घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

उद्धव ठाकरेंची आक्रमकता म्हणजे मातोश्रीत सुरू झालेले बैठकांचे सत्र.

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रा काढणार राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार, महाराष्ट्र पिंजून काढणार अशी घोषणा शिवसेनेने केली होती. परंतु या यात्रेला काही मुहूर्त मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी घरी बसूनच महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केलेली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती बनवायला सुरूवात केलेली असून उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याची चर्चा मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या कानावर आहे. ही आक्रमकता म्हणजे मातोश्रीत सुरू झालेले बैठकांचे सत्र.

३१ ऑक्टोबर पासून मातोश्रीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीसाठी जिल्हानिहाय या बैठका होत आहेत. पंडीत नेहरुंच्या जन्मदिवसापर्यंत म्हणजे १४ नोव्हेंबर पर्यंत बैठकांचा हा सिलसिला सुरू राहाणार आहे. संघटन मजबूत करणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार सोडून गेल्यानंतर पक्षाला जे खिंडार पडले आहे ते बुजवण्यासाठी नवीन कार्यकर्ते जोडणे, सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात आणणे हा या बैठकांचा उद्देश आहे.
घराला आग लागली असताना, बाहेर पडून विहीरीपर्यंत न जाता घरच्या टाकीतले पाणी बादलीत घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करायचा. काहीही झाले तरी घर सोडायचे नाही, असा हा प्रकार.

शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे दोन वेळा शिवसेना भवनात आले होते. ‘मी इथे नियमितपणे येणार, शिवसैनिकांशी संवाद साधणार’, अशी घोषणा त्यावेळी त्यांनी केली होती. फुटीनंतर पडझड झालेल्या पक्षाच्या पुनर्रबांधणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्याची घोषणाही त्यांनी केली होती. ९ ऑक्टोबरला ठाण्यातून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून यात्रा सुरू झाली. परंतु या यात्रेत उद्धव ठाकरे फिरकलेच नाहीत. शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील आय़ात नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनीच या यात्रेत पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

पक्ष फुटल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी या यात्रेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पक्षात प्राण फुंकण्याची क्षमता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यात असते की तीन महीन्यांपूर्वी पक्षात झालेल्या अंधारे बाई यांच्यासारख्या नेत्यांमध्ये? पक्षातील इतक्या मोठ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे सोबत राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असते तर ते जास्त शोभून दिसलं असतं. कार्यकर्त्यांच्या न यावे लागते आहे.

घोषणा केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे जर राज्याच्या कानाकोपऱ्यात गेले असते तर कदाचित चित्र वेगळे असते. सत्ताधारी पक्षाबाबत असंतोष निर्माण करणे फार कठीण काम नसते. कारण सरकार कोणाचेही असो अशा अनेक समस्या असतात ज्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नसते. अशा समस्यांचे खापर सरकारवर फोडून जनमनात असंतोष धगधगता ठेवणे मैदानात उतरलेल्या नेत्यासाठी फार कठीण नसते. परंतु नेता मैदानात उतरतच नसेल तर?

उद्धव ठाकरे यांच्याबाबत जी समस्या सरकार असताना होती ती सरकार गेल्यानंतर ही कायम आहे. त्यांना मातोश्री सोडवत नाही. आजारपण आणि कोविडच्या नावाखाली त्यांनी अडीच वर्षे घर बसून काढली. सत्ता गेल्यानंतर ते अचानक सक्रीय झाले होते. शिवसेनाभवन पर्यंत जाऊ लागले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्यांना खाजवताही येत नव्हतं ते उद्धव ठाकरे हेच का? असा प्रश्न पडावा इतके ते दिसू लागले. शिंदे फडणवीसांचे सरकार कायद्याच्या पेचात गुदमरून आचके देईल, मग पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री ही आशा तेव्हा जागृत होती. त्या उत्साहाच्या भरात मी शिवसेना भवनमध्ये आता नियमितपणे येणार आहे, अशा घोषणा झाला. महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या घोषणा झाल्या. परंतु त्या घोषणा हवेत विरलेल्या दिसतात.

हे ही वाचा:

दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणार

अमृता फडणवीस यांना म्हणून नको आहे ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन

ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?

भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्या डोळ्याला झाली इजा

 

शिवसेना भवनकडे पाठ फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे काही दिवस मातोश्रीच्या गॅलरीपर्यंत यायचे. शिवसैनिकांना दर्शन द्यायचे. पुढे हेही कमी झाले. आता उद्धव ठाकरे यांनी घरातच बैठका सुरू केल्या आहेत. बैठका घरी घ्यायच्या असतील तर मग पक्ष कार्यालय हवे कशाला? कोविड सरल्यामुळे आता फेसबुक लाईव्ह बंद झाले आहे. त्यामुळे आता मेळावा टू मेळावा पक्षप्रमुखांचे दर्शन होते आहे. गोरेगावच्या नेस्कोमध्ये झालेला गटप्रमुखांचा मेळावा, त्यानंतर झालेला दसरा मेळावा. आता थेट नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात बुलढाण्यात होणारा शेतकरी मेळावा. दोन महिन्यात तीन जाहीर कार्यक्रम. या वेगाने महाराष्ट्र पिंजून काढायला किती काळ लागेल? महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. लोकसभा निवडणुका २०२४ च्या एप्रिल किंवा मे महिन्यात अपेक्षित आहेत. जेमतेम दीड वर्ष शिल्लक आहे.

राहुल गांधी यांच्यावर कितीही विनोद होऊ दे, लोक त्यांना पप्पू म्हणू दे, परंतु निवडणुकांमध्ये सतत पराभूत होऊन राहुल गांधी यांना लोकांपर्यंत जाण्याची बुद्धी झाली. भारत जोडोच्या निमित्ताने ते रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांना मात्र घर सोडवत नाही. कालपरवा आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एकास एक चर्चेचे आव्हान दिले आहे. म्हणजे उद्धव ठाकरे एकास एक चर्चाही करू शकत नाहीत अशी बहुधा त्यांची खात्री झाली असावी. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही… ही समर्थ रामदासांची वाणी. कष्टा विना राज्य टिकत नाही आणि कष्टा विना गेलेले राज्य परत मिळवताही येत नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षातच येत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version