25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीयमिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत...

मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…

मिठीच्या नावाने महापालिकेचा खजिना साफ करणाऱ्यांची आणि कोविडच्या काळात भ्रष्टाचाराचे लोणी ओरपणाऱ्यांची चौकशी

Google News Follow

Related

स्वत: बद्दल सांगण्यासारखं फारसं काही उरलेले नसते तेव्हा तुम्हाला संपूर्ण मॅरेथॉन मुलाखत दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडण्यात खर्ची घालावी लागते. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी आणि २५ वर्ष महापालिकेत सत्ताधारी राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या यश कथा नाहीत. यांच्या डोळ्यादेखत कलानगर शेजारी चार मजली झोपड्या उभ्या राहिल्या. त्या साफ करायला जमले नाही, तरीही हे इतरांना प्रश्न विचारतायत. सत्ता गेल्यापासून देश आणि लोकशाहीच्या नावाने गळे काढायचे, कपाळ बडवायचे एकमेव कार्यक्रम ते सातत्याने राबवतायत. शिउबाठा पुरस्कृत ‘आवाज कुणाचा’ हा पॉडकास्ट त्याचे ताजे उदाहरण आहे.

२३ जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. या निमित्त सलग दोन-तीन भागांची मॅरेथॉन मुलाखत सामनामध्ये प्रसिद्ध होत असे. लोक या मुलाखतीची प्रतीक्षा करत कारण, बाळासाहेबांकडे वक्तृत्व, विचार होतेच शिवाय एक अफलातून उत्स्फूर्तपणा होता. आदरापोटी शिवसेनाप्रमुख त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव जरूर घेत, परंतु ते त्यांच्या नावावर जगले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या सर्व गुणांची वानवा आहे. त्यामुळे मुलाखतकार हे संजय राऊतच असावे लागतात. अगदी राजीव खांडेकर सुद्धा चालत नाहीत. परंतु तरीही या उणीवा झाकल्या जात नाहीत. त्यामुळे सगळी मुलाखत विरोधकांवर विद्वेषाची मळमळ काढण्यात जाते.

‘ठाकरेंच्या मुलाखतीची मुलाखतीआधीच देशभरात चर्चा होते. त्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा येतो’, अशी टीपण्णी संजय राऊत यांनी केली होती. मुलाखतीच्या सुरूवातीलाही राऊत यांनी असेच आणखी काही विनोद करून घेतले. ‘म्हणे महाराष्ट्राचे राजकारण उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरते आहे’. सध्या ठाकरेंची परिस्थिती अशी की ते आणि त्यांचे चिरंजीव स्वत: भोवती फिरता फिरता राहुल गांधीचे उपग्रह असल्यासारखे त्यांच्या भोवतीही फिरत असतात. तरीही सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून राऊतांना मालकांबाबत असे काही तरी भव्य दिव्य बोलणे भाग असते. उद्धव ठाकरे ते गंभीरपणे घेतात, हा मोठा विनोद आहे. राऊत कधी त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्रनायझेशनचे सल्लागार बनवतात. कधी पुतीन आणि बायडन यांच्या चर्चेत उद्धव ठाकरे यांचा विषय आणतात, तसेच ते ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू बनवतात आणि ठाकरेंना हे खरे वाटते.

सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले ठाकरे अलिकडे उठसूठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अद्वातद्वा बोलतात. तसेच बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बोलतात. त्यांच्यापेक्षा वेगळे काही ते ‘आवाज कुणाचा’ या पक्षाच्या पॉडकास्टमध्ये बोललेले नाहीत. त्यांच्या बडबडीत मणिपूरच्या मुद्द्याची भर पडली एवढंच. मणिपूरच्या महिला अत्याचाराबाबत संजय राऊत चिंता व्यक्त करतायत, हे ऐकून स्वप्ना पाटकर खदाखदा हसल्या असतील. ठाकरेंच्या साळसूद मुखवट्यामागचा भेसूर चेहरा लोकांनी मविआच्या सत्ता काळात पाहिलाय.

उद्धव ठाकरेंनी मणिपूरबद्दल जरुर बोलावं, पंतप्रधानांना प्रश्न विचारावेत. सामान्य नागरिकालाही तो हक्क आहे. मणिपूर, पंजाब आणि काश्मीरसारखे प्रश्न, आसाममध्ये अस्तित्वात असलेला बांगलादेशींच्या घुसखोरीचा प्रश्न हा काही एका रात्रीत निर्माण झालेला नाही. आणि तो भाजपाने निर्माण केलेला नाही. हे प्रश्न जटील आहेत. गुंतागुंतीचे आहेत. यातल्या अनेक प्रश्नांचे पितृत्व काँग्रेसचे आहे. ज्यांच्या तैनाती फौजेत सध्या ठाकरे सामील झालेले आहेत.

