रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार

भाजपाला शिव्या घालण्याचा एक कलमी कार्यक्रम ते राबवत असतात.

रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिव लोकसभा मतदार संघातील कळंब येथे सभा झाली. त्या सभेत निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाजपा नेते नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्वीट केला होता. मुख्य प्रवाहातील माध्यमांतून हा खुलासा झालेला नाही. रिकाम्या खुर्च्यांचे रहस्य पुन्हा एकदा समाज माध्यमांमुळे उघड झाले. शरद पवारांच्या लोणावळ्यातील सभेत फुटकळ गर्दी होती. त्यांनी वड्याचे तेल वांग्यावर काढले. रीकाम्या खुर्च्या आणि सभांमध्ये आटलेल्या गर्दीची समस्या ठाकरे-पवारांना अस्वस्थ करते आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे ओम राजे निंबाळकर २०१९ मध्ये विजयी झाले होते. आज ते उबाठा गटासोबत आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कळंबमध्ये जाहीर सभा झाली. याच सभेतील रिकाम्या खुर्च्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या सभा म्हणजे गर्दी असे समीकरण एके काळी होते. उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे रिकाम्या खुर्च्या असे समीकरण येत्या काळात निर्माण होईल अशी शक्यता आहे. मविआचे सरकार कोसळल्यानंतर ठाकरेंच्या वज्रमुठ सभांना राष्ट्रवादी काँग्रेसची रसद असे. पक्ष फुटल्यापासून शरद पवारांचे वांधे झालेत. लोणावळ्यातील सभेला माणसे जमली नाहीत, म्हणून शरद पवारांनी जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर प्रहार केले. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात. मी कोणाच्या वाटेला जात नाही, माझ्या वाट्याला कोण आला तर त्याला सोडत नाही.

पवारांच्या या विधानावर खुलासा करताना सुनील शेळके जे म्हणाले ते महत्वाचे आहे. सभेला माणसं कमी आल्यामुळे पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नावाने कागाळ्या केल्या. सुनील शेळकेंनी लोकांना धमकावल्यामुळे लोक सभेला आले नाहीत, असे खोटे कारण सांगून स्वत: ची कातडी बचावली. म्हणजे थोडक्यात काय, तर शरद पवारांच्या सभेलाही गर्दी आटली आहे. त्यांना स्वत:ला आटलेल्या गर्दीचे समीकरण सुटत नसल्यामुळे ते आता ठाकरेंना रसद पोहचवण्याची शक्यता उरते कुठे. इथे उद्धव ठाकरे यांनी तेच भाषण जे ते जिथे तिथे करत असतात. भाजपावर तेच आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तेच ते आणि तेच ते कुजकट वक्तव्य केले.

उद्धव ठाकरेच्या तोंडातून अखंडपणे झिरपणाऱ्या नकारात्मकतेत इतके सातत्य आहे, की श्रोते आता त्यात गटांगळ्या खाऊ लागले आहेत. हे भाषण कमी आणि किरकिर आणि रडारड जास्त वाटते. या माणसाला काहीच सकारात्मक कसे सुचत नाही, असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडू लागलेला आहे. अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद उबलेल्या ठाकरेंना आपली कामे म्हणून देवेंद्र फडणवीसांचीच चार कामे सांगावी लागतात. शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकचे उदाहरण ताजे आहे. ही चोरी लगेचच पकडली जाते, म्हणून ते त्या भानगडीत पडत नाहीत. भाजपाला शिव्या घालण्याचा एक कलमी कार्यक्रम ते राबवत असतात.

हे ही वाचा:

बोरीवलीतील रिक्षा चालकांचे हे चाललंय काय?

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अलिकडेच छत्रपती संभाजी नगर येथे सभा झाली, या सभेत त्यांनी ठाकरे आणि शरद पवारांना फार फूटेज दिले नाही. मोदींच्या दहा वर्षांतील कामांबाबत ते बोलले. ठाकरेंकडे याबाबत फारसे सांगण्यासारखे नाही. जामनगर मधल्या अनंत अंबानींच्या प्री वेडींग शूटमध्ये काय झाले, हे ठाकरेंच्या तोंडून ऐकण्यात लोकांना फारसा रस नसावा. कुठेही उद्धव ठाकरे यांची सभा असेल तर तिथे मुंबईतून माणसे जातात. त्यामुळे सभा कुठेही असो माणसं तीच तीच दिसतात. ठाकरेंच्या सभांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अंतर कमी झालेले आहे, त्यामुळे बाहेरच्या लोकांची आवक घटली आहे. स्थानिक लोकांना ठाकरेंना ऐकण्यात फार रस नसावा. बहुधा गर्दी कमी होत आहे.

ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदे यांनी धुवून पुसून नेला. जे काही मूठभर लोक त्यांच्याकडे उरले आहेत, त्यात ओम राजे निंबाळकर यांचा समावेश आहे. आपल्या विद्यमान खासदाराच्या मतदार संघात सभा होते आहे, इथे लोक येतील अशा अपेक्षेने ठाकरे गेले होते. सभेला श्रोत्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या जास्त होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खुर्च्या कशा रिकाम्या होत्या, याचे साग्रसंगीत वर्णन करणाऱ्या मराठी माध्यमांच्या निष्ठा इतक्या पक्क्या आहेत, की त्यांना या खुर्च्या दिसल्याच नाहीत. सामनाने तर सभा तुडुंब गर्दीत झाल्याचे वृत्त दिले आहे.

या रिकाम्या खुर्च्यांचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात येत नाही. मोदींनी ४०० पार… ची गॅरेण्टी दिलेली आहे. सगळ्या देशाचा त्यावर विश्वास आहे. अगदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना सुद्धा. देशात २०२४ मध्ये इंडी आघाडीचे सरकार येणार असे राहुल गांधी यांनाही वाटत नाही, परंतु ठाकरे आणि राऊतांना मात्र वाटते आहे. रिकाम्या खुर्च्याही त्यांचा आत्मविश्वास हलवू शकलेल्या नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version