महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून माफीवीर राहुल गांधी यांना प्रचंड चेव आला आहे. शक्य तिथे, शक्य तेवढ्या वेळा राहुल गांधी ते स्वा.सावरकरांचा अपमान करतायत. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे दातखीळ बसल्यासारखे गप्प होते, कारण सत्ता टिकवायची होती. सत्ता गेल्यानंतर यांचे तोंड उघडले.
‘सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान करणे बंद करावे, अन्यथा त्याचे परीणाम महाविकास आघाडीवर होतील’, असा एकदा संजय राऊत यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा पायउतार झाले होते. तेव्हा राहुल गांधी आपला इशारा गंभीरपणे घेतील, असे ठाकरे गटाला वाटले होते. जे उद्धव ठाकरे यांनी सांगायला हवे होते, ते कंपाऊंडर यांच्यामार्फत सांगितले गेले, त्यामुळे शून्य परिणाम झाला.
त्याचे कारणही उघड होते. राहुल गांधी यांनी ठाकरेंचे पाणी जोखले होते. सावरकरांचा अपमान करण्याआधी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करून उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, याची चाचपणी केली होती.
महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राहुल गांधी यांनी ना कधी जयंतीला अभिवादन केले ना पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण केली. एकही शब्द न बोलता त्यांच्या लेखी ठाकरेंना काय किंमत आहे हे दाखवून दिले. तरीही ठाकरे सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला मोठ्या मनाने नाक घासून श्रद्धांजली अर्पण करत होते. सत्ता टीकवण्यासाठी ठाकरेंच्या लटपटी पाहून राहुल गांधी जे काही समजायचे ते समजले. त्यामुळे ते राऊतांच्या इशाऱ्याला भीक घालतील अशी शक्यताच नव्हती. राऊतांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीवरही त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानंतरही अनेकदा सावरकरांच्याविरोधात बोलून सुद्धा शिउबाठाच्या लाचारीमुळे महाविकास आघाडीला साधा ओरखडाही आला नाही.
‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ या विधानामुळे राहुल गांधी यांना दोन वर्षांची सजा झाल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी गेली. त्यानंतर राहुल गांधी सतत म्हणतायत, मी सावरकर नाही, गांधी आहे, माफी मागणार नाही. त्यावर आता मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे बोलले आहेत. सावरकर हे आमचे दैवत आहे, त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उशीरा का होईना उद्धव यांना जाग आली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाविकास आघाडीचे सरकार असताना ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’, या अवस्थेत ते तब्बल अडीच वर्ष होते. त्यातून ते बाहेर आले ही चांगली गोष्ट आहे. ‘सहन करणार नाही’, असे ते सांगतायत तरी. पण सहन करणार नाही, म्हणजे नेमके काय करणार हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
हे ही वाचा:
खलिस्तानी चळवळीचा नवा चेहरा अमृतपाल…
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ अर्जांचा पाऊस
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कुळाला उंची दिली ते कूळ तुम्ही बुडवलं!!
विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांनी दिली विजयी सलामी
शिवसेना एकसंध असताना राहुल गांधी यांची त्यांना काय वाटते याबाबत फार चिंता केली नाही. आता पक्षाचा सगळा भर ओसरला असताना ते उद्धव यांना कितपत गांभीर्याने घेतील? स्वत: उद्धव या इशाऱ्याबद्दल किती गंभीर आहेत? राहुल गांधींनी त्यांच्या इशाऱ्याला किंमत न देता पुन्हा गरळ ओकली तर काय करणार आहेत? गेल्या वेळी राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गप्प बसले तसेच गप्प बसणार आहेत का?
फक्त इशारा देऊन काय होणार? शिवसेनाप्रमुखांनी जसा मणिशंकर अय्यरला दणका दिला होता तसा दणका उद्धव ठाकरे देणार काय? राहुल गांधी यांचे थोबाड फोडणार काय? असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे याबाबत राहुल गांधींशी चर्चा करणार आहेत, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुळात जे राहुल गांधी आपल्या मूर्खपणामुळे संपूर्ण काँग्रेस पक्ष बुडवून बसलेत ते उद्धव यांची चिंता का करतील? ते उद्धव यांना हिंग लावून विचारणारही नाहीत. शिउबाठाला गंभीरपणे घेत नाही, हे संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचीच ते पुनरावृत्ती करतील अशी शक्यता आहे. तेव्हा उद्धव यांनी आपले शब्द गिळण्याची तयारी ठेवावी. राहुल गांधी यांना दुखावणे त्यांना तरी झेपणार नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)