महात्मा गांधी जयंती दिवशी म्हणजे काल रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नफरत तोडो – भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिल्लक सेना आणि समाजवादी पार्टी या यात्रेत सहभागी झाली होती. ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रायल जवळच्या महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत ही यात्रा काढण्यात आली.
शिवसेना आणि महात्मा गांधी हे दोन विरुद्ध अर्थी शब्द आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गांधींचे अनुयायी होते, असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने वड्याची साल पिंपळाला चिटकवण्याची जी काही परंपरा सुरू केली आहे. त्याचा भाग म्हणून या सर्कशीकडे पाहाता येईल.
शिवसेनाप्रमुखांनी काहीच नसताना शिवसेना रुजवली. वाढवली. तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक स्त्रोतही मर्यादीत होते. त्या तुलनेने आज उद्धव ठाकरे हे सरस आहेत. तरी त्यांचा पक्ष जगवण्यासाठी ते टेकूच्या शोधात आहे. हा टेकू त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपात दिसतो आहे. या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांना आपला खांदा मोठ्या खूषीने वापरू दिला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा बॅनर लागला आहे. दसरा मेळावा दोन दिवसांवर आहे. त्या आधी काँग्रेसचा पाठींबा पदरात पाडून घेण्यासाठी नफरत तोडो – भारत जोडो यात्रेत शिल्लक सेना सामील झाली असे मानण्यास वाव आहे.
फक्त मुस्लीम मतांचे राजकारण करणारा, मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत कणव बाळगणाऱ्यांचा पक्ष अशी समाजवादी पार्टीची ओळख आहे. या पक्षाचे नेते अबू आजमी असून त्यांचा परिचय देण्याची कुणाला गरज नाही. असा ज्या यात्रेत सामील झाला त्या यात्रेतून नफरत तोडोची हाक दिली जाते हीच आश्चर्याची बाब. या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आधी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन करून आहे. दिग्विजय सिंह यांचा हिंदूविरोधी इतिहास सर्वश्रुत आहे. सध्या फरार असलेला झाकीर नाईक, महेश भट या कुप्रसिद्ध हिंदूद्रोह्यासह दिग्विजय सिंह यांचे मेतकूट जगजाहीर तर आहेच, शिवाय हिंदू दहशतवाद नावाचे कारस्थान रुजवण्यात पी. चिदंबरम, शरद पवार यांच्यासोबत दिग्विजय यांचा सिंहाचा वाटा होता.
थोडक्यात ज्यांनी हिंदूंच्या विरोधात कायम द्वेषाची पेरणी केली, त्याचा सहभाग ही या यात्रेची खासियत. डोक्यावरून पाणी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचा या यात्रेत असलेला सहभाग. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे रुपांतर शिल्लक सेनेत कसे झाले हे समजून घ्यायचे असेल तर या यात्रेत सहभागी झालेल्यांची नावं फक्त तपासून पाहण्याची गरज आहे.
एकेकाळी कम्युनिस्टांचे मेळावे उधळणे हा शिवसेनेच्या उपक्रमांचा भाग होता. कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येप्रकरणात अटक झालेल्यांवर शिवसेनेचा शिक्का होता. त्या कम्युनिस्टांसोबत पदयात्रा काढण्याची वेळ शिल्लक सेनेवर आली आहे. खासदार अरविंद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत वाढणाऱ्या नफरत बद्दल बोलत होते.
एकेकाळी हिंदू गर्जना करणारी शिल्लक सेना आता हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई अशी भाषा करू लागली आहे. ही भाषा शिवसेनाप्रमुखांची नव्हती. ही काँग्रेसची भाषा आहे. मोदी १३० कोटी भारतीयांचा उल्लेख करतात. देशाच्या लोकसंख्येचे हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई, अगडे, पिछडे असे तुकडे करणे ही काँग्रेसची परंपरा.
हे ही वाचा:
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात
भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद
दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू
नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी
युवराज आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील ५०० कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. ही गळती रोज सुरू आहे. सतत रक्तपात झाल्यामुळे मरणासन्न झालेल्या रुग्णासारखी शिल्लक सेनेची अवस्था झाली आहे. त्यामुळे हा पक्ष आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या सलाईनवर जगण्याचा प्रयत्न करतोय. जगवण्यासाठी त्या सलाईनमधून हिंदू द्वेषाचा डोस दिला जातोय.
पण उद्धव ठाकरे यांना फरक पडत नाही. कारण महाविकास आघाडीचा प्रयोग करताना त्यांनी कधीच कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)