लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महायुतीचे जागावाटप जाहीर केले. स्वाभाविकपणे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही काही तरी जाहीर करावेसे वाटू लागले. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी मुंबईचे तीन उमेदवार जाहीर करून टाकले. उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले असले तरी आपण इथूच लढणार असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तसा हा राडा वाढण्याची शक्यता आहे.
बराचसा पक्ष रिकामा झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती विचित्र झाली आहे. पक्ष एकसंध असतानाही ते भाजपाकडून उमेदवारांची उसनवारी करायचे. २०१९ मध्ये कोरेगावची जागा त्यांनी भाजपाकडून उमेदवारासह मागून घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश शिंदे यांना पक्षाची उमेदवारी दिली. कधी काळी भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या मनिषा कायंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. आता पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी ही परंपरा कायम ठेवलेली आहे. फक्त उसनवारीसाठी पक्ष बदललेला दिसतो.
विनायक राऊत यांनी लोकसभेच्या ज्या तीन जागा जाहीर केल्या त्यात ईशान्य मुंबईची जागा संजय पाटील लढवणार आहेत. संजय पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार राहिले आहेत. त्यांचे वडील दिना बामा पाटील हे देखील शरद पवार यांचे निष्ठावंत होते. काही काळापूर्वी संजय पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या कन्येने युवासेनेत प्रवेश केला. ही उसनवारी लोकसभेसाठी सुरू आहे, ही बाब अनेकांच्या लक्षात आली होती.
एका बाजूला उमेदवारांची एकतर्फी घोषणा करत असताना मविआ नावाचे प्रकरण अस्तित्वात आहे याचा ठाकरेंना विसर पडलेला दिसतो. शरद पवारांचाही पक्ष फुटला असला तरी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांची माणसं आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या तुलनेत शरद पवारांसोबत उत्तम संवाद असूनही शिउबाठा आणि शरद पवार यांच्या पक्षात अनेक जागांवरून खडाजंगी सुरू आहे.
मविआचे सरकार असल्यापासून ठाकरे-पवार एकत्र आणि काँग्रेसची भूमिका मात्र वेगळी असे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढू, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक वेळा केली होती. आता लोकसभेत मात्र तिन्ही पक्ष एकमेकांच्या तंगड्या ओढणार अशी शक्यता आहे. या कबड्डीला सुरूवात झालेली आहे.
१ डिसेंबर रोजी काँग्रेस समन्वय समितीची बैठक होणार आहे. यावेळी काँग्रेस १६ जागांवर दावा करणार आहे. समन्वय बैठकीत जागा वाटपाचा प्रस्ताव तयार केला जाईल आणि आघाडीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाईल, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले आहे. प्रत्येक पक्षाने जर १६ जागा लढायच्या ठरवल्या तर शिउबाठाच्या सात जागा सरळसरळ कमी होणार. ही बाब लक्षात आल्यामुळेच कुरघोडीचे राजकारण ठाकरेंनी सुरू केले आहे. तीन जागांवर उमेदवार जाहीर करून काँग्रेसची प्रतिक्रिया काय याची चाचपणी सुरू केलेली आहे.
मुंबईतील सहा जागांची वाटणी ठाकरे गट तीन, राष्ट्रवादी पवार गट एक आणि काँग्रेस दोन अशा प्रकारे झालेली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस इशान्य मुंबई लढवणार आहे. काँग्रेस उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य लढवणार असे ठरले आहे. ठाकरे गटाने शरद पवारांच्या वाट्याला येणाऱ्या ईशान्य मुंबईवर दावा ठोकला आहे. हाच पेच छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. या जागेवरही ठाकरेंचा दावा आहे. इथे आमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, हा त्यांचा दावा आहे. मात्र मराठा आंदोलनामुळे या जागेवर आपल्याला लाभ होईल असे शरद पवारांना वाटते. त्यामुळे इथेही रस्सीखेच सुरू आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गजानन कीर्तिकर खासदार आहेत. ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे ठाकरेंसोबत आहेत. त्यांना ही जागा देण्याचे विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही जागा लढवण्याचे जाहीर करून म्यानातून तलवार काढलेली आहे.
हे ही वाचा:
२६/११च्या दिवशीच आलेल्या कॉलने उडवली खळबळ; मद्यपीला अटक
नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार
उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया
रायगडमधून उद्धव ठाकरे आपल्याला उमेदवारी देणार असल्याचे माजी खासदार अनंत गीते यांनी जाहीर केले आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचा पराभव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार करेल असेही गीते यांनी सांगितले आहे. म्हणजे मुंबईतील तीन आणि या दोन अशा पाच जागांवर ठाकरेंनी आधीच दावा ठोकून दिलेला आहे. मावळच्या जागेवर तर काँग्रेसचा उमेदवारही ठरला आहे. इथे महेंद्र घरत यांनाच उमेदवारी मिळावी असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हायकमांडला आधीच कळवले आहे.
उमेदवारीबद्दल उद्धव ठाकरे थेट बोलले नसले तरी त्यांचे चेले मात्र परस्पर उमेदवारी जाहीर करीत आहेत. तूर्तास परिस्थिती अशी आहे की मविआच्या बैठकीत काहीही ठरलेले नाही. महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा २६ जागा आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष २२ जागा लढवेल असे जाहीर केले. त्यानंतर अन्य दोन्ही पक्षांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचा अर्थ फडणवीस जे म्हणाले त्याला अन्य दोन पक्षांची हरकत नाही, असे मानायला वाव आहे. परंतु मविआमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. आघाडीच्या बैठकीनंतर आता चित्र स्पष्ट होणार आहे. तोळामासा झालेल्या शिउबाठाची ही कुरघोडी मानण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मानसिकता नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)