उद्धव ठाकरेंना समदुःखी मिळाला

उद्या काय होईल याचा अंदाज बांधण्याची क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही अशी टीका करणाऱ्या शरद पवारांनाही अंदाज बांधता आला नाही हेच खरे.

उद्धव ठाकरेंना समदुःखी मिळाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा फोन सारखा स्वीच ऑफ का होत होता? ते सतत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेच्या विपरित भूमिका का घेत होते? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला होता? अशा अनेक प्रश्नांचा आज अखेर उलगडा झाला. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाली. उद्या काय होईल याचा अंदाज बांधण्याची क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही अशी टीका करणाऱ्या शरद पवारांनाही अंदाज बांधता आला नाही हेच खरे.

पवारांनी त्याच चुका केल्या ज्या उद्धव ठाकरेंनी केल्या. त्यांची भाकरी आज पूर्ण करपली. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात राजीनामा नाट्याचे उपकथानक उरकून घेतले. ‘तुम्हीच काय ते ठरवा, पण राजीनामा देऊ नका’, हे पक्षाच्या नेत्यांकडून वदवून घेतले. पक्षावरील पकड मजबूत केली. पुढे दिल्लीत अधिवेशन बोलावून सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सूत्रे बहाल केली. त्यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी ठरली. राजीनामा नाट्यामुळे फूट काही काळ पुढे ढकलली गेली, पण टळली नाही.

पवारांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु, त्या अनुभवाचा वापर करून त्यांनी अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीचे साफ पोतेरे केले. शिंदे- फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला. हा शपथविधी पवारांशी चर्चा करूनच झाला होता, परंतु पवारांनी ऐनवेळी माघार घेतली, या विषयाची चर्चा झाली. तेव्हा ‘माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली’, अशी दर्पोक्ती करून पवारांनी फडणवीसांना खिजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या गुगलीवर फडणवीस नव्हे अजित पवार त्रिफळाचित झाले होते. पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने पवारांनी केवळ भाजपाचे हसे केले नाही तर अजित दादांना भरीस घालून त्यांना मामा बनवले.

या सगळ्या घटनाक्रमाबाबत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात पवार म्हणतात. ‘मला जेव्हा पहाटेच्या शपथविधीबाबत समजले तेव्हा मला धक्का बसला’. अर्थात पवारांनी आत्मचरित्रातही थापा मारल्या होत्या. त्यांना सगळा घटनाक्रम अथपासून इतिपर्यंत ठाऊक होता.

पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसला. फडणवीस कुचाळकीचे धनी झाले. परंतु, त्यांनी कधीही अजित पवारांबद्दल अपशब्द तर सोडा, नाराजीही व्यक्त केली नाही. उलट सरकारमधला क्रमांक दोनचा नेता ज्या देवगिरी बंगल्यात उपमुख्यमंत्री मुक्काम करतात तो बंगला, विरोधी पक्ष नेते असलेल्या अजित पवारांना बहाल करण्यात आला. अजित पवारांमध्येही पहाटेच्या शपथविधीनंतर सूक्ष्म बदल झाला.

थोरल्या पवारांनी एखाद्या मुद्यावर केंद्र सरकारची खरडपट्टी काढावी आणि त्याच मुद्द्यावर अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करावी, असे सतत घडत गेले.

आळंदीमध्ये तुकाराम शिळा लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवारांची केमिस्ट्री महाराष्ट्राच्या जनतेने पाहीली. मोदींनी अजित दादांच्या खांद्यावर हात का ठेवला होता. याचा उलगडा महाराष्ट्राच्या जनतेला आज झाला असावा.

भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट पक्षाकडे वळवायचा ही भाजपाची रणनीती होती. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार त्याच साठी रखडला होता. पहाटेच्या शपथविधीचा घाट त्याचसाठी घालण्यात येत होता. परंतु, हा प्रयोग फसल्यानंतरही भाजपाचे प्रयत्न सुरू होते. थोरल्या पवारांनी राजीनामा नाट्य घडवले तत्पूर्वी प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपासोबत गेले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. पवारांनी हे ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी हा विषय जयंत पाटलांकडे टोलावला. ती वेळ मारून नेली. पक्षातील एक गट वेगळा विचार करतोय हे लक्षात आल्यानंतर पवारांनी राजीनामा नाट्य घडवले. ‘तुम्ही माता पिता तुम्ही हो’, अशी आळवणी पक्षाच्या नेत्यांकडून करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला.

सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी पद सोपवून पवारांनी अजितदादांना निमित्त मिळवून दिले. थोरल्या पवारांनी तिच चूक केली जी उद्धव ठाकरेंनी केली होती. तळागाळात संपर्क, पक्षासाठी योगदान आणि पक्षविस्तारासाठी मेहनत घेणाऱ्या नेत्यांपेक्षा थोरल्या पवारांनी कन्यामोहाला प्राधान्य दिले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या जुन्या जाणत्या नेत्यांपेक्षा आदित्य ठाकरे यांना पक्षात मोठे करण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे पवार यांनी अजितदादांना डावलून त्यांच्या कन्येच्या हाती पक्ष देण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर घराणेशाहीचा शिक्का नको म्हणून ‘सुप्रिया सुळे स्वकर्तृत्वावर दोनवेळा लोकसभेवर जिंकून गेल्या’, अशी मल्लिनाथी केली. ठाकरेंचा प्रयोग फसला हे पाहिल्यानंतरही पवारांनी धडा घेतला नाही.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी; पुढील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार

प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पद जितेंद्र आव्हाडांकडे

‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

उद्धव ठाकरेंना राज्यात काय घडतंय, याची बित्तंबातमी नसायची, उद्या काय घडेल याचा अंदाज बांधण्याची क्षमता नव्हती अशी खमरमरीत टीका पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे. पवारांच्या पक्षात फूट पडत असताना पवारांचा देखील उद्धव ठाकरे झाला होता, असेच म्हणावे लागेल. पवार जेव्हा ‘लोक माझे सांगाती’चा दुसरा भाग प्रकाशित करण्याच्या तयारीत असताना अजित पवारांचा फोन सारखा स्वीच ऑफ येत होता. ते अचानक गायब होत होते. तरीही पवारांना याची बित्तंबातमी नव्हती. उद्या काय घडेल याचा अंदाज नव्हता. पहाटेच्या शपथविधीमुळे अजित पवारांचे जे काही हसे झाले होते ते त्यांनी व्याजासह चुकते केले.

थोरल्या पवारांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या गुगलीचे कौतूक केले होते. तेच पवार आज स्वतः हिट विकेट झालेले दिसतात.
आज घडलेल्या सगळ्या घडामोडींच्या मागे थोरले पवार तर नाही ना? अशी शंका अनेकांना येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडते घडवणारे शरद पवारच आहेत, असा समज काही पत्रकारांनी गेल्या काही वर्षात सतत बळकट करत नेला आहे. परंतु हे काही खरं नाही. देवेंद्र फडणवीसांनी हा समज खोटा ठरवलेला आहे. वर्षपूर्तीनंतर ते जे रिपब्लिक भारतच्या मुलाखतीत जे काही बोलले ते ठरवून बोलले. थोरल्या पवारांनी भाजपा आणि अजित पवारांशी केलेला विश्वासघात त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला. पुढे दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना एक समदुःखी नेता मिळाला आहे. आता महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता या दोघांवर आहे. फक्त या घडामोडी घडत असताना उद्धव यांच्या मनात एक प्रश्न जरूर निर्माण होणार आहे. सिल्व्हर ओकवर दोन वेळा झालेल्या गौतम अदाणी यांच्या भेटीत नेमकी चर्चा काय झाली होती? आज महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version