पहलगाममध्ये २७ हिंदूंची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यातले सहा जण महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येक पक्षाचा किमान एखादा तरी नेता त्या दुर्दैवी कुटुंबियांना भेटला. सांत्वनाचे चार शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. परंतु उबाठा शिवसेनेचे नेते गायब आहेत. मुस्लीम मतदारांवर आपला पक्ष जगतोय म्हटल्यावर मेलेल्या हिंदूंसाठी गळा कशाला काढा, असा सूज्ञ विचार बहुधा त्यांनी केला असावा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लंडनमध्ये आहेत. बहुधा शोकमग्न असावेत. उबाठाचे खासदार सर्वपक्षीय बैठकीपासून दूर राहिले. हत्याकांडात मृत झालेल्या दुर्दैवी हिंदूंना स्वर्गात पाठवून त्यांचे निलाजरे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपला कंड शमवून घेतला. महाराष्ट्राची जनता हा तमाशा पाहते आहे.
काश्मीरात जे काही घडले त्यामुळे अवघा देश शोकमग्न आहे. ज्यावेळी हे घडले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर मोदींनी दौरा अर्ध्यावर सोडला आणि ते भारतात परतले. तातडीने बैठकांचा सिलसिला सुरू झाला. पाकिस्तानच्या विरोधात काय कारवाई करायची याबाबत रणनीती ठरवण्याचे काम सुरू झाले. उद्धव ठाकरे हे मोदी नाहीत, मोदींचा एक टक्कासुद्धा नाहीत. ते लंडन वरून परतले नाहीत. सुट्टी संपवल्याशिवाय ते परतणारही नाहीत. ते परतले असते तरी त्यांनी मोदींच्या विरोधात तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय काय केले असते? परंतु मोदींवर टीका करता करताही किमान एखाद्या तरी दुर्दैवी कुटुंबाचे अश्रू त्यांना पुसता आले असते. त्यांना सांत्वना देता आली असती. परंतु असे काही करण्याची त्यांना गरज वाटली नसावी. लंडनच्या सुट्ट्या त्यांना अधिक महत्वाच्या वाटल्या.
अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा देशाचे धोरण ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जाते. देश पक्षभेद विसरून एकत्र आलेला आहे, हे चित्र जगासमोर निर्माण होण्यासाठी हे गरजेचे असते. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या त्या बैठकीत काँग्रेससह देशभरातील सगळे महत्वाचे पक्षनेते उपस्थित राहिले. अपवाद होता उबाठा शिवसेनेचा. उबाठा शिवसेनेचे लोकसभेत सहा खासदार आहेत. राज्यसभेत राऊत, प्रियांका चतुर्वेदी आहेत. परंतु या बैठकीला एकही जण उपस्थित नव्हता. त्यांना पक्षाच्या राजकारणाच्या पुढे काहीच दिसेनासे झालेले आहे. काहीही घडले, चीनने कुरापत काढली, पाकिस्तानने कुरापत काढली तरी यांचे लक्ष्य मोदी हेच असते. मोदींवर टीका करून कंड शमवण्याचे काम ही मंडळी करत असतात. वेळ काळाचे भानही त्यांना नसते.
खासदार अरविंद सावंत यांनी म्हणे सर्वपक्षीय बैठकीत ऑनलाईन उपस्थितीची तयारी दर्शवली होती. किरेन रिजीजू यांना त्यांनी तशी विनंती केल्याचे ते म्हणाले. यांच्या पेक्षा असद्द्दीन ओवेसी परवडला. त्यांना बैठकीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मिळेल त्या पहिल्या विमानाने मी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओवेसी हा हिंदूंचा उघड शत्रू आहे. परंतु सावंतांपेक्षा ओवेसी बरा. तो निदान मी ज्वलंत हिंदुत्ववादी आहे, असे दावे तरी करत नाही.
हे ही वाचा:
तेलंगणात १४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण!
पहलगाम हल्ल्यानंतर दुःखी होऊन शहाबुद्दीन बनले श्यामलाल
दहशतवादी आदिलची आई म्हणाली, दोषी आढळल्यास सर्वात कठोर शिक्षा व्हावी!
पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवून द्या!
सावंतांना आणि त्यांच्या तोंडाळ नेत्यांना लाज वाटली पाहिजे असे मी अजिबात म्हणणार नाही. कारण त्यांनी लाज कधीच सोडली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांचा निलाजरेपणा पाहाते आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत काय बोलावे. देश एका संकटाचा सामना करीत असता हे महाशय लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायत. हे महाराष्ट्रातील नीरो
आहेत. ते पहलगाम हल्ल्याच्या आधी तिथे रवाना झाले होते, असा बचाव त्यांचे समर्थक निश्चितपणे करतील. देशात २७ हिंदूंच्या हत्या झाल्या म्हणून ते लंडन कसे काय सोडतील? देश जळत असताना नीरो फिडेल कसा काय वाजवू शकतो, असा प्रश्न कोणाला पडलेला असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहावे. त्यांना उत्तर मिळेल. हे मुळातच थंड रक्ताचे आहेत, आणखी थंड व्हायला त्यांना खरे तर लंडनला जायची गरज नाही. परंतु भारताबाहेर एवढी सुबत्ता निर्माण करून
ठेवली आहे, त्याचा आस्वाद कोण घेणार?
भारतात परतल्यावर मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद घ्यायची, मोदींच्या विरोधात काही पांचट विधाने करतील, म्हणजे झाली कर्तव्यपूर्ती. देशावर काही संकट आले की, सरकारवर टीका करण्याची, भाजपाचा वचपा काढण्याची जणू हीच ती वेळ असा उबाठाच्या नेत्यांचा पवित्रा असतो. पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा अशी जनभावना आहे. यावेळी पाकिस्तानी दहशतवादी नाही तर या दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला ठेचा, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. उद्या खरोखरच केंद्र सरकारने पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी काही कारवाई केली तर राऊतांना बिहारच्या निवडणुका आठवतील. तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर राऊत जे काही बरळेले होते, ते देश विसरलेला नाही. कारवाईनंतर ते केंद्र सरकारकडे कारवाईचे पुरावेही मागतील.
देशात सकारात्मक राजकारण करणाऱ्या लोकांचा अभाव आहे. देश हिताचे राजकारण करण्यापेक्षा पक्षाचे दुकान कसे काय चालत राहील आणि आपल्या तुंबड्या कशा भरतील, याची चिंता असलेल्यांचा राजकारणात भरणा आहे. मोदी सरकार पाकिस्तानच्या विरोधात एका मोठ्या कारवाईची तयारी करीत आहे. जेव्हा अशा कारवाया होतात, तेव्हा अर्थव्यवस्थेला त्याची किंमत चुकवावी लागते. महागाई वाढते, देश चार पावले मागे जातो. ही किंमत जनतेला चुकवावी लागते. कारण त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसत असते. ही झळ तुम्हा आम्हाला बसणार आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आज लंडनच्या गार वातावरणाचा आनंद घेणारे, तुम्हाला सांगतील, बघा मोदींनी महागाई वाढवली, बघा मोदींच्या राज्यात जीडीपी घसरला. बघा मोदींच्या राज्यात शेअर मार्केट कोसळले. तेव्हा यांना उत्तर देण्याचे काम जनतेला करावे लागणार आहे. कारण हा देश ज्या सर्वसामान्यांचा आहे, त्यांना इथेच जगायचे आणि इथेच मरायचे आहे. त्यामुळे या देशाची काळजी घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे त्यांना भाग आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)