मणिपूरबाबत ठाकरेंचे प्रश्न ऐकून मुंबईतील सगळे प्रश्न सुटले की काय असा गैरसमज महाराष्ट्राबाहेरील लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. बाहेरील अशासाठी की महाराष्ट्राच्या जनतेने ठाकरेंचा नाकर्तेपणा पाहिलेला आहे. २५ वर्षे महापालिकेतील सत्ता उपभोगल्यानंतर मिठी नदी तुम्हाला साफ करता आली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही अजून नाल्याची नदी करता आलेली नाही. आणखी काही काळ सत्ता राहिली तर समुद्राचे रुपांतरही तुम्ही नाल्यात करू शकता एवढे तुमचे कर्तृत्व आहे. समुद्राच्या पाण्याला दुर्गंधी यावी इतपत तर तुम्ही मजल मारलेलीच आहेत.

मुंबईत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. २५ वर्षात कलानगर शेजारी चार-पाच मजली झोपड्या उभ्या राहिल्या. अनेक मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे साम्राज्य उभे राहिले. त्यातल्या अनेक झोपड्यांमध्ये बांगलादेशी, रोहींग्यांचे निवारे उभे राहिले. हे गेल्या एक वर्षाच्या काळात झाले असा दावा, तुम्ही करू शकता काय? तुम्हाला जर २५ वर्षात मुंबईचे फुटकळ प्रश्न सोडवता आले नाहीत, उलट त्यात तुम्ही भर टाकलीत. तरीही तुम्ही पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकता. कारण देशात लोकशाही आहे. समजदारांना बोलण्याचा जेवढा हक्क आहे, तेवढाच हक्क रेम्या डोक्याच्या लोकांना आहे.

मिठी नदी साफ का झाली नाही? कोविडच्या काळात महाराष्ट्र मृत्यू दरात नंबर एक का होता? याची उत्तरं तुम्ही देणार नाही. तुमचे कार्यकारी कोणत्याही पॉडकास्टमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. परंतु ही उत्तरं आता फार काळ लपून राहणार नाहीत. कारण मिठीच्या नावाने महापालिकेचा खजिना साफ करणाऱ्यांची आणि कोविडच्या काळात भ्रष्टाचाराचे लोणी ओरपणाऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे.

हे ही वाचा:

अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली

वक्फ बोर्डानंतर जमियतही म्हणते अहमदीया हे मुस्लिम नाहीत!

राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!

‘मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण लोकांचा विश्वास कमावला, मी त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतो’, असे उद्धव ठाकरे दर दुसऱ्या मुलाखतीत सांगत असतात. ज्यांना कुटुंबाचे खटले कुटुंबात सोडवता आले नाही, न्यायालयात जावे लागले, त्यांना ही भाषा शोभत नाही. कधी काळी पक्षाचे बिनीचे शिलेदार असलेले एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबतच्या आमदारांचा उल्लेख उद्धव ठाकरे गद्दार, बांडगुळ असा करतात. परंतु अजित पवारांचा मात्र मंत्रिमंडळातील सहकारी असा आदराने उल्लेख करतात, अपनो पे सितम, गैरो पे करम…हेच त्यांच्या राजकीय घसरगुंडीचे कारण आहे. लोक संजय राऊतांना उगाच बोल लावतात. राऊत तेच बोलतात, जे त्यांनी बोलावं अशी ठाकरेंची ईच्छा असते.

‘मी जिथे जाईन तिथे लोक सांगतात, आम्ही तुमच्या सोबत आहोत’. हे नेहमीचे पालूपद तुम्ही प्रत्येक मुलाखतीत फेकता हे नेमके कोण लोक आहेत? महापालिका विधानसभेची निवडणूक होत नाही, तोपर्यंत तुम्ही हे बोलायला मोकळे आहात. कारण जनता कोणासोबत आहे, हे निवडणुकीच्या माध्यमातूनच स्पष्ट होऊ शकते. परंतु सत्ता असताना याच सर्वसामान्य लोकांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद होते, हे अजून लोकांच्या विस्मरणात गेलेले नाही.

सत्ता गेल्यानंतर या लोकांची तुम्हाला चिंता वाटू लागली. देशाची आणि लोकशाहीची चिंता वाटू लागली. काश्मीरमधल्या हिंदू पंडीतांची चिंता वाटू लागली. ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हिंदू पंडीतांना घरदार सोडून काश्मिरमधून हाकलण्यात आले, महिलांच्या अब्रूवर घाला घालण्यात आला, तो फारुख अब्दुल्ला तुमच्या विरोधकांच्या आघाडीतला एक सदस्य आहे. त्यामुळे हिंदू पंडितांच्या दुर्दैवाबाबत मोदींना प्रश्न विचारण्याआधी त्या फारुख अब्दुल्लाचा कान पकडण्याचे धार्ष्ट्य़ आहे का तुमच्यामध्ये? सत्ते वाचून केंद्रात राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री तडफडतायत. मोदींना सत्तेवरून हुसकावण्यासाठी खलिस्तानी, पाकिस्तानी, चीनी कोणाचाही पाठींबा घेण्याची त्यांची तयारी आहे. ठाकरे त्यांच्या गँगमध्ये सामील होऊन लोकशाही वाचवण्याच्या बाता करतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा