टीडीआरची बँक अदाणींच्या नाही तर सरकारच्या ताब्यात असावी, धारावीकरांना तीनशे फुटांची नाही तर ५०० फुटांची घरे आणि त्यांच्या कारखान्यांसाठी जागा मिळावी, गिरणी कामगार, सरकारी कर्मचारी, सफाई कामगार यांना पुनर्विकासात घरे मिळावी, मुंबईतील अन्य मराठी माणसांना रास्त भावात घरे मिळावीत अशा ठाकरेंच्या माफक मागण्या आहेत.

 

मागण्या अशा करायच्या की विकासक पळूनच गेला पाहिजे. ठाकरेंच्या हाती महापालिकेची सत्ता असताना मुंबईत झोपड्या बेसुमार वाढल्या. गेल्या काही वर्षात मातोश्रीचा विकास झाला, मातोश्री-२ उभी राहिली, परंतु धारावीचे नशीब काही पालटले नाही. आपल्या रंगमहालांची संख्या वाढवत नेत असताना गरीबाला झोपडीच्या जागी पक्के घर मिळत असेल तर ठाकरेंना पोटदुखी होण्याचे कारण काय?

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ ​​धाडीला अटक!

अरिजितची हॅट्ट्रिक, कोरियाला नमवून भारताची विजयी सलामी

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या

थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!

महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर २१ सप्टेंबर २०२२ रोजी गौतम अदाणी यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. धारावी प्रकल्प अदाणींकडे जाणार अशी चर्चा तेव्हा सुरू होती.
आता अदाणींना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या भेटीचा तपशील जाहीर करावा? अदाणींशी कोणत्या विषयावर चर्चा झाली. एखादा प्रस्ताव या भेटीत ठाकरेंनी अदाणींना किंवा अदाणींनी ठाकरेंना दिला होता का? या प्रस्तावावर एकमत न झाल्यामुळे ठाकरेंनी म्यानातून तलवार बाहेर काढली का ? या मुद्द्यांवर ठाकरेंनी प्रकाश टाकला तर बरे होईल.

विरोध केल्यावर समजूत काढण्यासाठी माणूस चर्चेला तयार होतो. थोडा दबाव आणला तर डील होऊ शकते, याचा ठाकरेंना अनुभव आहे. त्यामुळे अदाणी पुन्हा चर्चेच्या टेबलवर येण्यासाठी तर ठाकरेंनी विरोधाचा एल्गार केलेला नाही ना? असं आम्हाला उगीचच वाटते आहे. ठाकरेंचा धारावीतील अदाणींच्या प्रकल्पाला विरोध म्हणजे अदाणी परत मातोश्रीवर या, परत या, परत या अशी हाळीत तर नाही? ठाकरेंच्या सवयी ठाऊक असल्यामुळे मुंबईकरांना उगाच संशय येतोय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version